Ad Advertisement Ad Advertisement

Maratha Conquest of Attock : अटकेवरी लाविले झेंडे!

Maratha Conquest of Attock : मराठ्यांनी अटकेवर भगवा ध्वज फडकावला, त्याहीपुढे पेशावरपर्यंत मजल मारली हा इतिहास अत्यंत गौरवास्पद आहे. भीमथडीची मराठमोळी घोडी सिंधू नदीचे पाणी प्यायली, पंजाबवर सर्पाप्रमाणे विळखा घालून बसलेल्या अफगाणांची सत्ता मराठ्यांनी अवघ्या काही महिन्यांत उधळून लावली.

भाग-४

या मोहिमेची उद्दिष्टे काय होती? मराठे काय म्हणून अटकेपर्यंत घोडदौड करीत गेले? या प्रश्नांचा विचार प्रथम करणे आवश्यक आहे. १७५७-५८ च्या उत्तरेकडील मराठ्यांच्या मोहिमेची एकंदरीत नऊ उद्दिष्टे होती- राजपुतान्यातील वारसाहक्काच्या गोंधळामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवणे, दिल्लीच्या बादशाहीची व्यवस्था लावणे, अब्दालीचे पारिपत्य करणे, रोहिल्यांचे पारिपत्य करणे, काशी, प्रयाग इत्यादी तीर्थस्थाने ताब्यात घेणे, सरकारी मामलतदारांची चौकशी करणे, जे मामलतदार पैशांची अफरातफर करतात त्यांचा बंदोबस्त करणे, नजीबखानाचा काटा काढणे आणि जिंकलेल्या पैशांतून पुढची मोहीम चालवणे. यातील काही उद्दिष्टे पुरी झाली, काही अर्धीमुर्धी पुरी झाली आणि काही अजिबातच पूर्ण झाली नाहीत असे राजवाडे म्हणतात (ऐतिहासिक प्रस्तावना, पृ. ५७).

या मोहिमेत अर्थप्राप्ती न होता एक कोटी रुपयांचे कर्ज झाले. अर्थात पेशवाईला हे कर्ज जड वाटले नाही, कारण उर्वरित आठ उद्दिष्टे ही अधिक महत्त्वाची होती. माधोसिंह, बिजोसिंह वगैरे राजपुतांचा कल अब्दालीकडे आहे, नजीबखान हा केवळ पाताळयंत्री आहे, काही मामलतदार रयतेत फितूर करतात, अफरातफर करतात, सुजाउद्दौला काशी आणि प्रयाग हवाली करण्याच्या केवळ थापा मारतो, या सर्व गोष्टी ठाऊक असूनही यातील अनेक गोष्टींचा बंदोबस्त झाला नाही, होऊ शकला नाही आणि पुढे पानिपतच्या वेळी हे सर्व भारी पडले, असा राजवाड्यांचा दृष्टिकोन आहे.

रियासतकार सरदेसाई या संदर्भात काय म्हणतात हेदेखील बघितले पाहिजे. सरदेसाई म्हणतात, ‘सरहिंदपासून अटकपर्यंतच्या पंजाब प्रांताचे या वेळी तीन सुभे लाहोर, मुलतान व काश्मीर या नावाचे असून, त्यांच्या संरक्षणाची तजवीज रघुनाथरावाने केलेली त्या वेळच्या मानानें अगदीच अपुरी नव्हती… वास्तविक पुढील परिणामावरून मागील घडामोडींचा बरेवाईटपणा ठरविणे रास्त नाही… या वेळी रघुनाथरावास ताबडतोब दक्षिणेत परत जाण्याचे काही एक कारण नव्हते. उत्तर हिंदची, दिल्लीच्या दरबाराची व लाहोर अटकेपावेतोंची परिस्थिती त्यास दिसली होती. निरनिराळ्या व्यक्तींची कारस्थाने त्यास कळली असून वजिरापासून सर्वांनी त्यास गळ घातली की तुम्ही परत जाऊ नका, इकडेच ठासून बसा, म्हणजे अब्दाली आला तरी आपण त्यास मारून काढू…(मराठी रियासत, खंड ६, पृ. ३१५-३१७)’ राजवाड्यांनी रघुनाथरावांस परत जाण्यास पावसाळा कारणीभूत होता असे म्हटले आहे.

रघुनाथराव दख्खनेस येताच दत्ताजी आणि जनकोजी शिंदे या दोघांना उत्तरेस पाठवण्यात आले. परतीच्या वाटेवर दादासाहेबांनी जनकोजींना एक कोटी रुपये खर्च झाले तरी चालेल, पण नजीबाचा बंदोबस्त करावा असे आवर्जून सांगितले, तर होळकरांनी जनकोजींना ‘नजीबखानाचा आपल्या कामीं उपयोग करून घ्यावा, त्यास अपाय करूं नये’ असे सांगितले (मराठी रियासत, खंड ६, पृ. ३२३). शिंद्यांना पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या- नजीबाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे सोडवणे आणि बंगालमध्ये स्वाऱ्या करून एक-दोन कोटी रुपये महसूल मिळवणे. यानुसार ४ जानेवारी १७५९ रोजी शिंद्यांच्या फौजा दिल्लीत वजिराला भेटल्या आणि वाटाघाटी पूर्ण करून १ फेब्रुवारी रोजी दत्ताजी व जनकोजींनी एक अजस्त्र तोफ आणि मोठी फौज घेऊन लाहोरकडे कूच केले. लाहोरवर आता शिखांचा पूर्ण ताबा बसला होता आणि त्यांची मोठी फौज लाहोरमध्ये तैनात होती. अब्दालीचा धोका डोक्यावर असताना शिखांशी विनाकारण भांडणे निरुपयोगी आहे, हे जाणून हे दोघेही लाहोरहून परत फिरले. लाहोरमध्ये मराठ्यांच्या वतीने नारो शंकर यांची नेमणूक करण्यात आली आणि साबाजी शिंद्यांना पंजाबचा कारभार सांगण्यात आला.

हे सुरू असतानाच दत्ताजी शिंदे यांनी नजीबखानाचा बंदोबस्त करण्याचे जोरकस प्रयत्न सुरू केले होते. दत्ताजींची फौज सहराणपूरवर चालून गेली होती आणि नजीबखानाशी जोरदार चकमकी सुरू होऊन नजीब सपाटून मार खाऊ लागला होता. यात वजीर गाजीउद्दीनने मदत, खंडणीची रक्कम पुरवावी असा करार दत्ताजींनी केला होता. वजीर आपला शब्द पाळत नाही हे पाहून दत्ताजींनी वजिरालादेखील तडाखे द्यायला सुरुवात केली आणि दिल्लीत वजीर आणि शिंदेशाही फौजेची लढाई सुरू झाली. थोड्या लढाईनंतर वजीर ताळ्यावर आला आणि त्याने कबूल केलेली रक्कम चुकती करायला सुरुवात केली. हे होताच जनकोजी आणि दत्ताजी २३ मे १७५९ रोजी किराणा येथे यमुना ओलांडून अंतर्वेदीत उतरले. पंजाबातून परत आल्यावर दत्ताजींच्या लक्षात आले की, गाजीउद्दीन वजिराकडून दिल्लीचा कुठलाही कारभार होणे अशक्य आहे; कारण वजीर स्वभावाने नेभळट होता, त्याच्याकडे ना सैन्य ना पैसा आणि ना काही करण्याची जिद्द. दिल्लीत बादशहापाशी कोणीतरी कणखर व्यक्ती असल्याखेरीज दिल्लीचा कारभार चालणे अशक्य होते.

गाजुद्दीनला बाजूला ठेवून कोण्यातरी हुशार व्यक्तीकडे दिल्लीचा कारभार सोपवावा असा आग्रह जाट, दिल्लीतील मराठी वकील आणि खुद्द बादशहा दत्ताजींकडे करू लागले. एकतर शिंद्यांनी दिल्लीतच फौज घेऊन बसावे, कारभाराचा गाडा हाकावा, पण काशी-प्रयाग-बिहारची मोहीम सोडून द्यावी असा एकमेव मार्ग समोर होता. याचवेळी नजीबाने आपले हस्तक पाठवून, गोड बोलून, अजिजीची पत्रे पाठवून, भूलथापा देऊन आपल्याला अभय द्यावे, दिल्लीचा कारभार मी तुमच्या आशीर्वादे सांभाळेन; इतकेच नव्हे तर बंगाल-बिहारमध्ये जाण्याकरता नावांचा पूलही बांधून देईन असे सांगून हातापाया पडण्यास सुरुवात केली. सरळ मनाच्या, दिलदार दत्ताजींनीही नजीबखानाला अभय देऊन दिल्लीचा कारभार त्याच्या गळ्यात बांधावा असा विचार सुरू केला. पुढे काय झाले हे पुढच्या भागात पाहू.

अश्विन पुंडलिक
ashwin3009@gmail.com

Read About : Peter Lynch Investment Strategy – पीटर लिंच : शेअर निवडीचे षट्सूत्र
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.