Ad Advertisement Ad Advertisement

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबध्द -उद्योगमंत्री सामंत Marathi Language Preservation

भाषा आणि साहित्यिकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध

हिंगोली : Marathi Language Preservation : मराठी भाषेचा विकास, वापर, जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी राज्य शासन विविध धोरणे व उपक्रम राबवित आहे. मराठी भाषा आणि साहित्यिकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठी भाषा कार्यालयाचे उद्घाटन मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित आढावा बैठक व जिल्ह्यातील साहित्यिकांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आ.संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, मराठी भाषा विभागाचे सहायक संचालक शशिकांत देवरे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाचे कार्यालय सुरू करून विभागाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साहित्यिकांनी या कार्यालयाच्या माध्यमातून मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री डॉ. सामंत यांनी केले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा विभागाचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात विविध भागांत मराठी भाषेच्या अनेक बोली बोलल्या जातात. या बोली भाषांचे जतन, संवर्धन आणि त्यातील शब्द संपत्तीचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी विविध बोलीभाषांचे शब्दकोश तयार करण्यात येणार आहेत.

साहित्यिकांची पुस्तके खरेदी करून राज्यातील शाळा व महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम मराठी भाषा विभाग राबविणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील साहित्यिक खंडेराव सरनायक, संजय टाकळगव्हाणकर, बबन शिंदे, विजय गुंडेकर, रतन आडे, दिलीप धामणे, राजकुमार मोरगे, गोडाती काळे, सिंधू दहिफळे, राधिका देशमुख, संगीता चौधरी यांनी मराठी भाषा, साहित्य संवर्धन, साहित्यिकांच्या विविध मागण्या व समस्या मांडल्या. साहित्यिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार, अशी ग्वाही मंत्री डॉ. सामंत यांनी दिली. आम्रपाली चोरमारे यांनी सूत्रसंचालन केले.

हिंगोली जिल्ह्यात पुस्तकाचे गाव साकारण्याचा निर्णय

जिल्ह्यात पुस्तकाचे गाव विकसित करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांनी पुस्तकाचे गाव करण्यासाठी योग्य गाव सूचवावे. त्यातून निवड करण्यात आलेल्या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून विकसित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री डॉ. सामंत यांनी दिली.

Read About : फवाद-माहिराच्या सीरिजला भारतात विरोध! – Jo Bache Hain Samet Lo Controversy
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.