केंद्रीय पथकाने अनुभवली दुष्काळाची दाहकता, शेतकरी व महिला शेतमजुरांशी संवेदनशील संवाद
Marathwada Drought Assessment छत्रपती संभाजीनगर : करपलेली पिके, आटलेल्या विहिरी, कोरडी नदीपात्रे आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ ही मराठवाड्यातील दुष्काळाची हीच दाहकता केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन अनुभवली. केवळ आकडेवारी आणि अहवालांपुरते दुष्काळाचे आकलन मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांनी केले. पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता. राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग हेही दौऱ्यात सहभागी होते.
गुरुवारी रात्री विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पथकाला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. पर्जन्यमानातील तूट, खरीप पिकांची स्थिती, धरणांतील पाणीसाठा, भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा आणि रोजगाराच्या प्रश्नांबाबतची माहिती यावेळी मांडण्यात आली. या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असे पथकप्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याला शुक्रवारी ९ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून पथकाने पीक नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली. विशेष म्हणजे, पऱ्हाटी शेतात काम करणाऱ्या कापूस उत्पादक महिला शेतमजुरांशी संवाद साधण्यासाठी पथकाने ताफा थांबविला. महिलांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
दुष्काळाचा परिणाम पिकांसोबतच मजुरांच्या रोजगारावर आणि कुटुंबांच्या जगण्यावरही होत असल्याची जाणीव या संवादातून अधोरेखित झाली. शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमनी शिवारात केंद्रीय पथकाने शेतकरी विकास देविदास शिंदे यांच्या गट क्रमांक ८४ मधील १ हेक्टर २० आर क्षेत्रावरील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. मशागत, बियाणे, खते आणि मजुरीसाठी केलेला खर्च पावसाअभावी वाया गेल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. पथकाने विलास देविदास शिंदे यांच्यासह परिसरातील अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचे स्वरूप आणि पुढील काळातील अडचणी जाणून घेतल्या.
त्यानंतर केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नाणेगाव तसेच अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड परिसरातील शेतशिवारांची पाहणी केली. बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथे शेतकरी शिवाजी डोंगरे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची, अंबड तालुक्यातील किणगाववाडी येथे उदल हरीचंद शिहिरे यांच्या शेतातील करपलेली मोसंबीची झाडे आणि कोरडे पडलेले शेततळे पाहण्यात आले. याच परिसरात शिवलाल गांगे यांच्या शेतातील अदरक पिकाची, तर बालचंद गांगे यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्नाबाबतची अनिश्चितता मांडली पथकासमोर
जामखेड येथे संतोष गुरुके यांच्या शेतातील बाजरी पिकाची आणि गणेश जुंजार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीची पाहणी करून पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. अंबड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या गल्हाटी मध्यम प्रकल्पाचीही पथकाने पाहणी केली. प्रकल्प परिसरातील उत्तमराव साळुंके यांच्या शेतातील कापूस पिकासह अन्य शेतांतील ऊस पिकांचीही पाहणी करण्यात आली. पाण्याअभावी फळबागा आणि खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्नाबाबतची अनिश्चितता पथकासमोर मांडली.
जालना जिल्ह्यातील पाहणीनंतर केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा परिसरातील पाहणीनंतर अर्धमसला आणि रानमळा परिसरातील पिकांची स्थिती जाणून घेण्यात आली. अर्धमसला येथील शेतकरी सुरेश बाबुराव नरवाडे यांच्या गट क्रमांक ९४ मधील १.४० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाची, तर संतोष बाबुराव नरवाडे यांच्या गट क्रमांक ३३१ मधील ०.६७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाची पाहणी करण्यात आली.
चारा म्हणूनही उपयोग नसल्याने अडचणी वाढल्या
गेवराई येथील मदन रामभाऊ मोटे यांच्या ०.८० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचीही माहिती घेण्यात आली. पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशी, ऊस आणि तुती पिकांवर परिणाम झाला आहे. तुतीची वाढ खुंटल्याने अपेक्षित उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून करपलेल्या पिकांचा जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मदन रामभाऊ मोटे यांच्या तूर आणि कपाशी पिकांची पाहणी करताना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पथकाने घेतली. विहिरीतील पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चाने टँकर मागवावा लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही ऊस पीक जळून गेल्याचे सांगितले.
दुष्काळाच्या परिणामांकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
- बीड तालुक्यातील पारगाव जप्ती येथे शेतकरी सतीश सखाराम देवळे यांच्या गट क्रमांक ५० मधील ०.४० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर नांदुरा हवेली येथे सिंदफणा नदीच्या कोरड्या पात्राची पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला.
- करपलेली पिके, कोरड्या विहिरी, घटलेले जलस्रोत आणि रोजगाराची अनिश्चितता यातून शेतकरी व शेतमजुरांसमोरील आव्हाने स्पष्ट झाली.
- विशेषत: महिला शेतमजुरांशी संवाद साधण्यासाठी ताफा थांबविण्याच्या प्रसंगातून दुष्काळाच्या परिणामांकडे मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित झाली.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.