दोन वगळता रहिवाशांच्या इतर सर्व मागण्या मान्य
मुंबई : MHADA Meeting काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासंदर्भात रहिवाशांच्या मनात काही शंका होत्या, तसेच त्यांच्या काही मागण्या होत्या. त्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी एक बैठक घेतली. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रहिवाशांच्या सर्व प्रश्न आणि मागण्यांवर चर्चा करून रहिवाशांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यात आली.
वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात झालेल्या बैठकीत अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मागण्या प्रवीण दरेकर यांनी मांडल्या आणि त्याबाबत म्हाडाच्या उपाध्यक्षांनी सविस्तर खुलासे करून रहिवाशांच्या अनेक मागण्या मान्यही केल्या. त्यामुळे पुनर्विकासाबाबत निर्माण झालेला तिढ सुटला असून या प्रकल्पाला लवकरात लवकर सुरुवात होईल, असा विश्वास आमदार दरेकर यांनी व्यक्त केला.
या बैठकीला म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, भाजपा विधान परिषद आमदार चित्रा वाघ, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी, अभ्युदय नगर गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, विलास सावंत यासह अभ्युदय नगरमधील 48 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. या बैठकीत म्हाडा उपाध्यक्षांनी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण देखील केले.
रहिवाशांची दिशाभूल नको
आता रहिवाशांनी संमती पत्र देण्यास सुरुवात करावी आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी सकारात्मक व्हावे, असे मी केलेले आवाहन रहिवाशांनीही मान्य केले आहे. आता कोणीही यात राजकारण आणू नका, पाहिजे तर श्रेय तुम्ही घ्या पण रहिवाशांची दिशाभूल न करता हा प्रकल्प सुरू होण्यास मदत करा, असे आवाहनही दरेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले.
रहिवाशांच्या बहुतांश मागण्या मान्य
आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, रहिवाशांच्या मनात या प्रकल्पाबाबत काही शंका होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन या शंका दूर करण्याची जबाबदारी माझ्यावर आणि म्हाडा उपाध्यक्षांवर टाकली होती. त्या अनुषंगाने अभ्यूदय नगरमधील सर्व 48 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे आणि महासंघाचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते यांना बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते. रहिवाशांच्या मनातील सर्व प्रश्न आणि मागण्यांवर आम्ही चर्चा केली. रहिवाशांच्या बहुतांश मागण्या म्हाडाकडून मान्य करण्यात आल्या.
क्षेत्रफळ आणि भाडे वाढविण्याची मागणी
म्हाडा देऊ करीत असलेले 641 चौ. फूट क्षेत्रफळ वाढवून देण्याबाबत काही मोजक्या लोकांचा आग्रह आहे. हा प्रकल्प व्हायबल करायचा असेल तर या मागणीचा जास्त आग्रह लोकांनी धरू नये, अन्यथा विकासक या प्रकल्पातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर प्रकल्प आणखी पुढे जाईल, असे स्वतः उपाध्यक्षांनी सविस्तर आकडेवारी मांडून रहिवाशांना सांगण्याचा प्रयत्न केला.
वाढीव भाडे मिळण्याचीही मागणी रहिवाशांची होती. पूर्वी 20 हजार रुपये भाडे प्रस्तावित करण्यात आले होते, ते मुख्यमंत्र्यांनी 25 हजार रुपयांपर्यंत वाढवले. आता त्यातही वाढ करण्याची रहिवाशांची मागणी आहे. मी आणि उपाध्यक्ष आम्ही दोघेही मुख्यमंत्र्यांपर्यंत ही मागणी पोहोचवणार आहोत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.