Ad Advertisement Ad Advertisement

Mohan Bhagwat India Strength 2026 – वर्चस्व गाजवणे नव्हे, जगाला मदत करणे ही भारताची ताकद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
पद्म पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: Mohan Bhagwat India Strength – जगातील कोणतीही महासत्ता भारताने प्रगती करावी, असे इच्छित नाही. कारण जागतिक महासत्तांना आपले वर्चस्व कायम ठेवायचे असून, त्या ‘जो बलवान तोच टिकणार’ या तत्त्वावर विश्वास ठेवतात. मात्र भारताची विचारधारा वेगळी आहे. भारत आपला द्वेष करणाऱ्या देशांनाही अडचणीच्या काळात मदतीचा हात देतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ज्ञानयज्ञ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या पद्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान (निवृत्त) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बीड बायपास रोडवरील एमआयटी कॅम्पसमधील मंथन हॉल येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला.

डॉ. भागवत म्हणाले, जगाची सध्याची परिस्थिती विचित्र आहे. जागतिक महासत्ता आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी इतर देशांवर दबाव निर्माण करतात. इतरांना दबावाखाली ठेवूनच आपली ताकद आणि वर्चस्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भारताने प्रगती केली, तर या महासत्तांचे वर्चस्व संपुष्टात येईल. कारण भारताची भूमिका सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आणि गरजूंना मदत करण्याची आहे.

भारताच्या या भूमिकेचे उदाहरण देताना त्यांनी शेजारील देशांना केलेल्या मदतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, मालदीव संकटात असताना भारताने तेथे पाणी पोहोचवले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला आर्थिक मदत केली. पर्यावरणीय समस्यांचा सामना करणाऱ्या नेपाळला मदत केली, तसेच बांगलादेशालाही सहकार्य केले. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानमध्ये पूर आणि भूकंपासारखी संकटे आली, त्यावेळीही भारताने मदतीचा हात पुढे केला. भारताच्या दृष्टीने सामर्थ्याचा खरा उपयोग दुर्बलांचे रक्षण करणे आणि जगात शांतता प्रस्थापित करणे हा आहे. हाच भारताचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तरुण पिढीला गुलामगिरीच्या मानसिकतेचा प्रभाव नाही

देशातील तरुण पिढी गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रभावातून मुक्त असल्याचे सांगत डॉ. भागवत म्हणाले, एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे आणि सत्याच्या आधारावर बोलत असेल, तर तिच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी आजच्या तरुणांमध्ये आहे. तरुणांना खोटेपणा आवडत नाही. त्यांना आपला देश महान व्हावा, असे वाटते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तरुणांची ही विचारसरणी दिसून येत आहे. ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील चांगल्या कामांचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल, तर तिच्या हेतूंवर संशय घेण्यापेक्षा तिच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. एखाद्याने स्वार्थासाठी काही चांगले काम केले असेल, तरी त्याचा स्वार्थ बाजूला ठेवून त्या कामाचे अनुकरण करावे. पुढील पिढीने अशा चांगल्या कार्याचा वारसा पुढे चालवला पाहिजे. त्यातूनच खरे समाधान मिळते, असे ते म्हणाले.

पद्म पुरस्कार विजेत्यांचे कार्य लाखो लोकांसाठी प्रेरणादायी

पद्म पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. भागवत म्हणाले, समाजातील या व्यक्तींनी उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवून प्रचंड मेहनत घेतली आहे. आपल्या कार्यातून त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांनी कितीही संपत्ती कमावली असली, तरी समाजासाठी केलेल्या कार्यातून मिळणारे समाधान अतुलनीय आहे. अशा व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी पद्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून येथील नागरिकांना मिळत आहे.

विकसित भारताच्या उभारणीत तरुणांचे योगदान सर्वाधिक : जनरल अनिल चौहान

यावेळी बोलताना माजी सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले, २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर देशातील तरुण पिढीचे योगदान सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणच सर्वाधिक योगदान देतील आणि त्याचे सर्वाधिक लाभार्थीही तेच असतील. हे स्वप्न पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी भूतकाळातील यशस्वी अनुभवांतून शिकून आपली बौद्धिक ऊर्जा योग्य दिशेने वापरण्याची गरज आहे. विकसित देश एखाद्या राष्ट्राच्या विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाने सक्षम असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read About : Schools Property Tax Refund 2026- शाळांकडून वसूल केलेला कोट्यवधींचा मालमत्ता कर व्याजासह परत करा!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.