Ad Advertisement Ad Advertisement

Mukesh Kumar and Mohammed Siraj – मुकेश, सिराजचा प्रभावी मारा

न्यूझीलंड ‘अ’ संघ ४०० च्या पार

Mukesh Kumar and Mohammed Siraj : क्राइस्टचर्च : दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी लय प्राप्त करणारे मुकेश कुमार (५ बळी) आणि मोहम्मद सिराजने (४ बळी) न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध प्रभावी मारा केला, पण दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यजमानांना पहिल्या डावात ७८ धावांची आघाडी घेण्यापासून रोखू शकले नाही. न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात ३४६ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्वबाद ४२४ धावा उभारल्या. दिवस अखेरीस भारताने बिनबाद ३२ अशी मजल मारली असून, अद्यापही ४६ धावांनी पिछाडीवर असून यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन अनुक्रमे २० व ११ धावांवर खेळत आहे.

न्यूझीलंड ‘अ’ संघाने ३ बाद २१८ धावांवरून खेळण्यास सुरुवात करताना तिसऱ्या दिवशी २०६ धावांची भर घातली. यामध्ये तळाच्या फलंदाजांच्या चिवट खेळीचा समावेश आहे. कारण, एकावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ८ गडी बाद ३३८ होती, पण त्यानंतर त्यांनी शेवटचे २ गडी गमावण्यापूर्वी ८६ धावा जोडल्या. तत्पूर्वी, सिराज आणि मुकेशने अचूक टप्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले. सिराजचे पुनरागमन भारतीय व्यवस्थापनासाठी मोठा दिलासा असेल. कसोटी मालिकेतील दुसरी लढत या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सिराजने नव्या चेंडूने प्रभावी कामगिरी केली आणि त्याला दुसऱ्या टोकावरून मुकेशकडून उत्कृष्ट साथ मिळाली. काही वेळानंतर चेंडू जुना झाल्यामुळे सिराजला फारशी चमक दाखवता आली नाही.

मॅथ्यू ११० धावांवर बाद

सिराजने आपल्या पहिल्याच चेंडूवर बळी घेत मॅथ्यू बॉईलचा (११० धावा, १४ चौकार, १ षटकार) बळी घेतला. बॉईलने बाद होण्याअगोदर डीन फॉक्सक्रॉफ्ट सोबत चौथ्या गड्यासाठी २०८ धावा जोडल्या. भारताने दुसरा नवीन चेंडू घेतल्यानंतर फॉक्सक्रॉफ्ट फार काळ टिकला नाही. सिराजच्या एका धारदार इन-कटर चेंडूने फॉक्सक्रॉफ्टच्या (९३ धावा, ९ चौकार) पॅडला स्पर्श केल्यानंतर भारतीयांचे पायचीतचे अपील पंचांनी उचलून धरले.

चौघांची महत्वपूर्ण खेळी

चहापानानंतर तळाचे फलंदाज ख्रिश्चन क्लार्क (४१), फ्रेझर शीट्स (४०), जेडन लेनॉक्स (३२) आणि जॅरॉड मॅके (३३) यांनी महत्त्वपूर्ण खेळी करून न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. आकाश दीप प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला, तर कुकाबुरा चेंडूची चमक कमी झाल्यामुळे मुकेशलाही फलंदाजांना त्रास देता आला नाही. वॉशिंग्टन सुंदरच्या ऑफ-ब्रेक गोलंदाजीत धार नव्हती. यामुळे अनुकूल परिस्थितीत चांगली कामगिरी करण्याची त्याची क्षमता पुन्हा एकदा दिसून आली.

Read About : India vs New Zealand 5th T20I- भारताचा अखेरच्या लढतीमध्ये पराभव

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.