५ नोव्हेंबरपासून पहिले आवर्तन सुरू करणार, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय, जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Jayakwadi irrigation rotations छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पातून पैठण डाव्या व उजव्या कालव्यांमधून रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी हंगामासाठी एक अशी चार आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिले आवर्तन ५ नोव्हेंबरपासून सोडण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यास प्राधान्य देऊन ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणीवाटप होणार आहे. जानेवारीमध्ये पाण्याच्या उपलब्धतेचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त आवर्तनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदामंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, पैठणच्या सन २०२६-२७ या वर्षातील कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीस खासदार संदिपान भुमरे, आमदार सर्वश्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, रत्नाकर गुट्टे, विठ्ठलराव लंघे पाटील, प्रतापसिंह पाटील, अंबादास दानवे, अमरसिंह पंडित, राहुल पाटील, नारायण कुचे, हिकमत उढाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता, सिंचन क्षेत्र आणि प्रस्तावित आवर्तनांचे सादरीकरण जलसंपदा विभागाने केल होते. नियोजनानुसार पैठण डाव्या व उजव्या कालव्यासाठी रब्बी हंगामात प्रत्येकी ३ आणि उन्हाळी हंगामात प्रत्येकी १, अशी चार आवर्तने प्रस्तावित होती. त्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. रब्बीसाठी १७.४८ टीएमसी व उन्हाळ्यासाठी ४.५९ टीएमसी असा एकूण २२.०७ टीएमसी संभाव्य पाणीवापर अपेक्षित आहे. रब्बी हंगामात सुमारे ५८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे.
लोकप्रतिनिधींनी मांडल्या तक्रारी
परभणी आणि माजलगावसह कालव्याच्या शेवटच्या टोकावरील लाभक्षेत्रात पाणी पोहोचण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या. त्यामुळे ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणीवाटप करण्या येणार आहे. अनधिकृत पाणीउपसा, जोडण्या व मोटारींवर कारवाई, आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण घेऊन शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल, याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
पाणी लवकर सोडण्याची मागणी
प्रारंभी पहिले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून प्रस्तावित होते. मात्र दुष्काळी परिस्थिती, जमिनीतील ओलाव्याचा अभाव आणि पिकांची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी पाणी लवकर सोडण्याची मागणी केली. त्यानुसार ५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी कालव्यांची आवश्यक साफसफाई व दुरुस्ती तातडीने पूर्ण करावे, दोन आवर्तनांमधील अंतर १५ दिवस किंवा गरजेनुसार तीन आठवड्यांपर्यंत ठेवून सुधारित नियोजन करण्याच्याही सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
जानेवारीत फेर आढावा
पिण्याच्या पाण्यासाठी ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत आवश्यक आरक्षण आणि १० टक्के राखीव साठा विचारात घेऊन सिंचनाचे नियोजन करण्यात येत आहे. दोन आवर्तनांनंतर जानेवारीमध्ये पाण्याचा प्रत्यक्ष वापर व शिल्लक साठ्याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार मार्चमध्येही उपलब्धतेचा विचार करून अतिरिक्त आवर्तनाबाबत निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
सात बॅरेजेसमध्ये पाणी सोडणार
गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील सात बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या बॅरेजेसमध्ये पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांना लाभ होणार आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या आवर्तनादरम्यान बॅरेजेसमधील पाणीसाठा वाढविण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.