Ad Advertisement Ad Advertisement

Honey Trap in Chhatrapati Sambhajinagar – ‘1 रुपयात डेटिंग’ चे आमिष; भाजीपाला व्यापाऱ्यावर ‘हनीट्रॅप’

एक लाख उकळले : लॉजवर व्हिडिओ चित्रीकरण करून मागितली १० लाखांची खंडणी, युट्यूबरसह तिघांवर गुन्हा, दोघे गजाआड

छत्रपती संभाजीनगर : Honey Trap in Chhatrapati Sambhajinagar इन्स्टाग्रामवरील ‘१ रुपयात वन-डे डेटिंग’च्या जाहिरातीला भुललेल्या एका २५ वर्षीय भाजीपाला व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटले. लॉजवर नेऊन शारीरिक संबंधांचे गुप्तपणे व्हिडिओ चित्रीकरण करत या टोळीने व्यापाऱ्याकडून १ लाख रुपये उकळले. तसेच, एका युट्यूब चॅनलच्या मालकाच्या मदतीने पुन्हा १० लाखांची खंडणी मागून ब्लॅकमेल केले. या प्रकरणी १७ ऑक्टोबरला जिन्सी ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

२७ वर्षीय तरुणीसह आमीन बिलाल शेख (वय २५) आणि आफताब फिल्म या युट्यूब चॅनलचा मालक तकी हसन खान (वय ७५) अशी आरोपींची नावे आहेत. यातील तरुणी आणि आमीन यांना अटक केली असून न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैसर कॉलनी भागातील २५ वर्षीय तरुण जाधववाडी येथील न्यू सब्जी मंडीमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. अडीच महिन्यांपूर्वी त्याला इन्स्टाग्रामवर १ रुपयात एका दिवसासाठी डेटिंग अशी पोलो डेटिंग ॲपची जाहिरात दिसली. तरुणाने हे ॲप डाऊनलोड करून १ रुपया आणि नंतर १९९ रुपये सर्व्हिस फी भरली. २२ ऑगस्ट रोजी या ॲपवर त्याची मुस्कान नावाच्या महिलेशी ओळख झाली. व्हॉट्सॲपवर बोलणे झाल्यानंतर मुकुंदवाडी भागात ती बुरखा घालून त्याला भेटली.

तिथून ते दोघे एपीआय कॉर्नर येथील हॉटेल शांग्रीला लॉजवर गेले. तिथे ७०० रुपयांत एका तासासाठी रूम बुक करून त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. जातेवेळी महिलेने तरुणाकडून २ हजार रुपये घेतले. मात्र, याच दरम्यान तिने तरुणाच्या नकळत मोबाईलमध्ये गुप्तपणे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

‘आगे का पिच्चर अभी बाकी है..’ म्हणत उकळले १ लाख

५ सप्टेंबर रोजी आरोपी आमीन शेख याने तरुणाच्या व्हॉट्सॲपवर लॉजमधील फोटो पाठवून ‘आगे का पिच्चर अभी बाकी है, क्या करने का बोलो?’ अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरुणाने चुलत भावाला हा प्रकार सांगितला. ८ सप्टेंबर रोजी रात्री जिन्सी चौकात झालेल्या भेटीत आमीन शेख आणि संबंधित महिलेने लॉजमधील व्हिडिओ दाखवून १० लाख रुपयांची खंडणी मागितली. बदनामी होण्याच्या भीतीने त्यांना १ लाख रुपये रोख देऊन प्रकरण मिटवले आणि महिलेचा कबुलीनामा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला. त्यावेळी तिचे खरे नाव वेगळेच असल्याचे समोर आले.

युट्यूबरची एन्ट्री; पोलीस ठाण्याचे नाव घेताच ठोकली धूम!

प्रकरण मिटले असे वाटत असतानाच १५ ऑक्टोबर रोजी तरुणी आणि आमीन या दोघांना आफताब फिल्म या युट्यूब चॅनलचा मालक तकी हसनची भेट घेतली. तकी हसनने व्यापाऱ्याच्या काकांना फोन केला. ‘तुमच्या पुतण्याचा व्हिडिओ आणि ती महिला माझ्याकडे आली आहे, त्यांना आणखी पैसे हवे आहेत,’ असे सांगून काकांना मजनू हिल गार्डन येथे बोलावले. तिथे तिन्ही आरोपींनी मिळून आणखी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, काकांनी न घाबरता आपण जिन्सी पोलीस ठाण्यातच जाऊन प्रकरण मिटवू, असा पवित्रा घेताच, युट्यूबर तकी हसनने मोबाईल बंद करून पळ काढला.

Read About : AI Economy – एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दरी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.