Ad Advertisement Ad Advertisement

अभिनयाचा जिवंत ज्वालामुखी, नाना पाटेकर

मुंबई:आ गये मेरी मौत का तमाशा देखने? .. कफन नहीं मिला तो क्या हुआ, ये जमीन तो अपनी है, ये आसमान तो अपना है। इस मिट्टी में मिल जाऊंगा, पर झुकूंगा नहीं!”

मित्रांनो, हा नुसता डायलॉग नाही, तर एका अशा माणसाची गर्जना आहे ज्याने सिल्व्हर स्क्रीनवर अभिनयाची नवी व्याख्या लिहिली! होय सांगतोय नाना पाटेकर यांच्या विषयी.. नानांची अकाली एक्झिट आपल्या सर्वांना मोठा धक्का देऊन गेली आहे. नाना गेले असले तरी संघर्षाची बीजे मराठी मनात कायमची पेरून गेली आहेत.

तुम्हाला माहीत आहे का? आजवर करोडो मनांवर राज्य करणाऱ्या या महानायकाने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी मुंबईच्या रस्त्यांवर जेब्रा क्रॉसिंग पेंट करण्याचं काम केलं होतं. गरिबीशी प्रचंड संघर्ष करत, केवळ एका चहा आणि पाववर दिवस काढणारा हा अवलिया मराठी रंगभूमीवरून बॉलिवूडचा ‘शहेनशहा’ कसा बनला? आणि करोडो रुपये कमवूनही हा माणूस एका छोट्याशा खोलीत साधं जीवन कसं जगला?नानांचा हा प्रवास जितका थक्क करणारा आहे, तितकाच भावुक करणाराही आहे. चला तर मग, आजच्या या विशेष वृत्तांत मध्ये जाणून घेऊयात अभिनयाचा जणू जिवंत ज्वालामुखी असलेला नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास!

नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर.त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी कोकणातील मुरुड-जंजिरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय अचानक बुडाला आणि नानांवर गरिबीचा डोंगर कोसळला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी मुंबईत रस्त्यांवर जेब्रा क्रॉसिंग पेंट करण्याचं काम केलं. इतकंच नाही तर चित्रपटांचे पोस्टर्स देखील रंगवले.जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील अभिनेत्याला नाटकाची पंढरी सापडली.

नाटकातून रंगभूमी गाजवल्यावर नानांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला. १९७८ मध्ये आलेला ‘गमन’ हा त्यांचा पहिला चित्रपट. नानानां सुरुवातीला छोटे-मोठे रोल्स मिळाले. पण त्यांना खऱ्या अर्थाने पहिलं यश आणि ओळख मिळवून दिली ती एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’ आणि ‘प्रतिघात’ या चित्रपटांनी! ‘अंकुश’मधील एका बेकारीने चिडलेल्या तरुणाची भूमिका नानांनी अशी जिवंत केली की, प्रेक्षक थिएटर्समध्ये टाळ्या वाजवायला मजबूर झाले.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतून सुरू झालेला हा प्रवास बॉलिवूडमध्ये एका वादळासारखा पसरला. ‘परिंदा’ (१९८९) चित्रपटात त्यांनी साकारलेला ‘अण्णा’ हा गँगस्टर आजही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट व्हिलन मानला जातो. यानंतर ‘प्रहार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘राजनीती’ यांसारख्या चित्रपटांनी इतिहास घडवला.तर दुसरीकडे मराठीतील ‘नटसम्राट’ चित्रपटाने मराठी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

नाना पाटेकर यांच्या अभिनयाची एक वेगळीच स्टाईल होती. त्यांची डायलॉग डिलिव्हरी म्हणजे जणू काही ‘एके-४७’ मधून सुटणाऱ्या गोळ्या! आवाजातील चढ-उतार, चेहऱ्यावरील आक्रमकता आणि अचानक येणारा शांतपणा प्रेक्षकांना स्तब्ध करत असे.

त्यांचे काही डायलॉग्स जे लोकांच्या ओठांवर आजही आहेत:
“एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है!” (क्रांतिवीर)
“अगोदर माणूस व्हा, मग हिंदू किंवा मुसलमान व्हा!”
“भगवान का दिया हुआ सब कुछ है… दौलत है, शोहरत है, इज्जत है…”
हे डायलॉग असलेली चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये रिलीज झाले तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतले. आज सोशल मीडियाच्या जमान्यात जेव्हा या डायलॉगचे रील व्हायरल होतात, तेव्हा लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतो.

करोडो रुपये कमवूनही नाना एका छोट्याशा घरात साधेपणाने जगत होते.नाना शेतात राहायचे. शेतीचे काम करायचे.ग्लॅमर आणि पार्ट्यांपासून ते नेहमी दूर राहिले. २०१५ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला, तेव्हा नानांचे संवेदनशील मन हेलावले. त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करणे, नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, जल संवर्धन हे कार्य नाम फाउंडेशन अहोरात्र करत आहे. अशा कामांमुळे नाना हे रील लाइफ हिरो असूनही खऱ्या आयुष्यातही लाखो लोकांचे ‘रिअल हिरो’ बनले.

नाना पाटेकर नेहमी म्हणायचे, “आयुष्यात संघर्ष तर येणारच, त्याशिवाय जगण्याला अर्थ काय?”
जन्माबद्दल आणि मृत्यू बद्दल त्यांचे विचार अगदी स्पष्ट, माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, मग एवढा अहंकार कशासाठी? कोणाचे अश्रू पुसता आले, तर तेच सर्वात मोठे पुण्य आहे. निसर्गाने जे आपल्याला दिले आहे, ते समाजाला परत देणे हेच माणसाचे कर्तव्य आहे.

आज नाना आपल्यात नाहीत परंतु नटसम्राट मधला त्यांचा डायलॉग मात्र त्यांच्या अकाली एक्झिटला थेट लागू होतो…”कुणी घर देता का रे घर? एका वादळाला कुणी घर देता का? .. अरे, जन्माला आलो, जगलो, हसलो, रडलो.. पण शेवटी काय उरलं? रिकामी ओंजळ! माणसाने माणसासारखं जगावं, दुसऱ्याच्या सुखात सुख मानावं.. कारण, हा रंगमंच कधी रिकामा होईल हे कुणालाच माहीत नाही!”नाना तुमच्या अकाली जाण्याने मराठी रंगमंच, चित्रपटाच्या शूटिंगचे सेट,स्टुडिओ.. आता असाच रिकामा झाला आहे.
मित्रांनो, नाना पाटेकर हे फक्त एक नाव नव्हतं, तर ती एक विचारसरणी होती आणि आहे. सामान्यातल्या सामान्य माणसासाठी जगणारा हा महानायक आपल्याला खूप काही शिकवून गेला आहे. नाना शरीर रूपाने जरी गेले असले तरी विचारांच्या रूपाने आजही जिवंत आहेत.नानांच्या संघर्ष, विचारातून प्रेरणा घेत आजच्या तरुणाईने रडण्यापेक्षा लढावे हिच नाना पाटेकर यांना खरी आदरांजली ठरेल.

Read About : Nana Patekar Death : रात्री २.३० वाजता मित्राला मेसेज; पहाटे घरात बेशुद्धावस्थेत आढळले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.