Ad Advertisement Ad Advertisement

Nanded Extortion Case – व्यापाऱ्याकडून 1 लाखाची खंडणी उकळणारा दिग्दर्शक जेरबंद

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदारांना उडवून देण्याचा कट असल्याची भीती दाखवून पैशांची मागणी; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड Nanded Extortion Case : माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि जिल्ह्यातील ४ आमदारांना उडवून देण्याचा कट रचला होता, अशी भीती दाखवून एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या एका आरोपीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबईतून अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, नांदेडमधील व्यापारी महेश कृष्णाजी तुतारे (वय ३३, रा. गुरुद्वारा गेट नं. २, धनगर गल्ली, नांदेड) यांनी फिर्याद दिली असून अटक केलेल्या आरोपीचे नाव रवी उर्फ रविंद्र गौतम रोकडे (वय ३९, मूळ रा. आष्टी, ता. आष्टी, जि. बीड, ह.मु. कॅन्सर हॉस्पिटलमागे, सिडको, नांदेड) असे आहे.

याबाबत नांदेडमधील वजिराबाद पोलिस ठाण्यात गुरनं ५५२/२०२६ कलम ३०८(४) अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेश तुतारे आणि आरोपी रवी रोकडे यांची जुनी ओळख होती. आरोपी रोकडे गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी तुतारेंना फोन करून पैशांची मागणी करत होता व पैसे न दिल्यास धमकावत होता. दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.४२ वाजता फिर्यादी तुतारे घरी असताना आरोपी रोकडेने मोबाईलवर संपर्क साधला आणि १ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने संतापून धमकी दिली- मी तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि नांदेडच्या चार आमदारांना एकाच दिवशी उडवण्याचा प्लॅन केला होता.

माझ्या पाठीशी मोठया लोकांचे हात असून संपूर्ण नांदेड जिल्हा माझे काहीच बिघडू शकत नाही. एक लाख रुपये दिले नाहीत, तर आयुष्यभर मला लक्षात ठेव. अशी धमकी दिली. या गंभीर धमकीनंतर फिर्यादीने त्याच दिवशी वजिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार महेश कोरे आणि त्यांच्या पथकाने मुंबईतील पेडर रोड येथील भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातून आरोपी रवी रोकडे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी नांदेडला वजिराबाद पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

आरोपीस पोलीस कोठडी

आरोपी रवी रोकडे याने नेमक्या कोणत्या हेतूने माजी मुख्यमंत्री व आमदारांच्या नावाचा संदर्भ देऊन कट रचल्याची धमकी दिली, यामागे त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? आणि इतर नेत्यांबाबत त्याचा काही घातपाताचा बेत आहे का? याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला नांदेडला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सी. व्ही. बोयणेे करीत आहेत.

Read About : MS Dhoni IPL Retirement – ‘एमएस धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स नाही’; 19 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.