Ad Advertisement Ad Advertisement

FDA Action in Sambhajinagar झेप्टो, बजाज ऑटो कँटिनचा परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगरात एफडीएच्या कारवाया

FDA Action in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) वडगाव कोल्हाटी येथील ज्योतिर्लिंग फुड्स, कांचनवाडी येथील झेप्टो लिमिटेड तसेच सोडेस्को इंडिया प्रा.लि.च्या बजाज ऑटोमधील कँटिनचा अन्न परवाना निलंबित केला आहे. ज्योतिर्लिंग फुड्सच्या कारखान्यातून २६.७८ लाख रुपयांचा तेलसाठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने मंगळवारी (दि.१३) वडगाव कोल्हाटी येथील ऑइल रिपॅकिंग युनिट मे. ज्योतिर्लिंग फुड्सवर या वनस्पती तेल रिपॅकिंग आणि प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याची अचानक तपासणी केली असता, अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. या कारवाईत सुपक ब्रँडचे करडई तेल (८७४ किलो), फिल्टर शेंगादाणा तेल (७५७ किलो), रिफाइंड पोमिलन तेल (१,१८६ किलो), रिफाइंड सोयाबीन तेल (२,१५९ किलो) तसेच राधिका गोल्ड ब्रँडचे रिफाइंड सोयाबीन तेल (८,७३५ किलो) असा २६.७८ लाख रुपयांचा १३,७११ किलो तेलसाठा साठा जप्त करण्यात आला. अन्नपदार्थ साठवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. नियमानुसार नॉन-टॉक्सिक आणि गंज न लागणाऱ्या मटेरिअल ऐवजी तेल साठवणुकीसाठी थेट लोखंडी टाक्यांचा वापर केला जात असल्याचे आढळले.

झेप्टोकडून अन्न सुरक्षेचे गंभीर उल्लंघन

अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी कांचनवाडी येथील झेप्टो लिमिटेडचा अन्न परवाना एफडीएने तत्काळ निलंबित केला. अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे यांनी झेप्टोच्या गोदामाची अचानक तपासणी केली होती. त्यावेळी साठवणुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले होते. अन्नपदार्थ थेट जमिनीवर व भिंतीला लागून ठेवलेले होते. गोदामात गंजलेले व तुटलेले रॅक, सर्वत्र धूळ, घाण आणि कोळिष्टके आढळली. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी परवाना निलंबनाचे आदेश जारी केले.

बजाज ऑटो कँटिनमध्ये सुधारणा नाही

वाळूजच्या बजाज ऑटोमधील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि. या कँटिनचा अन्न परवाना एफडीएने निलंबित केला आहे. सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी कँटिनची तपासणी करून सुधारणा नोटीस बजाजवली होती. कंपनीच्या खुलाशानंतर पुन्हा १२ ऑक्टोबररोजी फेरतपासणी करण्यात आली. मात्र, त्यात गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले.

Read About : Desert Transformation : गाढवांनी केला नेगेव वाळवंटाचा कायापालट – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.