Ad Advertisement Ad Advertisement

PM Modi on ideological Naxalism- ‘दिमागी नक्षलवाद्यांचा’ धोका कायम-मोदी

छत्तीसगडमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी

जगदलपूर : PM Modi on ideological Naxalism देशातून सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट झाला असला तरीही ‘दिमागी नक्षलवाद्यांनी’ अनेक राजकीय पक्षांमध्ये आणि संघटनांमध्ये घुसखोरी केली आहे. ते लोकांना संविधान व लोकशाहीविरोधात भडकावत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधकांवर केला. आपल्याला एकजूट दाखवत या ‘दिमागी नक्षलवाद्यांची’ ओळख पटवून त्यांचा पराभव करावा लागेल आणि देशाला सुरक्षित करावे लागेल, असे आवाहन मोदींनी केले.

छत्तीसगडमधील बस्तर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शिबिरात सुरक्षा जवानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांनी गोल रिंगण करून नृत्य केले. मोदींनी जवानांना मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड केली. गणवेशातील भारताच्या शूर जवानांसोबत सण साजरा करण्याची आपली परंपरा मोदी यांनी या वर्षीही कायम ठेवली. या प्रसंगी मोदी म्हणाले की, गेल्या ३१ मार्च रोजी देश नक्षलवादमुक्त झाला. परंतु, नक्षलवादाचा धोका अद्याप संपलेला नाही.

सरकारने नक्षलवादी आणि फुटिरतावाद्यांच्या ‘फंडिंग’ला खूप मोठा धक्का दिला. नक्षलवादाचा अंत हा देशाच्या योग्य धोरणांचा आणि मजबूत राजकीय इच्छाशक्तीचा विजय आहे. नक्षलवादी संपले, पण धोका टळलेला नाही. जंगलातील सशस्त्र नक्षलवादी गायब झाले. पण, दिमागी नक्षलवाद्यांनी अनेक संघटनांवर ताबा मिळवला. आजही ते लोकांना देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीविरुद्ध भडकावत आहेत. त्यांनी अनेक राजकीय पक्षांमध्ये आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये घुसखोरी केली आहे. आपल्याला त्यांना ओळखायचे आहे. त्यांचा पराभव करायचा आहे आणि देशाला सुरक्षित करायचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

२०१४ नंतर परिस्थिती आणि सुरक्षा दलांचे मनोबल बदलू लागले. ४७ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले की, गेल्या वर्षभरात कर्तव्यावर असताना एकाही सीआरपीएफ जवानाला आपला जीव गमवावा लागला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी नक्षलवाद्यांचे फंडिंग रोखले. बनावट चलनाचे नेटवर्क उद् ध्वस्त करण्यात आले. यामुळे केवळ त्यांची आर्थिक कंबरच मोडली नाही तर त्यांची संपूर्ण पुरवठा साखळीच रोखली गेली. परिणामी शस्त्रांस्त्रांचा पुरवठा बंद झाला आणि नक्षलवाद्यांची भरती रोखली गेली, असा दावा मोदींनी केला.

मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील लोहारी सावंगा गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे रविवारी कौतुक केले. फडणवीसांचे हे पाऊल अत्यंत भावुक करणारे असल्याचे मोदींनी म्हटले आहे. ट्विटरवरील (एक्स) पोस्टमध्ये मोदी म्हणतात की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे नागपूरमधील नरखेड येथील लोहारी सावंगा गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणे आणि अरुणाबाई व रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम करण्याचे हे पाऊल अत्यंत भावुक करणारे आहे. मुख्यमंत्र्यांचा हा उपक्रम संवेदनशीलतेचे दर्शन घडवतो, ज्या संवेदनशीलतेने महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार शेतकऱ्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे, असे मोदींनी नमूद केले.

Read About : Mahayuti alliance tensions in Maharashtra- महायुतीत पुन्हा धुसफूस?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.