Ad Advertisement Ad Advertisement

Pregnant Tigress Killed in Kinwat : हक्काचे अधिवास क्षेत्र शोधत असतानाच ‘ती’ चिरडल्या गेली! 2026

किनवटमधील वाघिण मृत्यू प्रकरण : अगोदरच वाघाचे जोडपे असलेल्या ठिकाणी आणून सोडण्याचा निर्णय बेतला जीवावर

Pregnant Tigress Killed in Kinwat छत्रपती संभाजीनगर : किनवट तालुक्यात (जि.नांदेड) शनिवारी (दि.१७) रेल्वे अपघातात दगावलेली वाघिण महिनाभरापूर्वीच ताडोबा अभयारण्यातून किनवट परिसरात सोडण्यात आली होती. विशेष म्हणजे ती गर्भवती होती. शिवाय याच परिसरात वाघाचे आणखी एक जोडपे होते. यामुळे तिला येथे सोडू नये अशी सूचना स्थानिक वन अधिकाऱ्यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत तिला याच परिसरात सोडण्यात आले. पुढे नवीन हद्द निश्चित करताना रेल्वे रूळ ओलांडताना ही ताडोबातील वाघिण मालगाडीखाली चिरडल्या गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

किनवट (जि. नांदेड) तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्रांतर्गत मदनापूर गावाजवळ किनवट-नांदेड रेल्वेमार्गावर ४ वर्षीय, वाघिण छिन्नविच्छिन्न अवस्थेत शनिवारी (दि.१७) पहाटे तीन वाजेच्या सुमारास आढळून आली. रेल्वे मालगाडीच्या धडकेत ही वाघिण दगावली. कोणीतरी रेल्वेखाली चिरडल्या गेल्याची माहिती रेल्वेचालकाने स्टेशन मास्टरला दिली. पुढे जागेवर पाहणी केली असता ती वाघिण असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ ही माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर शनिवारी दुपारी वन विभागाने या घटनेचा अधिकृत खुलासा केला. दरम्यान वाघिण दगावल्यानंतर वन विभागाची यंत्रणा जागी झाली आहे.

बोधडी ते किनवट असा जवळपास १० किमीचा रेल्वेट्रॅक असून, या मार्गावरील रेल्वेचा वेग कमी ठेवावा अशी सूचना आता रेल्वे प्रशासनाला करण्यात आली आहे. तथापि, किनवट परिसरात घनदाट जंगल असून येथे वाघांचा अधिवास असल्याचे वन विभागाला माहीत असताना आजवर ही उपाययोजना का केली नाही? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

ताडोबातून मागील महिन्यातच आणले होते किनवटला

वाघिणीच्या मृत्यूने वन विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वन्यजीव अभ्यासकांतून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत असून तत्काळ वाघ्र संचार प्रकल्प मंजूर करण्याची मागणी होत आहे. दरम्यान दगावलेली वाघिण गर्भवती होती. तिला मागील महिन्यातच ताडोबा अभयारण्यातून किनवटमध्ये सोडण्यात आले होते. तिला ज्या परिसरात सोडले तेथे अगोदरच वाघाचे एक जोडपे होते. ही वाघिण येथे आल्यावर तिने आपले क्षेत्र (टेरोटरी मार्क) निश्चित करण्यास सुरूवात केली. यावेळी येथे अगोदरच एक जोडपे असल्याने तिने नवीन क्षेत्र निवडण्यास प्रारंभ केला. दरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना दुर्देवाने ती चिरडल्या गेली. तिला दुसऱ्या ठिकाणी सोडले असते तर कदाचित आज ती जिवंत असती अशी माहिती सूत्रांनी दिली.

उच्चस्तरीय चौकशी सुरू

वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी सुरू झाली आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल नागपूर कार्यालयाकडून मागविण्यात आला आहे. शिवाय कोणत्या आवश्यक उपाययोजना हव्यात याचा देखील स्वतंत्र अहवाल मागविण्यात आला आहे.

आजवर १४१ वाघांचा मृत्यू

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान देशभरात १४१ वाघ दगावले. यात महाराष्ट्रातील २८ वाघांचा समावेश आहे. दर मागील वर्षी देशभरात १७४ वाघ दगावले होते. वर्ष २०१२ पासून सर्वाधिक मृत्यू २०२३ मध्ये नोंद झाले. संख्या १८२ इतकी होती. जानेवारी, मार्च, मे आणि डिसेंबर हे सर्वाधिक मृत्यूंचे महिने ठरले आहेत. २०१२-२०२५ दरम्यान महाराष्ट्रात ५१ वाघांची शिकार झाली.

व्याघ्र संचार प्रकल्पाची मागणी

किनवट परिसर मराठवाड्यातील वाघांचे माहेरघर तसेच प्रवेशद्वार आहे. पैनगंगा, टिपेश्वर अभयारण्यापासून हा परिसर जवळ आहे. परिणामी येथील वाघ किनवटमार्गे मराठवाड्यात भ्रमण करतात. येथे नेहमी वाघांचा वावर असतो. यामुळे व्याघ्र संचार प्रकल्प मंजूर करण्याची मागणी होत आहे.

Read About: Arvind Swamy Business Journey : रोजा फेम अभिनेता अरविंद स्वामी स्वतःला ‘वाईट व्यावसायिक’ का मानतात?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.