Ad Advertisement Ad Advertisement

Private Billionaires and National Security – देशाचं भवितव्य खाजगी धनाढ्यांच्या हाती

Private Billionaires and National Security : शत्रुपक्षाच्या माणसाला कामवेडा करून नादाला लावणं हा हेरगिरीतला फार प्राचीन डाव आहे. प्रत्येक शतकात राज्यकर्त्यांनी शत्रुपक्षाला नमवण्यासाठी मादक ॲटम बाँब वापरलेत. चीननं तो डाव वापरलाय.

चीनच्या हेरखात्याच्या एलिस हुआंग या रूपसुंदरीनं एनव्हिडिया या कंपनीचे कार्यकारी संचालक जेन्सन हुआंग यांना नादी लावलं आणि अमेरिकेच्या एआय उद्योगाची माहिती पळवली, असा आरोप अमेरिकेच्या एफबीआय तपास यंत्रणेनं केला आहे. जेन्सन यांची चौकशी सुरू झालीय. एनव्हिडिया कंपनीच्या संचालक मंडळाने जेन्सन यांना हाकलून लावलं. ते इतकं सोपं नव्हतं. एनव्हिडिया ही कंपनी जेन्सननीच निर्माण केली आणि मोठी केली. जेन्सनचे काँटॅक्ट्स आणि इंजिनियरिंग कौशल्य या दोन असामान्य गोष्टीमुळंच एनव्हिडियानं एआयच्या जागतिक बाजाराचा ९० टक्के हिस्सा ताब्यात घेतला.

जेन्सनच्या अनुपस्थितीत एनव्हिडियाचं काय होईल, या प्रश्नाचं उत्तर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाकडं या संपूर्ण काळात नव्हतं. चीन म्हणतंय की सारं प्रकरण बकवास आहे. चीनवर बंधनं लादण्यासाठी अमेरिका डाव रचतंय. डोनाल्ड ट्रम्प गुळमुळीत आहेत, ते आत्ता एक बोलतात, उद्या दुसरं बोलतात. एलिस हुआंग, सिंगापूरमधे मेगास्पीड या कंपनीत काम करत होत्या. गेल्या दोन वर्षांत त्यांनी जेन्सन यांच्याशी दोस्ती वाढवली. तैवानमध्ये त्या जेन्सनना भेटत. एलिसनी एनव्हिडियाकडून एका वर्षात ४.५ अब्ज डॉलर किमतीच्या चिप खरेदी केल्या. इतका मोठा व्यवहार करायचा म्हणजे चर्चा आणि भेटणं आलंच. जेन्सन यांच्या ‘कामा’ची कक्षा रुंदावली. व्यापार उद्योगातली माणसं म्हणतात की यात काही वावगं नाही, सारं क्षम्य असतं. लाच द्या, सेक्सचा वापर करा, तंगड्या मोडा, मनगटं पिरगळा, सर्व क्षम्य असतं.

बायजिंगमधले सीआयएचे अधिकारी अमेरिकन सरकारला सांगत होते की एलिसपासून सावध रहा. एलिस चीनची हेर आहे, ती अमेरिकन चिप उद्योगातली गुपितं पळवतेय. एफबीआयनं सीआयएच्या माहितीचा पाठपुरावा केला. त्यांना सीआयएच्या इशाऱ्यात तथ्य आढळलं. अडचण अशी की जेन्सन हे ट्रम्प यांचे भिडू. जेन्सनच्या सल्ल्यावरून ट्रम्प अमेरिकेचं एआय धोरण ठरवत. जेन्सनच्याच सांगण्यावरून ट्रम्प यांनी एआय उद्योगात चार ट्रिलियन डॉलर्स गुंतवणार असं जाहीर केलं. ट्रम्प यांच्या निवडणूक निधीला जेन्सन आडवाटेनं पैसे देत.

जेन्सन यांचे सहकारी पैसे देत, जेन्सन नामानिराळे; त्यामुळं अमेरिकन सरकार जेन्सनना हात लावायला धजावत नव्हतं. ट्रम्प यांनी जेन्सनना विचारणा केली की काय भानगड आहे. त्यावर जेन्सन म्हणाले की, संबंध आहेत खरे पण एलिस हेर नाही. कोणीही माणूस बायकांमध्ये अडकला असला की ट्रम्प यांना त्याबद्दल अपार कणव निर्माण होत असते. एप्सटिन. ट्रम्प यांनी जाहीर करून टाकलं की जेन्सन ग्रेट माणूस आहे, त्याच्या वर्तणुकीत काहीही गैर नाही. ट्रम्प क्षी जिनपिंग यांना भेटायला गेले होते तेव्हा मुद्दाम वाटेत थांबून जेन्सन यांना विमानात घालून आपल्या सोबत नेलं. थोडक्यात जेन्सन हा ग्रेट माणूस होता असं सरकारचं मत होतं.

अमेरिकन लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाल्यावर हे प्रकरण उघड झालं. अमेरिकन संसद जेन्सनची मापं काढणार ही शक्यता लक्षात घेऊन एफबीआयनं उचल खाल्ली, प्रकरण उकरून काढलं. एफबीआयचा खुन्नस होताच. एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांना ट्रम्प यांनी बडतर्फ केलंय, खटले भरून त्यांना तुरुंगात पाठवायच्या खटपटीत ट्रम्प आहेत. ट्रम्प एफबीआयचा उपयोग स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी करतात हे एफबीआयला आवडत नाही. तेही संधीची वाट पहात असावेत. संसदेची दोन्ही सभागृह ट्रम्पच्या हातातून गेल्यावर त्यांनी उचल खाल्ली असावी. एनव्हिडियाचं वार्षिक उत्पन्न आहे ३०० अब्ज डॉलर्स. एनव्हिडियाचं बाजारातलं मूल्य आहे ४.१ ट्रिलियन डॉलर्स. बाजारमूल्य पाहून लोकांनी त्या कंपनीत पैसे गुंतवलेत. अनेक लोकांचे पेन्शनचे पैसेही त्या कंपनीत गुंतलेत. कंपनी गाळात गेली तर त्यात खूप लोकांचं खूप नुकसान होणार आहे. एकूण बाजारही कोसळण्याची शक्यता आहे.

एनव्हिडियाच्या चिप अमेरिकन सरकार, लष्कर वापरतं. काही अंशी अमेरिकेची सुरक्षाही एनव्हिडियावर अवलंबून आहे. एनव्हिडियानं लोच्या केला तर त्याचा परिणाम अमेरिकन सरकारवर होईल. अमेरिकेच्या सुरक्षेला घातक अशी माहिती हेरगिरीवाटे चीनकडं गेली तर अमेरिकेची मोठीच पंचाईत होऊ शकते. म्हटलं तर अमेरिकेची सुरक्षा जेन्सनच्या हाती होती, आहे. एनव्हिडिया गाळात जाणं अमेरिकन अर्थव्यवस्थेला परवडणारं नाही. एलॉन मस्क स्टारलिंक सेवा चालवतात. स्टारलिंकचे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. ते उपग्रह माहिती गोळा करून उपग्रह आणि इंटरनेटचा वापर करून जगभर लोकांना उपलब्ध करून देतात. रशियाचं बाँबर विमान निघालंय हे स्टारलिंकमुळं युक्रेनला कळतं. युक्रेनची विमान विरोधी तोफ सज्ज झाल्याचं रशियाला कळतं.

आधुनिक काळात युद्ध माहितीच्या आधारे होत असतात. अचूक आणि त्याच क्षणी मिळणाऱ्या माहितीवर जय पराजय ठरत असतो. माहिती खाजगी लोकांच्या हाती. युक्रेन-रशिया युद्धाचं भविष्य स्टारलिंक, एलॉन मस्क ठरवणार. अमेरिकन लष्कर संदेशवहनासाठी स्टारलिंकवर अवलंबून असतं. स्टारलिंकचे मालक एलॉन मस्क लहरी आहेत. एकदा त्यांनी युक्रेनला संदेशवहन सेवा नाकारली होती. अमेरिकेचं परदेश धोरण आणि अमेरिकन लष्कराची कार्यक्षमता एलॉन मस्कच्या लहरीवर अवलंबून. देशाच्या हिताचे निर्णय देशाच्या वतीनं, देशाच्या संसदेनं आणि सरकारनं घ्यायला हवेत. ते जेन्सन आणि मस्क यांच्या हाती ठेवणं कितपत योग्य? मस्क आणि ट्रम्प दोघेही लहरी आहेत. त्यांचं डोकं ठिकाणावर असणं नसणं यावर जगाचं भवितव्य अवलंबून आहे.

एनव्हिडियाचा सर्वेसर्वा जेन्सन हुआंग यांना एक सुंदरी भेटते, तिच्या नादी लागून जेन्सन अमेरिकेच्या परदेश धोरणाचे तीन तेरा वाजवतात.
जग अशा रीतीनं चालणार?

निळू दामले
damlenilkanth@gmail.com

Read About : Nvidia CEO Resignation : ‘एनव्हिडिया’तील राजीनामा
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.