महिलेने बोलावले अन् तिच्या दोन साथीदारांनी बेदम मारहाण करून लुटले
छत्रपती संभाजीनगर : Honey Trap Crime Sambhajinagar आधीची फक्त तोंड ओळख तरीही जवळीक साधण्याच्या उद्देशाने मुलांसाठी पुलाव घेऊन ये, अशी गळ घालून एका महिलेने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला (एमआर) रात्री घराकडे बोलावून घेतले. तोही सेव्हनहिलवरून थेट बीड बायपासवरील आलोकनगरात पुलाव घेऊन गेला. तिथे तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून ती त्या एमआरच्या दुचाकीवर बसून बाहेर जाणार तेवढ्यात महिलेच्याच दोन साथीदारांनी त्यांना अडवले. त्यांनी महिलेला घरी पाठवून एमआरला अंधारात नेऊन बेदम मारहाण करून लुटले. शनिवारी (दि. २१) रात्री ११ वाजता हा ‘हनी ट्रॅप’चा प्रकार घडला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्लर व्यावसायिक दिपाली टेकाम (३५, रा. आलोकनगर), तिचा साथीदार स्वप्नील वाघमारे आणि किशोर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिपालीला अटक केली आहे. ती पहिल्या पतीला सोडून स्वप्नीलसोबत राहते. सावज हेरून त्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायचे आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, असा त्यांचा धंदा आहे. २०२५ मध्ये दिपाली आणि स्वप्नीलविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. यावरून आरोपींचे गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
बायजीपुरा परिसरात राहणारा ४० वर्षीय पठाण नामक तरुण फिर्यादी आहे. तो एमआर म्हणून काम करतो. १५ ते २० दिवसांपूर्वी ओरचीट फार्मसीत ओळख झालेल्या तरुणाने कामात मदत होईल म्हणून त्याला आलोक नगरातील दिपालीचा मोबाइल नंबर दिला होता. त्यातून दिपाली आणि फिर्यादीची ओळख झाली होती. शनिवारी सायंकाळी ७ वाजता दिपालीने फोन करून एमआरला भेटायला बोलावले. येताना मुलांसाठी पुलाव आणण्याची गळ घातली. त्यानुसार तो रात्री साडेदहाच्या सुमारास सेव्हनहिलवरून पुलाव घेऊन बीड बायपासवरील आलोकनगरातील एका शाळेजवळ पोहोचला. मोबाइलवर लोकेशन आलेले असल्याने एमआर पुलाव घेऊन थेट तिच्या घरापर्यंत गेला.
म्हणे, बोलायचे आहे.. आपण बाहेर जाऊ!
एमआरने दिपालीला पुलावचे पार्सल दिले. त्यानंतर ती त्याला थोडं बोलायचं आहे, आपण बाहेर जाऊ, असे म्हणाली. पाच मिनिटांत पुलाव घरात ठेवून ती परत आली आणि दोघे दुचाकीवरून निघाले. ५० मीटर अंतर जाताच दोन अनोळखींनी त्यांना गाठले. तू या बाईला घेऊन कुठे चालला? म्हणत त्यांनी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली आणि दिपालीला तेथून घरी पाठवून दिले.
एटीएममधून पैसे काढायला लावून लुटले
दोन्ही आरोपींनी एमआरला त्याच्याच दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवून बीड बायपासने अंधारात नेले. तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण करत व्हिडीओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी त्यांचा मोबाईल तपासला आणि देवळाई चौकातील एका एटीएमवर नेऊन साडेतीन हजार रुपये काढायला लावून ते लुटले. त्यानंतर शिवाजीनगर चौकातील रिक्षा स्टँडवर त्याला सोडून दुचाकी व मोबाईल घेऊन स्वप्नील आणि किशोर पसार झाले. धक्कादायक म्हणजे, ते फिर्यादीच्याच मोबाइलवरून त्याला फोन करून ५० हजार रुपये मागायचे.
दिपाली जाळ्यात; स्वप्नील, किशोरचा शोध सुरु
या प्रकरणी तक्रारदार पठाण हा आधी जिन्सी ठाण्यात गेला होता. मात्र, घटनास्थळ सातारा ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्याला सातारा ठाण्यात पाठविले. उपनिरीक्षक जयसिंग वाघ यांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांनी तपास करून पार्लर व्यावसायिक दिपाली टेकाम हिला अटक केली. स्वप्नील वाघमारे, किशोर यांचा शोध सुरू आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.