Ad Advertisement Ad Advertisement

Jay Shah Re-Elected ICC Chairman – जय शाह ‘कॅप्टन’ पदी कायम

आयसीसी अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

बाली : Jay Shah Re-Elected ICC Chairman आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी जय शाह यांची पुनर्निवड करण्यात आली.आयसीसीमध्ये सामील होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काम पाहिलेल्या ३८ वर्षीय शाह यांनी सर्वप्रथम डिसेंबर २०२४ मध्ये आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर आता त्यांची पुन्हा दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध पुनर्निवड करण्यात आल्याचे आयसीसीने निवेदनात म्हटले आहे. २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट पुनरागमन करत असल्यामुळे त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.

आयसीसीच्या संचालक मंडळाच्या इंडोनेशियातील बाली येथील बैठकीत रविवारी त्यांची पुनर्निवड करण्यात आली. या पदावर निवडण्यात आलेले जय शाह सर्वात तरुण प्रशासक आहेत. आयसीसी निवेदनात म्हणते, ‘हा निर्णय शाह यांच्या नेतृत्वावरील मंडळाचा विश्वास दर्शवतो आणि खेळासाठीच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर सातत्य सुनिश्चित करतो. जागतिक विस्तार, चाहता वर्गाची वाढ आणि व्यावसायिक विकास हे आमच्या धोरणात्मक योजनेच्या केंद्रस्थानी आहे. अध्यक्षपदी पुनर्निवड झाल्यानंतर जय शाह म्हणतात, ‘आयसीसी अध्यक्ष म्हणून काम करणे हा एक सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे.

जगभरातील क्रिकेटचे हित साधण्यासाठी सदस्य राष्ट्रांसोबत मिळून काम करण्यास मी वचनबद्ध आहे.’ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) चे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन म्हणाले की, ‘शाह यांची पुनर्नियुक्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी एका महत्त्वाच्या वेळी झाली आहे.’ आयसीसी उपाध्यक्ष आणि झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी म्हणाले, ‘शाह यांनी खंबीर नेतृत्व आणि सदस्य राष्ट्रांना एकत्र आणण्याची स्पष्ट वचनबद्धता दाखवली आहे. त्यांच्या दूरदृष्टीनुसार, आपल्या खेळाची ताकद सर्व सदस्य देशांच्या सामूहिक योगदानात आहे आणि आयसीसीमध्ये घेतलेले निर्णय जागतिक क्रिकेटच्या सर्वोत्तम हिताचे आहे.

माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आभारी

आगामी २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आयसीसी बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे अंत्यत सन्मानित झालो आहे. सर्व संचालकांनी दाखवलेला सातत्यपूर्ण विश्वास आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन ही आपल्या खेळाला नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आणि खेळाडू व चाहत्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याची एक विलक्षण संधी आहे.
– जय शाह

पहिला कार्यकाळ

शाह यांनी २०२४ मध्ये न्यूझीलंडचे ग्रेग बाकर्ले यांच्यानंतर आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी त्यांनी २०२१ ते २०२४ या काळात आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते, तर बीसीसीआय सचिव पदाचा कार्यकाळ २०१९ ते २०२४ पर्यंत भूषवला होता.

पुनर्निवड होणारे तिसरे अध्यक्ष

भारताचे शशांक मनोहर आणि न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांनी याअगोदर दोन वेळा सलग अध्यक्ष पद भूषवले होते. त्यानंतर आता जय शाह दुसऱ्यांदा निवड होणारे तिसरे अध्यक्ष ठरले आहे.

सचिन, बिंद्राकडून अभिनंदन

सचिन तेंडुलकरनेही आयसीसी अध्यक्ष म्हणून शाह यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सचिन समाज माध्यमावर म्हणतो, ‘क्रिकेटची वाढ ही नवीन संधी निर्माण करणे, खेळाची परिसंस्था मजबूत करणे आणि नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यावर अवलंबून आहे.’ जय शाह यांनी महिला क्रिकेटवर विशेष भर देऊन या प्राधान्यक्रमांना साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.’ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यासंदर्भात म्हणाला की, ‘जय शाह यांच्या कार्यकाळात ज्या महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष देतील, त्यापैकी एक म्हणजे ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन.’

Read About : India vs New Zealand ODI Series 2026 – भारताने न्यूझीलंडचा विजयरथ रोखला
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.