काकांच्या ‘तेराव्या’ला जाण्यापूर्वीच काळाचा घाला
Sambhajinagar Bucket Water Heater Accident छत्रपती संभाजीनगर : काकांच्या ‘तेराव्या’च्या कार्यक्रमाला जाण्यासाठी पहाटेपासून घरात सुरू असलेली लगबग एका क्षणात आक्रोशात बदलली. लवकर निघण्याच्या घाईत आंघोळीसाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीचा बादलीतील हिटरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना बुधवारी (दि. १४) पहाटे मुकुंदवाडीतील जयभवानीनगर येथे घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यज्ञा प्रकाश देवरे (१४, रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. नववीत शिकणारी यज्ञा अभ्यासात अत्यंत हुशार होती, अशी माहिती हवालदार प्रकाश धात्रक यांनी दिली. यज्ञाच्या काकांचे नुकतेच निधन झाले आहे. बुलढाणा येथे बुधवारी त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम होता. त्यासाठी यज्ञा, तिची आई राजश्री, भाऊ रितेश आणि मामा हे कारने जाणार होते. त्यासाठी पहाटेच उठून त्यांची तयारी सुरु होती. आई स्वयंपाकघरात तयारीत असताना यज्ञा घाईघाईत आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. मात्र, बादलीत सोडलेल्या हिटरचे बटण बंद करण्याआधीच तिने पाण्यात हात घातल्याने विजेचा तीव्र धक्का लागला. यात ती जागीच कोसळली.
दरवाजा तोडला, पण तोवर उशीर झाला
विजेचा धक्का लागताच यज्ञा किंचाळली, तिने जोरजोरात हातपाय झाडल्याने दरवाजावर आदळल्याचा आवाज आला. मात्र, आतून दरवाजा बंद असल्याने बाहेर असलेली आई, भाऊ, मामा यांना काहीही करता आले नाही. त्यांनी तत्काळ दरवाजा तोडला खरा, पण तोवर बराच उशीर झाला होता. त्यांनी दरवाजा तोडल्यावर हिटर बंद करून यज्ञाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले पण तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हसत्या-खेळत्या लेकीच्या जाण्याने आक्रोश
यज्ञाची आई राजश्री देवरे (वय ४५) या कृषी विभागात कृषी सेवक म्हणून नोकरीला आहेत. यज्ञाचा मोठा भाऊ रितेश (वय २२) हा मिनी घाटीत लॅबमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतो. यज्ञा ही घरात सर्वात लहान असल्याने सर्वांची लाडकी होती. जवळच तिचे मामा राहत असल्याने तिचा सर्वांना लळा लागला होता. नातेवाईकांचा आक्रोश अक्षरश: ह्रदय पिळवटून टाकणारा होता.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.