Ad Advertisement Ad Advertisement

Sangeet Sannyast Khadga : संगीत संन्यस्त खड्ग

Sangeet Sannyast Khadga : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लीलया लेखणीतून साकारलेले ‘संन्यस्त खड्ग’ हे संगीत नाटक असून, नाटकात अहिंसेचे तत्त्वज्ञान आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी आवश्यक असणारे शस्त्रबल यामधील संघर्ष मांडला आहे. गौतम बुद्धांच्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आधारित हे नाटक असून, नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांची देवाण-घेवाण आणि देशप्रेम दिसून येते.
‘संगीत संन्यस्त खड्ग’या नाटकाचा पहिला प्रयोग १९ सप्टेंबर १९३१ रोजी मुंबई येथे झाला. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या नाटकाची सुरुवात शाक्य राष्ट्राचा राजपुत्र सिद्धार्थ ‘बुद्ध’ होऊन कपिलवस्तू नगरीत परत येतो या प्रसंगापासून होते. नाटकातील सिद्धार्थ व कौंडीण्य यांच्या प्रारंभीच्या संवादातून इतर संप्रदाय हिंसा वा देहदंडन या मार्गाने चिरंतन व अमर असे मुलतत्त्व शोधल्याचे व्यर्थ प्रयास कसे करतात, असे नाटकातील प्रवेशाद्वारे दाखवून सिद्धार्थ बुद्धाने दाखवलेला अहिंसेचा मार्ग कसा श्रेष्ठ व अखिल मानवजातीच्या कल्याणाचा ठरतो, याचा बोध नाटकाद्वारे समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

नाटकाच्या कथानकात सिद्धार्थ बुद्ध आपल्या नगरीत येतात. त्यांच्या पंथाला विरोध करणारे त्यांचे पिता शुद्धोधन त्यांना अनुकूल होतात व त्यांचे भाऊ व आप्तजन बुद्धधर्माची दीक्षा घेतात. नाटकातील पहिल्या अंकातील सातव्या प्रवेशात शाक्यांचा सेनापती विक्रम व गौतम बुद्ध यांच्यात चर्चा चालल्याचा प्रसंग असून, ‘एकट्या दुकट्या खऱ्या संन्याशाच्या छताखाली शेकडो निरुद्योगी, भिक्षुक बैरागी इत्यादी बाजारबुणगे तर जमतातच, पण प्रजाक्षय व धनक्षय होऊन राष्ट्रास अपकार होतो, संन्यासाश्रम ही राष्ट्रावरची मोठी आपत्ती आहे, दुष्ट शत्रूसही क्षमा करीत राहण्याच्या वेडगळ आशेवर जे राष्ट्र अवलंबून राहते, ते राष्ट्र त्याच्या क्षमेला मानभंग समजून अधिकच क्रुद्ध झालेल्या त्याच दुष्ट शत्रूकडून संधी साधताच नायनाट करून टाकले जाते,’ असे सेनापती विक्रम म्हणतो व तो आपल्या मुलांसह परिव्राजक बनतो.

नाटकात दुसऱ्या अंकाच्या अखेरीस शाक्य राष्ट्रावर युद्धाचे संकट कोसळल्याचा प्रसंग असून, राष्ट्राच्या कर्त्या पुरुषांनी, सेनापतींनी संन्यासमार्ग स्वीकारल्याने कोसलांकडून होणाऱ्या आक्रमणाला कसे तोंड द्यावे असा प्रश्न नकळत उभा राहतो. नाटकात सहाव्या प्रवेशात बुद्ध व आताचा भिक्षु असलेला पूर्वीचा सेनापती विक्रम यांच्यात चर्चा होते. ‘अहिंसेने काही व्यक्ती करुणामय बनतील पण सर्व व्यक्ती तशा बनत नाहीत. दुष्टांचे दमन दंडानेच केले पाहिजे. दुष्टांना शासन करून त्यांचे क्रौर्य पंगु करून, निरपराध्यांची पुढील घोर हिंसा टाळली पाहिजे असे विक्रम म्हणतो व सुमारे चाळीस वर्षांपूर्वी खाली ठेवलेले खड्ग पुन्हा हातात घेऊन दुबळ्या, जातीघातक, मनुष्यहित विरोधक संन्यास – धर्माचाच संन्यास करतो. निष्प्रतीकारक आत्यंतिक अहिंसा हिंसकाच्या पथ्यावर पडते हे या नाटकाचे सार आहे!

नाटकात गौतम बुद्ध आपले तत्व शेवटपर्यंत मांडतात व शेवटी धर्म प्रकट होऊन बुद्धांचे श्रेष्ठत्व सांगतात. पण, त्याचबरोबर लोककल्याणार्थ झुंजत लोकहिंसकाचा वध करणारे वीर विक्रम त्याच निर्वाणपदाचे अधिकारी ठरतात. ‘शक्तीपूजक कर्मयोगाचा अवलंब करणे हेच संकटाच्या कचाट्यातून मुक्त होण्याचे साधन आहे’ हे स्वत: धर्म सांगतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ज्वलंत विचारांचे सार या नाटकाद्वारे त्यांनी मांडले आहे. तीन अंकी असलेल्या या नाटकात सिद्धार्थ (गौतम बुद्ध), कौंडीण्य, क्षारा, शांकभट, शेतकरी, बाण, सेनापती विक्रमसिंह (भिक्षु), शुद्धोधन, दूत, सुनासशेठ, बायका, शिष्य, दासी, राजदूत, विद्युतगर्भ, कोसलचा सेनापती, नलिनी, भिक्षुणी, सैनिक, मुलगी, चंड, अनुचर अशी विविध पात्रे आहेत. नाटकातील पदांना पं. रामकृष्ण बुवा वझे व मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी उत्तम स्वरसाज चढवल्याने नाटकातील पदे रसिकांच्या मनास भावली. नाटकातील काही पदे ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिली असून, काही पदे शं. बा. शास्त्री यांनी लिहिली आहेत.

‘किती तरि सुललित सहज-गीति’ या यमन रागातील पदाने नाटकाची सुरुवात होते. ‘शतजन्म शोधिताना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘सुकातातची जगी या’ यासारख्या इतर पदांना रसिकांनी वन्समोअरची टाळी देत नाटकास पसंती दिली. या नाटकातील गौतम बुद्ध हे पात्र शांततेचं प्रतीक असून, हे पात्र नाटकात संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. सावरकरांनी गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आदर केला असून, गौतम बुद्धांच्या संन्यासाच्या निवडीवर विचारप्रवृत्त करणारा प्रश्न नाटकातून उपस्थित केला आहे. शांततेसाठी शस्त्र सोडणं योग्य आहे की रक्षणासाठी तलवार उचलणं आवश्यक आहे, असा प्रश्न सावरकर या नाटकाद्वारे मांडतात. गौतम बुद्ध या नाटकात मौनातही बोलून, त्यांच्या शांततेतही संघर्षाचे प्रतिबिंब उमटवतात. सावरकर गौतम बुद्धांचा विरोध न करता त्यांच्या अहिंसेच्या मार्गाला नकळत प्रश्न विचारतात. नाटकातील गौतम बुद्ध हे केवळ शांततेचा उपदेश न करता नि:शब्दता आणि संन्यास या दोन गोष्टी समाजाचे रक्षण करण्याच्या कर्तव्यातील नकळत गोंधळ दाखवतात व यामुळे हे पात्र नाट्यरसिकांना विचार करायला भाग पाडतं. धर्म जर शांती साकारत असेल, पण त्या शांतीसाठी राष्ट्र, संस्कृती आणि समाजच गमावावा लागला तर तो धर्म किती उपयुक्त आहे? असा प्रश्न नाटक पाहताना रसिकांना पडतो. सावरकर यांच्या एकूण साहित्यात केवळ भावनांची उधळण नसून, प्रत्येक शब्दामागे जणू एक चैतन्यशील राष्ट्रभान आहे. क्रांती, परंपरा, राष्ट्रभक्ती, इतिहास आणि वैचारिक स्पष्टतेचा जणू संगम असलेले त्यांचे हे नाटक मराठी रंगभूमीवर ललामभूत ठरेल यात शंका नाही.

अमेय गुप्ते
gupteameya1984@gmail.com

Read About : Chhattisgarh Tribal Dance : नृत्यातून निवडला जातो जीवनसाथी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.