Ad Advertisement Ad Advertisement

SBI data leak- एसबीआयच्या 3,897 ग्राहकांची संवेदनशील माहिती डार्क वेबवर

बँकेकडून स्वतंत्र चौकशी सुरू : ३.७५ लाख रेकॉर्ड्सच्या प्राथमिक तपासणीत धक्कादायक माहिती उघड; ‘सीईआरटी-इन’ मान्यताप्राप्त सायबर सुरक्षा संस्थेची मदत

SBI data leak : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक ओळख पटवणारी संवेदनशील माहिती डार्क वेबवर उघड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची बँकेने गंभीर दखल घेत सविस्तर स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. मात्र, या घटनेचा बँकेच्या आर्थिक कामकाजावर किंवा दैनंदिन व्यवहारांवर कोणताही मोठा परिणाम झालेला नसल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे.


एसबीआयने नियामक संस्थेकडे सादर केलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी बँकेला तिच्या थ्रेट इंटेलिजन्स सेवा पुरवठादाराकडून, डिफेन्स सायबर एजन्सीकडून आणि भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाकडून (सीईआरटी-इन) संभाव्य डेटा लीकबाबत सूचना मिळाली. त्यानंतर डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या सुमारे ३.७५ लाख रेकॉर्ड्सचे प्राथमिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये ३,८९७ ग्राहकांशी संबंधित संवेदनशील नोंदी आढळल्या.

मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि पत्त्यांचा समावेश उघड झाल्याचा संशय असलेल्या माहितीमध्ये ग्राहकांची नावे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, जन्मतारखा, लिंग, ई-मेल आयडी आणि निवासी पत्ते यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, बँकेच्या शाखांशी संबंधित ओळख क्रमांक, ग्राहक माहिती फाइल (सीआयएफ) क्रमांक, लीड आयडी तसेच कर्ज आणि ग्राहकांशी संबंधित नोंदींचा मेटाडेटाही या माहितीमध्ये असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.


मात्र, उपलब्ध माहितीची सत्यता, ती किती परिपूर्ण आहे आणि ती नेमकी कुठून बाहेर पडली, याबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष निघालेला नाही. डेटा किती प्रमाणात उघड झाला आणि त्यातून ग्राहकांना किंवा बँकेला कोणते धोके निर्माण होऊ शकतात, याचाही तपास सुरू आहे.

संभाव्य नुकसान रोखणारी यंत्रणा सक्रिय

घटनेची माहिती मिळताच एसबीआयने सायबर हल्ल्यांना प्रतिसाद देण्याची आणि संभाव्य नुकसान रोखण्याची यंत्रणा सक्रिय केली. तसेच सीईआरटी-इनच्या पॅनलवरील स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची नियुक्ती करून प्रकरणाचे सर्वंकष तांत्रिक परीक्षण सुरू केले आहे.

बँकेचे कामकाज सुरळीत

एसबीआयच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे बँकेच्या मुख्य व्यवसाय व्यवहारांवर, आर्थिक कामगिरीवर किंवा कामकाजाच्या सातत्यावर कोणताही लक्षणीय परिणाम झालेला नाही. सर्व प्रमुख सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, आवश्यक प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. लागू नियामक नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

Read About : UPI Charges Update – दिवाळीनंतर UPI शुल्क लागू होणार; 2,000 रुपयांवरील निवडक व्यापारी व्यवहारांवर परिणाम

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.