व्हर्जिनिया टेक विद्यापीठाच्या संशोधनानुसार, अतिरिक्त गुणसूत्रे असलेल्या काही लहान कर्करोग पेशी अधिक वेगाने वाढू शकतात
न्यूयॉर्क : Small Cancer Cells कर्करोगाच्या पेशी जितक्या मोठ्या, तितका कर्करोग अधिक धोकादायक, असे तुम्हा वाटते का? मात्र, व्हर्जिनिया टेक विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून याच्या उलट निष्कर्ष समोर आला आहे. गुणसूत्रांच्या अतिरिक्त संचामुळे तयार झालेल्या काही लहान कर्करोग पेशी अधिक वेगाने वाढतात, आसपासच्या ऊतींमध्ये आक्रमण करतात आणि उपचारांनाही अधिक प्रतिकार करतात, असे त्यात म्हटले आहे.
हे संशोधन ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सामान्य मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांचे दोन संच असतात. मात्र, पेशीविभाजनादरम्यान त्रुटी झाल्यास गुणसूत्रांचे प्रमाण बदलू शकते. अशा पेशींना चार संच असतील, तर त्यांना ‘टेट्राप्लॉइड’ पेशी म्हणतात. या पेशींचा संबंध कर्करोगाच्या वाढत्या आक्रमकतेशी जोडला गेला आहे.
निरोगी पेशींचीही ट्यूमरला मदत
संशोधक मेगन स्वीट आणि मॅट ब्लूमफिल्ड यांनी शास्त्रज्ञ डॅनिएला सिमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली उंदरांमधील ट्यूमरचा अभ्यास केला. त्यात टेट्राप्लॉइड पेशींचे प्रमाण कमी झाले, तरी ट्यूमर वेगाने वाढत असल्याचे दिसले. या पेशी कर्करोग नसलेल्या स्ट्रोमल पेशींना आकर्षित करतात. त्यामुळे ट्यूमरच्या वाढीस पोषक वातावरण तयार होऊ शकते.
आकाराने लहान पेशी अधिक आक्रमक
Small Cancer Cells काही टेट्राप्लॉइड पेशी अपेक्षेपेक्षा २५ ते ३० टक्के लहान आढळल्या. मात्र, त्यांच्यापासून तयार झालेले ट्यूमर अधिक वेगाने वाढले. कोलन आणि स्तनाच्या कर्करोगातही असेच निष्कर्ष दिसले. रुग्णांच्या कर्करोगविषयक डेटाच्या विश्लेषणात या लहान पेशींचा संबंध कमी जगण्याच्या शक्यतेशी आणि प्रतिकूल निदानाशी आढळला.
भविष्यात निदानासाठी नवी दिशा?
पेशींचा आकार आणि गुणसूत्रांची रचना तपासल्यास कर्करोग किती आक्रमक होऊ शकतो, याचा अंदाज घेण्यास मदत होऊ शकते. मात्र, या निष्कर्षांचा प्रत्यक्ष निदान आणि उपचारांमध्ये वापर करण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.
Read About : Young-Onset Cancer : तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढतेय; शास्त्रज्ञांसमोर नवे कोडे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.