Ad Advertisement Ad Advertisement

Spiti Valley : देवभूमीतील पिती ऊर्फ स्पिती

Spiti Valley : स्पिती खोरे वायव्येकडील कुंझुम पर्वतरांगेपासून ते आग्नेयेकडील किन्नौरमधील सतलज नदीवरील खाबपर्यंत वसलेले आहे. स्पिती ही तशी छोटेखानी नदी आहे.

देवभूमी हिमालयाचे बालपणापासूनच एक अनामिक आकर्षण होते. अखेर वयाच्या चाळिशीत ही हिमालयाची पहिली भेट झाली. निमित्त होते एका अभ्यास सहलीचे. लाहौल व स्पिती भूमंडळातील निसर्ग पर्यटन समजून घेणे, या सद्हेतूने सह्याद्रीतील आदिवासी युवकांची हिमालयातील आदिवासी युवकांशी भेट घडवून आणणे असे या अभ्यास दौऱ्याचे स्वरूप होते. या निमित्ताने स्पिती नदीच्या खोऱ्यात कार्यरत असणाऱ्या इकोस्फियर संस्थेचे कार्य पाहता आले व सोबत स्पिती खोरे, तेथील दुर्गम शीत वाळवंटात राहणारे लोक, त्यांचे पशुपालन व शेती, वनस्पती व वन्यजीव सृष्टी अनुभवता आली व मुख्य भुरळ घातली, त्या प्राचीन अशा तिबेटीयन बुद्ध धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांनी, मोनेस्ट्रीज तथा बौद्धमठांनी.
पुढे हिमालयाच्या माहेर ओढीने स्पिती खोऱ्यात दोनदा जाणे झाले.

पहिला प्रवास झाला तो चंदीगड-मनाली-रोहतांग पास, पुढे चंद्रा नदीच्या किनाऱ्याने कुंझुम खिंडीतून काझा व दुसऱ्यांदा वेगळ्या मार्गाने स्पिती खोऱ्यात पावता झालो भारत-तिबेट महामार्गाने. शिमला, रामपूर, कल्पा, पुह, खाब संगम, नाको, ताबो, धनकर, काझा हा प्रवास स्पितीची जणू काही परिक्रमा घडवतो. दोहो बाजूंचा हा प्रवास विलक्षण आहे, शब्दांच्या पलीकडला. प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याशिवाय या स्पिती सरितेची ओळख केवळ कठीण आहे.

स्पिती खोरे वायव्येकडील कुंझुम पर्वतरांगेपासून ते आग्नेयेकडील किन्नौरमधील सतलज नदीवरील खाबपर्यंत वसलेले आहे. स्पिती ही तशी छोटेखानी नदी आहे. हिमालयाच्या ६,११८ मीटर उंचीवर ग्रेटर हिमालया रांगेत कुंझुम खिंडीच्या दक्षिणेला एक हिमनदी आहे, नोग्पो-टोपको नावाची. तेथून स्पितीचा उगम होतो. पुढे लोसर, काझा, धनकर या प्राचीन गावांतून तिचा प्रवास सुरू राहतो. धनकरजवळ पीन नावाची नदी तिला येवून मिळते. लिंगती आणि पराचू या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. जगातील सर्वांत प्राचीन असा बौद्ध मठ ज्या गावी आहे, त्या ताबोमधून ही स्पिती खोल दरीतून वाहते. एक ना अनेक गावे घेत ती किन्नौर जिल्ह्यात खाब या गावी सतलज नदीला येवून मिळते. कुंझुम खिंड ते खाब संगम असे तब्बल २२५ किलोमीटर लांब स्पितीची जलधारा आहे.

स्पिती नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६,३०० चौरस किमी आहे. स्पिती खोरे चारही बाजूंनी उंच पर्वतारांगांनी वेढलेले आहे. हे हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात येते. हा प्रदेश समुद्रसपाटीपासून साधारण ३,३०० ते ६,६०० मीटर उंचीवर आहे. हिवाळ्यात तापमान उणे पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते, तर उन्हाळ्यात ते सुखद असते. वार्षिक पर्जन्यमान फार तर ५० मिमी इतके आहे. हिवाळ्यात बर्फामुळे ऑक्टोबर ते मे या आठ महिन्यांत देशातील इतर भागाशी स्पिती खोऱ्याचा संपर्क तुटतो. स्पिती हा शब्द खूपच अर्थपूर्ण आहे. भोटी भाषेत स्पिती शब्दाचा ‘पिती’ असा उच्चार होतो. स्पिती म्हणजे ‘मधली भूमी.

उत्तरेचे तिबेट पठार व दक्षिणेला असणारा हिमालय, यातील बेचक्यात स्पिती खोरे वसलेले असल्याने हा शब्द या भूमीला चपखलपणे लागू पडतो. थोडक्यात स्पिती म्हणजे तिबेट आणि भारत यांच्यामधील भूभाग होय. सुमारे तीन हजार वर्षांपासून स्पिती खोऱ्यात मानवी वस्ती होती. प्रामुख्याने तेथील बौद्ध-पूर्व खास शैलचित्रांच्या समृद्ध वारशातून त्याची ओळख होते.

१९६० मध्ये लाहौल आणि स्पिती जिल्ह्याच्या निर्मितीनंतर काझा येथे उपविभाग बनवण्यात आला. पंजाब पुनर्रचना कायदा लागू झाल्यावर १ नोव्हेंबर १९६६ रोजी लाहौल-स्पिती जिल्ह्याचे हिमाचल प्रदेशात विलीनीकरण करण्यात आले. स्पिती खोऱ्यात प्रामुख्याने भोट हे आदिवासी लोक राहतात. यांची उपजीविका प्रामुख्याने पशुपालन व शेतीवर अवलंबून आहे. ते याक व झोंग गाई पाळतात. स्पिती खोऱ्यातील केवळ ०.२८ टक्के जमीन शेती योग्य आहे. त्यात बार्ली, काळा वाटणा, बटाटा ही पिके घेतात. पिन खोऱ्यातील चौमूर्ती नावाच्या घोड्याची जात प्रसिद्ध आहे. स्पिती नदीच्या पात्रातील सीबकथोर्ण वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. थंडीपासून बचावासाठी हे लोक छांग व आरक हे मद्य घेतात.

स्पिती खोऱ्यात तिबेटी चंद्र दिनदर्शिकेनुसार विविध सणोत्सव साजरे केले जातात आणि त्यामध्ये रंगीबेरंगी मुखवटा नृत्य (Chham Dance) हे मुख्य आकर्षण असते. तिबेटमध्ये बुद्ध धर्म पोहोचण्यापूर्वी येथील लोकांचा बॉन (Shamanic) धर्म होता. हा धर्म निसर्गपूजक संस्कृती मानणारा होता. त्याच्या पाऊलखुणा आजही आढळतात. डेमुल या अति उंचावरील गावाच्या दक्षिणेला मणीरंग नावाचे शिखर आहे. स्थानिक लोक या शिखराला पवित्र पर्वत म्हणून पूजतात, त्यामुळे गिर्यारोहकांना मणीरंग पादाक्रांत करायला मज्जाव आहे.

स्पिती खोरे हे भूगर्भशास्राच्या अभ्यासकांसाठी नंदनवन आहे. अलीकडेच भारत सरकारने स्पिती खोरे हे देशातील तेरावे बायोस्फियर रिझर्व म्हणून जाहीर केले आहे. पण, पर्यावरणीय व सांस्कृतिकदृष्ट्या अति महत्त्वाचा भूभाग टिकवण्यासाठी विशेष आचारसंहिता तयार करावी लागेल व तिची काटेकोर अंमलबजवणी पण करावी लागेल. मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाने मनाली ते काझादरम्यान दररोज दोनशे वाहनांना परवानगी द्या, असा आदेश जारी केला होता, त्याचे पुढे काय झाले माहीत नाही. स्पिती-लडाखसह सर्वदूर अनियंत्रित पर्यटन हे घातक ठरत आहे, त्याला लगाम घालायलाच हवा.

वर्तमानात जिवंत सरितांचे धवल दर्शन घ्यायचे असेल तर हिमालयातच जायला हवे. भारतीय उपखंडातील इतर नद्या केवळ नावाला ‘पवित्र.’ प्रत्यक्ष त्या मृतावास्थेतीलच आहेत. आजही स्पिती परिक्रमेची आस कायम आहे. प्रसिद्ध इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी त्यांच्या ‘किम’ नावाच्या कादंबरीत स्पिती खोऱ्याचे वर्णन ‘जगातील एक जग’ (A world within a world) ‘केवळ देवांचे निवासस्थान असलेली जागा’ (A place where only gods live) अशा शब्दांत केले आहे. स्पितीची भव्यता, अलिप्तपणा आणि निसर्गाचे रौद्र-सुंदर रूप पाहून किपलिंग अत्यंत प्रभावित झाले होते, तीच भावना माझ्या मनी कायम आहे.

विजय सांबरे
vijaysambare@gmail.com

Read About : Peter Lynch Investment Strategy – पीटर लिंच : शेअर निवडीचे षट्सूत्र
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.