‘पोलादापेक्षा मजबूत’ सुपरवुड: पर्यावरणासाठी वरदान, इमारतींचे आगीमुळे होणार नाही नुकसान
Superwood वॉशिंग्टन : ‘बुलेटप्रुफ जॅकेट’, ‘बुलेट ट्रेन’ असे शब्द आता चांगलेच रुळले आहेत. आता त्यात ‘बुलेटप्रुफ सुपरवुड’ हेही जोडून घ्या. अमेरिकेतील मेरीलँड येथील इन्व्हेंटवुड या स्टार्टअपने सामान्य लाकडाचे ‘सुपरवुड’मध्ये रूपांतर केले असून ते स्टीलपेक्षा मजबूत, बुलेटप्रूफ, आग प्रतिरोधक आणि वजनाला अत्यंत हलके आहे.
विशेष म्हणजे ते त्या वृक्ष प्रजातींपासून तयार केले जाते जे आतापर्यंत बांधकामासाठी अयोग्य मानले जात होते, जसे की पॉपलर. आता तेच लाकूड इमारती आणि तांत्रिक उत्पादनांचा कणा बनू शकते. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पर्यावरणपूरक आहे. इन्व्हेंटवुडचा पहिला कारखाना लवकरच ‘सुपरवुड’चे औद्योगिक उत्पादन सुरू करणार आहे. सुपरवुड बनवण्यासाठी स्टील किंवा काँक्रीटपेक्षा खूपच कमी ऊर्जा लागते आणि ते कार्बन उत्सर्जन देखील कमी करते. ते टाकाऊ लाकूड किंवा कमी दर्जाच्या लाकडापासून देखील बनवता येते, ज्यामुळे जंगलांचे शोषण देखील कमी होईल.
‘सुपरवुड’ अशा प्रकारे बनवले जाते
या तंत्रज्ञानामागील शास्त्रज्ञ लियांगबिंग हू आहेत, ज्यांनी २०१८ मध्ये सुपरवुड विकसित केले. लाकडावर प्रथम विशेष रसायनांचा वापर केला जातो, नंतर ते इतके दाबले जाते की त्याचा आकार सुमारे एक चतुर्थांश इतका कमी होतो. या प्रक्रियेमुळे ते ५० टक्के मजबूत आणि स्टीलपेक्षा सहा पट हलके होते.
कोठे कोठे होणार वापर?
बांधकामात: बुलेटप्रूफ दरवाजे, अग्निरोधक भिंती, साइडिंग, डेकिंग, खिडकीच्या चौकटी आणि कुंपण.
तांत्रिक उत्पादनांमध्ये: उडत्या कारपासून ते कार्बन फायबरची जागा घेणाऱ्या उपकरणांपर्यंत.
विविध गॅझेटमध्ये : उच्च दर्जाचे लॅपटॉप, स्मार्टफोन आणि फर्निचरमध्ये, जिथे मजबुतीसोबतच सौंदर्य देखील महत्त्वाचे आहे. कार किंवा फोन देखील लाकडापासून बनवला जाऊ शकतात.
भारताला काय फायदा?
सुपरवुड भारतात एक शाश्वत आणि किफायतशीर पर्याय बनू शकतो. त्यामुळे इमारती हलक्या, मजबूत आणि ऊर्जा कार्यक्षम बनवू शकतात. जर त्याचा भारतात वापर सुरू झाला तर ते लाकूड उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
Read About : ISS Crew Number : अंतराळ स्थानकात क्रू नंबर कशासाठी दिला जातो
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.