Mahanadi River Chitrotpala Neelotpala : मध्य भारताची भूमी नानाविध सरितांनी संपन्न आहे. त्यातील एक महत्त्वाची नदी म्हणजे महानदी. नावाप्रमाणे विस्तीर्ण असणारी ही नदी छत्तीसगडमधील पूर्व घाटातील सिहावा येथील एका कुंडात उगम पावते. हे ठिकाण रायपूरपासून जवळ असलेल्या धमतरी जिल्ह्यात आहे. महानदी ही ओडिसा राज्यातील सर्वांत मोठी नदी आहे.
महानदी छत्तीसगड राज्यात उगम झाल्यानंतर ईशान्य दिशेला वाहते. पुढे बिलासपूरजवळ शिवनाथ नदी तिला मिळते व ती पूर्वेला वळण घेऊन ओडिसात प्रवेश करते व कटक जवळ बंगालच्या उपसागराला जावून मिळते. नदीचा खोरे विस्तार हा छत्तीसगड, ओडिसा त्याचप्रमाणे झारखंड, मध्य प्रदेश व महाराष्ट्र आहे. महानदीची लांबी ८५८ किमी आहे. जलवाहन क्षेत्र सुमारे १,३२,१०० चौ. किमी. आहे. पावसाळ्यात पुराच्या वेळी प्रतिसेकंदास ४२,४७५ घ.मी. इतक्या प्रचंड प्रमाणात नदीतून पाणी वाहत असते.
प्राचीन काळापासून महानदी ही चित्रोत्पला किंवा नीलोत्पला या नावाने ओळखली जाते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ओडिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यात महानदीवर हिराकुड धरण बांधले. ते जगातील सर्वात लांब धरण मानले जाते. या धरणाची लांबी चोवीस किलोमीटर आहे. नंतरच्या काळात दुधवा, रविशंकर सागर ही धरणे निर्माण झाली. महानदीचे खोरे हे हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तिच्या खोऱ्यात विपुल वनसंपदा आहे. सिमलीपल बायोस्फियर रिझर्व व भितर-कानिका हे राष्ट्रीय उद्यान महानदी खोऱ्याचे भूषण आहे. महानदीच्या त्रिभुज प्रदेशात पारादीप हे बंदर असून पूर्व किनारपट्टीवरील ते प्रमुख लोह निर्यात बंदर मानले जाते. महानदीला पहिल्या टप्प्यात अनेक उपनद्या मिळतात. रायपूर जिल्ह्यातून ती प्रथम थोडी उत्तरेकडे व नंतर ईशान्येकडे वहात जाते. सुरुवातीला छत्तीसगड द्रोणीच्या पूर्वेकडील भागाचे जलवाहन करीत २०४ किमी उत्तरेकडे वाहत गेल्यावर पश्चिमेकडून येणारी शिवनाथ नदी मिळते व ती पूर्ववाहिनी बनते.
बिलासपूर जिल्ह्यातील दक्षिण सरहद्दीवरून व नंतर रायगड जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहत जाऊन ओरिसात प्रवेश करते. येथपर्यंत तिला अनेक उपनद्या मिळतात. त्यांपैकी पैरी, जोंक, औंग, तेल या उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत; तर इब, मांड, हसदेव (हसदो) व शिवनाथ या डावीकडून मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत. या सर्व सरिता मिळून छत्तीसगड विभागाचे म्हणजेच दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड व बस्तर जिल्ह्यांच्या काही भागांचे जलवाहन करतात.
महानदी ही पूर्व घाटातील वनाच्छादित घळ्यांमधून नागमोडी वळणांनी वाहते. सतकोसिआ ही येथील प्रसिद्ध घळई आहे. महानदी पूर्ववाहिनी बनून पुढे कटकपासून ओरिसाच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते व शेवटी अनेक मुखांनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कटकपासून नदी अनेक शाखांमध्ये विभागली गेली असल्याने तेथे सुमारे २४० किमी. रुंदीच्या त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. कातजुरी, कोयाखाई, सुरुआ, देवी, पैकी, बिरूपा, चितरतळा, गेंगुती, न्यून हे महानदीचे त्रिभुज प्रदेशातील फाटे आहेत. पुण्यक्षेत्र राजिम, चारधामातील जगन्नाथपुरी, जगप्रसिद्ध कोणार्क, पारादीप, ऐतिहासिक कटक, भुवनेश्वर आदी ठिकाणे महानदीच्या खोऱ्यात मोडतात.
महानदी खोऱ्यातील छत्तीसगड, द्रोणी व किनारी मैदानांचा प्रदेश वगळता बाकीचा भाग जंगलव्याप्त आहे. या प्रदेशातील मृदा तांबडी व पिवळी आहे. येथे भात या मुख्य पिकाशिवाय गहू, जवस, कडधान्ये यांचेही उत्पादन घेतले जाते, तर ताग (ज्यूट) हे त्रिभुज प्रदेशातील मुख्य पीक आहे.
महानदी खोऱ्याचा हा प्रदेश अत्यंत समृद्ध वनसंपदा, डोंगराळ भाग आणि नैसर्गिक संसाधनांनी संपन्न आहे. येथे प्राचीन काळापासून आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. या खोऱ्यातील आदिवासी समाज हा प्रामुख्याने निसर्गपूजक आहे. गोंड आदिवासी हे महानदी खोऱ्यातील प्रमुख जमात आहेत. छत्तीसगडमधील बस्तर (दंडकारण्य परिसर) आणि ओडिसामधील डोंगराळ भागात यांचे प्राबल्य आहे. संथाळ आदिवासी महानदीच्या उपनद्यांच्या परिसरात आणि ओडिसामधील मयूरभंज व आसपासच्या भागांत राहतात. उरांव आणि मुंडा या जमाती छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमेलगतच्या महानदी खोऱ्यातील पठारी भागात शेती आणि मजुरी करून उपजीविका भागवतात. कंध किंवा खोंड ही ओरिसामधील महानदीच्या पर्वतीय भागात राहणारी जमात आहे. आपल्या विशिष्ट सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गावर आधारित जीवनशैलीसाठी ते ओळखले जातात. इतर लहान सहान जमातीमध्ये बैगा, बिंझवार, कंवर आणि सावर यांसारख्या इतर उप-जमाती व आदिवासी समुदायही या खोऱ्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास आहेत.
महानदी खोऱ्यातील आदिवासी प्रामुख्याने पारंपरिक पोडू नावाची स्थलांतरित शेती करतात व वनउपज संकलन करतात. त्यात प्रामुख्याने डिंक, मध, तेंदूपत्ता गोळा करतात. हे लोक मासेमारी पण करतात. येथील गाव समाजाने अनेक कला, हस्तकला विकसित केल्या आहेत. छत्तीसगडमधील ‘ढोकरा कला’ आणि पारंपरिक गोंड चित्रकला जग प्रसिद्ध आहे. या भागात जगन्नाथ संस्कृती आणि आदिवासी संस्कृतीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. आदिवासी प्रामुख्याने बुढादेव, दुल्हादेव आणि निसर्गातील विविध घटकांची पूजा करतात.
महानदी खोऱ्याचे वर्तमान आव्हानात्मक बनत आहे. नदीचे प्रदूषण ही मोठी समस्या होऊन बसली आहे. हिराकुडसारख्या महाकाय धरणे, जलविद्युत प्रकल्प आणि खाणकामामुळे आदिवासींचे विस्थापन होत आहे, उपजीविकेचे प्रश्न निर्माण होत आहेत. आधुनिकता आणि बदल यामुळे आदिवासींची नवी पिढी बदलत आहे. शिक्षण आणि सरकारी योजनांमुळे ते मुख्य प्रवाहात येत असले ते जंगल, पशुपालन व शेती यापासून तुटत आहेत. परिणामी ‘निसर्गपूजक-आदिवासी-संस्कृती’ ही ओळख पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि म्हणूनच महानदीच्या या आदिवासी भूमिपुत्रांना आपली ‘निसर्गपूजक’ संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळो, ही सदिच्छा!
विजय सांबरे
vijaysambare@gmail.com
Read About : Sindhudurg Fort – सिंधुदुर्ग
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.