Ad Advertisement Ad Advertisement

Tehsildar Offices – नागपूर, नाशिक, जळगावसह धुळे, नंदुरबारमध्ये 9 अपर तहसिलदार कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

नागपूर आणि नाशिक विभागांतील नवीन कार्यालयांसंबंधीचा शासन निर्णय जारी

मुंबई : Tehsildar Offices – महसूल विभागातील कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी होणारी नागरिकांची धावपळ कमी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नऊ नवीन अपर तहसिलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाला अंतिम स्वरुप दिले असून, नागपूर आणि नाशिक विभागांतील विविध जिल्ह्यांमध्ये ही नवीन अपर तहसिलदार कार्यालये करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला.

नागपूर विभागातील सावनेर तालुक्यासाठी मौजे चिचोली (खापरखेडा) आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील आष्टी येथे नवीन कार्यालये उभी राहणार आहेत. तर, नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे तहसीलदार कार्यालय होणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव (शहर), जामनेर तालुक्यातील पहूर आणि चाळीसगाव अशी तीन नवीन कार्यालये होतील. तसेच नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार आणि शहादा आणि धुळे जिल्ह्यात शिरपूर (शहर) येथे अपर तहसिलदार कार्यालये कार्यान्वित केली जाणार आहेत.

इतर कामे मूळ तहसिलदार कार्यालयातच

​या नव्या कार्यालयांमुळे जमिनीशी संबंधित महसूली कामांसाठी लोकांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. मात्र निवडणूक, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर महसूली नसलेली कामे मूळ तहसिलदार कार्यालयामार्फतच चालतील. तसे अर्ज किंवा निवेदने नव्या कार्यालयात आल्यास ती पुढील कार्यवाहीसाठी मूळ तहसिलदार कार्यालयाकडे पाठवली जातील.

जलद आणि पारदर्शक सेवा

गतिमान प्रशासनासाठी राज्यातील विविध भागांत नव्या अपर तहसिलदार कार्यालयांची उभारणी आणि प्रत्यक्ष कामकाजाची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्यात येत आहे. या निर्णयामुळे जमिनीशी तसेच महसुलाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांना आळा बसेल आणि त्यांना आपल्या भागातच जलद आणि पारदर्शक सेवा मिळू शकतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Read About : Devendra Fadnavis – ‘एनटीए’ परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पारदर्शक यंत्रणा आवश्यक; नंदन निलेकणींशी मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.