Ad Advertisement Ad Advertisement

Telo Mascarenhas : भारतमातेचा सुपुत्र तेलो मस्कारेन्हास

Telo Mascarenhas : तेलो मस्कारेन्हास आणि त्यांचे गोव्यातील मित्र लिस्बन, पोर्तुगाल येथे शिकत असताना तेथे प्रचंड राजकीय घडामोडी सुरू होत्या. तेलो यांनी कोइंब्रा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. तेथे त्यांना पॉलिटिकल इकॉनोमी हा विषय शिकवायला डॉ. अँटोनियो डी ऑलिव्हेरा सालाझार यायचे. पुढे १९३२ मध्ये तेथील राजेशाही झुगारून देऊन हेच डॉ. सालाझार पोर्तुगालचे सर्व सत्ताधीश झाले.

काही दशकांपूर्वी इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनीने, जर्मनीमध्ये हिटलरने, स्पेनमध्ये फ्रँकोने केलं तशीच वृत्ती सालाझारची होती. सालाझारची निरंकुश सत्ता पोर्तुगालमध्ये स्थापित झाल्यानंतर पोर्तुगालच्या गोवा, आफ्रिका, ब्राझील इत्यादी वसाहतींना पूर्वी थोडेफार संविधानाने दिलेले अधिकार होते, तेसुद्धा सालाझार यांनी काढून घेतले. त्यापूर्वी कित्येक शतके गोव्याचे भारताच्या भूमीशी असलेले पारंपरिक, सांस्कृतिक, कल्चरल बंध तोडण्याचा प्रयत्न पोर्तुगीज सत्तेने साडेचारशे वर्षे केला होता. शाळा, कॉलेज, चर्च, कुटुंब आणि गोव्यातील प्रत्येक संस्थेवर पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी आपली पकड बसविली होती. ‘ॲक्वे पोर्तुगाल म्हणजे हे पोर्तुगालच आहे’ असं सांगत पोर्तुगीजांनी गोव्याला लहान पोर्तुगालचं रूप देण्याचा प्रयत्न केला होता.

आश्चर्य म्हणजे पोर्तुगाल देशात राहूनच तेलो मस्कारेन्हास यांना आपल्या आत दडलेल्या भारतीय आत्म्याचा शोध लागला. भारतीय भाषा, परंपरा, संस्कृती, यावरचं पोर्तुगीजांचं आक्रमण त्यांना मान्य नव्हतं. पोर्तुगीजांनी देवळे पाडली, भारतीय ग्रंथ जाळले, इतिहास-भूगोल बदलला हे त्यांना मान्य नव्हतं, म्हणून ते आपल्या मित्रांसह इंडोलॉजिस्ट रोमा रोलॉ, मॅक्समुल्लर, विलियम जोन्स यांच्या ग्रंथांचा अभ्यास करू लागले. भारताचा इतिहास, राजकारण, परंपरा, संस्कृती याबद्दल सगळं साहित्य मिळवून अभ्यासू लागले. या अभ्यासामुळे तेलो आणि त्यांच्या मित्रांच्या मनात भारतीय भूमी बद्दल अधिक आस्था, ओढ निर्माण झाली. ते मातृभूमीबद्दल अभिमानाने बोलू लागले. गोव्यातील केंपे येथे प्रसिद्ध होणाऱ्या ‘ओ भारत’ या प्रकाशनामध्ये (संपादक- जी. पी. हेगडो- देसाई) तेलो यांनी ‘डेथ ऑफ आयडॉल्स’ हा पहिला लेख लिहिला आणि त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला.

‘डेथ ऑफ आयडॉल्स’ या लेखात लिहिलं होतं- ‘गोव्यातील आमच्या प्रायमरी शिक्षणापासून आम्हाला असा खोटा इतिहास शिकवला जातो की पोर्तुगाल आमची मातृभूमी आहे, आम्ही पोर्तुगीज आहोत. खरं म्हणजे आमची मातृभूमी भारत समृद्ध संस्कृती असलेली, जगात अद्वितीय अशी आहे. तरी त्या संस्कृतीविषयी ते आम्हाला शिकवत नाहीत. पोर्तुगीज आमच्या भूमीवरील आक्रमक असून हे सत्य ते लपवून ठेवतात. आम्हाला आमचा वंश, आमचे अभिमानास्पद कर्तृत्व, आमचे पूर्वज याविषयी जाणीवपूर्वक अज्ञानात ठेवतात.’ या लेखाने गोव्यात आणि पोर्तुगालमध्ये खळबळ माजली. तेलो या लेखकावर तसेच संपादकावर क्रिमिनल केस करत तेलो यांना लिस्बन येथे बोआ होरा येथे कोर्टात हजर राहण्याचं समन्स निघालं. तेलो यांच्या बाजूने त्यांचा मित्र अंतोनिओ फुर्ताडो यांनी समर्थन केलं की असंच लेखन यापूर्वी पोर्तुगीज इतिहासकारांनीच केलेलं आहे.

या केसमधून तेलो सहीसलामत सुटले. कदाचित तरुण रक्त आहे म्हणून तेलो यांच्याकडे गांभीर्याने बघितलं गेलं नसावं. ही घटना १९२६ मधील. यानंतर ३६ वर्षांनी १९६२ मध्ये तेलो पुन्हा बोआ होरा पुढे राजकीय गुन्हेगार म्हणून उभे होते आणि त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. तेलो, त्यांचे मित्र आणि त्यांचे गोव्याचे मित्र बॅरेट्टो यांनी कोइंब्रा येथे १९२८ मध्ये ‘इंडियन इंस्टीट्यूट’ स्थापन केली. ती युनिव्हर्सिटीच्या आर्टस् फॅकल्टीशी जोडलेली होती. याच इंस्टीट्यूटच्या वतीने त्यांनी ‘इंडिया नोव्हा’ हे जर्नल सुरू केलं. गोवा आणि भारताची खरी प्रतिमा जगापुढे मांडणे हा ‘इंडिया नोव्हा’चा उद्देश होता. इंडिया नोव्हाच्या पहिल्या जर्नलसाठी रवींद्रनाथ टागोर, रोमा रोलॉ, सिल्विन लेव्ही यांचा पाठिंबा मिळाला. ‘इंडिया नोव्हा’मध्ये पोर्तुगालमधले तसेच गोव्यातील कोंकणी लेखकही लिहू शकत होते.

कोइंब्रा, पोर्तुगाल येथे तेलो कायद्याचे पदवीधर झाले. तीन वर्षे त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून एलेंटेजो येथे काम केलं. परंतु, या नोकरीत त्यांना मोकळा वेळ नव्हता, म्हणून त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर हा स्वतंत्र व्यवसाय पत्करला, त्यामुळे त्यांना जो मोकळा वेळ मिळाला त्या काळात त्यांनी भारतीय संस्कृती, प्रथा याविषयी अभ्यास केला. याच काळात त्यांनी संस्कृत भाषेतील कालिदासाचे सुप्रसिद्ध नाटक शाकुंतल, शूद्रकाचे मृच्छकटिक, सोमदेवाचा ग्रंथ कथासरित्सागर यांचे पोर्तुगीज भाषांतर केले.

प्राचीन भाषेतील पुस्तकांचं पोर्तुगीज भाषांतर प्रथमच होत होतं. होम अँड द वर्ड- रवींद्रनाथ टागोर, ‘मशी’-महात्मा गांधींचे चरित्र, यांचे तेलोंनी केलेल्या भाषांतरामुळे पोर्तुगीज नागरिकांना भारत कळू लागला. ‘मुलहर हिंदू’ या पुस्तकात तेलो यांनी सीता, सावित्री, दमयंती, शकुंतला, मीराबाई या महान भारतीय स्त्रियांवर चरित्रविषयक लेख लिहिले. त्यांची परंपरा कशी पुढे चालू आहे असे लिहून तेलो यांनी सरोजिनी नायडू तसेच भारतीय संगीत, नृत्य, नाट्य या विषयी सविस्तर लेख लिहिले.

Read About : Sindhudurg Fort – सिंधुदुर्ग
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.