एलन मस्क यांच्या नव्या रोडस्टरमध्ये हवेत झेप घेण्याचे तंत्रज्ञान; कायदेशीर अडथळे, किंमत आणि डिलिव्हरीबाबत अनिश्चितता कायम.
शिकागो : Tesla Flying Car टेस्लाने आपली नवीन ‘रोडस्टर’ स्पोर्टस कार सादर केली आहे. अनेक तांत्रिक वैशिष्ट्यांनी युक्त असलेली ही कार हवेत झेप घेण्यासही सक्षम आहे. पण लगेच कार चालवण्यासाठी उतावीळ होऊ नका. या कारचा अनुभव घेण्यासाठी अजून बराच काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कादचित ते स्वप्नच राहील असेही काही तज्ज्ञांना वाटते.
एलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनीने गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात आपल्या दुसऱ्या पिढीतील ‘रोडस्टर”चे अनावरण केले. यात ‘कोल्ड गॅस थ्रस्टर्स’ आणि ‘मल्टी-मोड सक्शन सिस्टीम’ देण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने ही कार काही काळासाठी हवेत झेप घेऊ शकते आणि हवेत असताना स्वत:भोवती गिरकीही घेऊ शकते. ”भविष्यात खरोखरच उडणाऱ्या कार असणार आहेत,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलन मस्क यांनी कारच्या प्रात्यक्षिकानंतर दिली होती.
ठिकठिकाणचे कायदे आडवे येणार
उडणाऱ्या वाहनांशी संबंधित कायदेशीर अडथळे आणि विविध देशांचे गुंतागुंतीचे नियम पाहता, अशा भविष्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल. ”ट्रॅफिकमध्ये असताना एखादा चालक अचानक आपली कार हवेत उडवू शकेल, याची परवानगी प्रत्येक देश देईलच असे वाटत नाही. अशा प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर उतरवण्यासाठी एक प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल,” असे मत जॉर्जटाऊन विधी विद्यापीठाचे प्राध्यापक डेव्हिड व्लाडेक यांनी व्यक्त केले आहे.
गुरुवारी झालेला हा कार्यक्रम ‘स्पेसएक्स’च्या टेक्सासमधील रॉकेट चाचणी आणि विकास केंद्रात आयोजित करण्यात आला होता. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन ‘रोडस्टर’ला हवेत झेप घेण्यायोग्य बनवण्यासाठी त्यांनी ‘स्पेसएक्स’च्या काही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. केवळ हवेत झेप घेणे किंवा गिरकी घेणेच नव्हे, तर ही कार एका सेकंदापेक्षा कमी वेळात शून्य ते ६० मैल (९६.६ किमी) प्रति तास इतका वेग गाठू शकते.
लोकांमध्ये कारबाबत उत्सुकता असली तरी प्रतीक्षा अजून पूर्णपणे संपलेली नाही. खुद्द मस्क यांनी म्हटले आहे की, ग्राहकांसाठी उत्पादनास २०२८ पूर्वी सुरुवात होणार नाही. तसेच, टेस्लाने आपल्या या नवीन ईव्हीची किंमतही अद्याप जाहीर केलेली नाही.
बुकिंग सुरू, पण हमी नाही…
शुक्रवारी सकाळपासून टेस्लाने आपल्या वेबसाइटवर ‘रोडस्टर रॉकेट’ कारसाठी आगाऊ नोंदणी सुरू केली. मात्र, हे वाहन कधी वितरित केले जाईल—किंवा ते प्रत्यक्षात वितरित केले जाईल की नाही—याबाबत त्यात कोणतीही शाश्वती देण्यात आलेली नाही.
परिवहन विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांशी संबंधित सल्लागार गटाचे माजी उपाध्यक्ष, ब्रायंट वॉकर स्मिथ यांनी उडत्या कारच्या बाबतीत फारसा उत्साह दाखवला नाही; मात्र, टेस्लाचे शेअर्स उच्च पातळीवर टिकवून ठेवण्याच्या मस्क यांच्या क्षमतेचे त्यांनी कौतुक केले.
टेस्ला फक्त स्वप्न विकते : स्मिथ
साउथ कॅरोलिना विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक स्मिथ म्हणाले, ”हे एका अशा कारचे प्रदर्शन होते, ज्यामध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही कार २०२८ मध्ये सार्वजनिक रस्त्यांवर येणार नाही. टेस्लाची एक विशेष खासियत अशी आहे की, ते अशा भविष्याचे स्वप्न विकतात, जे वास्तवापेक्षा कित्येक पटीने मोठे असते.”
मस्क यांनी वारंवार असे म्हटले आहे की, भविष्यातील वाहनचालन हे ‘स्वयंचलित’ असेल. ऑस्टिनस्थित टेस्लाने आपल्या वाहनांमध्ये स्वयंचलित वैशिष्ट्ये विकसित करण्यावर आणि अलीकडेच स्वत:चा ‘रोबोटॅक्सी’ व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला आहे. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे की, ‘रोडस्टर’मध्ये मानवी चालक असेल; त्यांनी या ईव्हीला मानवाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्वोत्तम कारपैकी एक, असे संबोधले.
कार सुरक्षित असेलच असे नाही…
”गुरुवारी केलेले प्रदर्शन तांत्रिकदृष्ट्या ‘स्वयंचलित’ होते, जेणेकरून कोणालाही इजा पोहोचू नये. परंतु, दीर्घकाळात ही नवीन रोडस्टर टेस्लाद्वारे बनवली जाणारी एकमेव मानवी चालक असलेली कार असेल. ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम असेलच असे नाही,” अशी हलकीफुलकी टिप्पणी मस्क यांनी कार्यक्रमादरम्यान केल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
थोडक्यात सांगायचे तर, दुसऱ्या पिढीची ‘रोडस्टर’ लगेच बाजारात येणार नाही. आणि हे महत्त्वाकांक्षी नवीन वाहन कंपनीच्या नफ्यात भर घालेल का, हे पाहणे अजून बाकी आहे.
Read About: Tesla Roadster Flying Car : टेस्लाच्या नव्या कारची हवेत झेप; मारली कोलांटी उडी!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.