पळसगाव परिसरात खळबळ | मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास ग्रामस्थांचा विरोध
नेरी (चंद्रपूर) : Woman Killed in Front of Husband : चिमूर तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रातील पळसगाव वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. उषा अंकुश गुरुनुले (४५, रा. पळसगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. पळसगाव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५९ मध्ये घटना घडली.
उषा गुरुनुले या पती अंकुश गुरुनुले आणि गावातील विकास गुरुनुले यांच्यासोबत धान पिकाला पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेल्या होत्या. पती डिझेल इंजिनजवळ पाण्याची व्यवस्था करीत असताना, उषा शेतातील तण काढत होत्या. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेले. मानेचा चावा घेतल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पतीच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्रामस्थांनी वाहन अडवून विरोध केला. मृत महिलेच्या मुलांना नोकरी द्यावी, अशी मागणी करीत मागणी मान्य होईपर्यंत मृतदेह नेऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. यामुळे परिसरात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे, वनपाल चंद्रकांत रासेकर आणि चिमूर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या घटनेमुळे जंगलालगतच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Read about : Meerut Murder Case : पतीची हत्या करणाऱ्या रविता आणि प्रियकराला फाशीची शिक्षा; कोर्टाचा मोठा निर्णय
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.