रेहान होता अनिल पंडितच्या संपर्कात, तिघांना मिळून दिले ५० हजार
Tiger Shroff firing case : कोटा (राजस्थान) : बॉलीवूडच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारप्रकरणी तीन संशयित आरोपींना राजस्थानातील कोटा रेल्वेस्थानकात अटक करण्यात आली. तिघांपैकी रेहान हा अमेरिकेतून कारवाया करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित साथीदार अनिल पंडित याच्या संपर्कात होता, असा खुलासा कोटा शहराच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सोमवारी केला. कोटा शहर पोलिसांनी पुणे-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमधून तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. हे तिघे या रेल्वेने दिल्लीला जाणार होते आणि तिथून पुढे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. सकाळी ९.४५ वाजता माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्थानकाचे बाहेर जाणारे मार्ग आणि प्लॅटफॉर्म्स सील करून आरोपींना पकडले. या हल्ल्यासाठी आरोपींना एकत्र मिळून अवघे ५०,००० रुपये ॲडव्हान्स देण्यात आले होते.
दरम्यान, समाजमाध्यमांवर बिश्नोई टोळीचा सदस्य अनिल पंडित याच्या कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत असून, त्यांची सत्यता पडताळली जात असल्याचे मुंबईचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले. टायगरवर हल्ला करणाऱ्यांची नावे पोलिसांनी उघड केली. रेहान ऊर्फ सुक्का, ऋतिक कुर्मी ऊर्फ रोशन फायटर अशी त्यांची ओळख पटवण्यात आली. एक संशयित अल्पवयीन असल्याचे कोटा पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, हा दावा मुंबई पोलिसांनी फेटाळला. रेहान ऊर्फ सुक्का हा १८ वर्षांचा असून, हरयाणातील सोनिपत येथील ईदगाह कॉलनीतला रहिवासी आहे. तो हरयाणात मजुरी करतो.
ऋतिक कुर्मी ऊर्फ रोशन फायटर हा २२ वर्षांचा आहे. तो मूळचा बिहारमधील बेगुसराय येथील राहणारा आहे. सध्या त्याचे वास्तव्य अंधेरीत होते. तो रॅपिडोचालक म्हणून काम करतो. टायगरवर गोळीबार केल्यानंतर संशयितांनी एसव्ही रोडमार्गे विले पार्ले आणि अंधेरी असा पळून जाण्याचा मार्ग निवडला. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल त्यांनी अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ सोडली. डी. एन. नगर आणि अंधेरी वेस्ट परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर ही दुचाकी जप्त करण्यात आली.
दुचाकी सोडून तिघांनी अंधेरीहून वसई आणि तिथून कारने सुरत गाठले. त्यानंतर त्यांनी पुणे-जयपूर एक्स्प्रेस पकडली. एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून तिघे प्रवास करत होते. दिल्लीला पोहोचून तिथून नेपाळला पळून जाण्याची त्यांची योजना होती. कोटा पोलिसांना सकाळी या तिघांबद्दल माहिती मिळताच अवघ्या १५ मिनिटांत रेल्वेस्थानकावर सापळा रचून पूर्ण एक्स्प्रेसची झडती घेण्यात आली आणि तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३(५) आणि आर्म्स ॲक्टच्या कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कोटा येथे धाव घेत आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्ल्यात डाव्या हाताला गोळी लागून जखमी झालेला टायगरचा ड्रायव्हर फिरदौस याचा जबाब नोंदवून घेतला आहे.
अनेक दिवसांपासून होती पाळत
टायगरवर हल्ला करण्याची योजना जवळपास दीड महिन्यापूर्वीच तयार करण्यात आली होती. हल्ल्याची तयारी आणि दिवस निश्चित करण्यासाठी तिघेही हल्लेखोर २० दिवसांपासून मुंबईत दाखल झाले होते. हल्लेखोर आधीपासूनच टायगरच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. दर रविवारी टायगर जुहूच्या फुटबॉल ग्राऊंडवर जात असल्याची त्यांना पूर्ण माहिती होती. त्यानुसार त्यांनी हीच संधी साधायचे ठरवले होते. त्यानुसार, हल्लेखोर रविवारी टायगरची सुमारे १५ मिनिटे वाट पाहत होते.
हल्लेखोरांची पार्श्वभूमी
कोटा शहराच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात वापरण्यात आलेली शस्त्रे अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाहीत. गोळीबारासाठी वापरलेल्या शस्त्राचा वापर सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातही करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, या प्रकरणातील शस्त्र आणि त्याचा पुरवठा करणाऱ्यांबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. टायगरकडून या खंडणी प्रकरणात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. आरोपींचे इतर कोणाशी संबंध आहेत का, त्यांना शस्त्र कोणी पुरवले आणि या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा गुन्हे शाखा तपास करीत आहेत. त्यासाठी गुन्हे शाखेने २० पथके तैनात केल्याचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले.
सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली
टायगरवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेरील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले पोलीस कर्मचारी आणि पोलीस वाहने अभिनेत्याच्या घराबाहेर तैनात करण्यात आले आहेत.
मोटारसायकल जप्त
हल्लेखोरांनी वापरलेली पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. अंधेरी पश्चिम रेल्वेस्थानकाजवळ रविवारी रात्री ही मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर ती डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या मोटारसायकलच्या मालकी हस्तांतरणाची कागदपत्रे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, मोटारसायकलच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोटारसायकलचा पहिला मालक जोगेश्वरी परिसरातील रहिवासी होता. त्याने तीदुसऱ्या व्यक्तीला विकली. त्यानंतर दुसऱ्या मालकाने ती तिसऱ्या व्यक्तीला विकली.
या तिसऱ्या मालकाकडून हल्लेखोरांनी पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी खरेदी केली होती. या व्यवहारासाठी सुमारे २५ हजार रुपये दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक नावाच्या व्यक्तीने ११ सप्टेंबरला ही मोटारसायकल खरेदी केली होती. मात्र, मोटारसायकलचे पैसे मिळाल्यानंतरही मालकी हस्तांतरणाची अधिकृत कागदपत्रे पूर्ण करण्यात आली नव्हती. नवरात्रीनंतर कागदपत्रे हस्तांतरित करण्याचे नियोजन होते. त्याआधीच या मोटारसायकलचा वापर गोळीबाराच्या घटनेत करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे.
मोटारसायकलची खरेदी-विक्री नेमकी कोणत्या क्रमाने झाली, ती हल्लेखोरांपर्यंत कशी पोहोचली आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. मोटारसायकलच्या मालकीसंबंधी कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांची पडताळणी केली जात आहे. हल्लेखोरांपर्यंत पोलीस मोटारसायकलचा धागा पकडूनच पोहोचले. या प्रकरणात मोटारसायकल खरेदी करणाऱ्या पाचव्या व्यक्तीची भूमिका काय होती, याचाही तपास केला जात आहे.
मुंबई-राजस्थान पोलिसांत श्रेयवादाची लढाई
टायगरवर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या अटकेवरून मुंबई आणि राजस्थान पोलिसांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसत आहे. आरोपींना नेमके कोणी आणि कशाच्या आधारे अटक केली, यावर दोन्ही पोलिसांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत असून, आरोपींपैकी एकाच्या वयाबाबतही पोलिसांनी दिलेल्या माहितीत तफावत आहे.
राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे प्रवासादरम्यान आरोपींना पकडले. दुसरीकडे, मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींचा शोध आधीपासूनच सुरू होता. आरोपी हातातून निसटू नयेत, यासाठी मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांना त्यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी आरोपींना अटक केल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांचे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी दिल्ली, राजस्थान आणि गुजरात पोलिसांची मदत घेण्यात आली होती. विविध राज्यांतील पोलिसांमध्ये समन्वय साधून आरोपींचा शोध घेण्यात आला.
वयाबाबत संभ्रम
आरोपींच्या वयावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. राजस्थान पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला अल्पवयीन असल्याचे सांगितले आहे. मात्र, उपायुक्त राजतिलक रोशन यांनी मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कोणीही अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट केले. सर्व आरोपी १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेमकं काय घडलं?
- रविवार (१८ ऑक्टोबर) संध्याकाळ सातची वेळ…अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणे जुहूच्या पुष्पा पार्क येथील फुटबॉल मैदानावर आला होता. टायगर श्रॉफ आल्यामुळे नेहमीप्रमाणे चहातेदेखील होते.
- ७ वाजताच्या आसपास टायगर श्रॉफ आपल्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून आपल्या चाहत्यांचा निरोप घेऊन मैदानावरून बाहेर पडलाच होता, की चाहत्यांच्या गर्दीत मिसळलेल्या दोघांनी अचानक आपापल्या बंदुका बाहेर काढल्या आणि टायगरच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
- दहा राऊंड या दोघांनी फायर केल्याची माहिती आहे. गोळीबार करताना एकाची बंदूक अडकली, तर दुसरा मात्र गोळीबार करतच राहिला. गोळीबारानंतर दोघेही बाईकवर बसून पसार झाले. या गोळीबारात टायगर श्रॉफला गोळी लागली नसली, तरी गाडीच्या फुटलेल्या काचांमुळे तो जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्या छातीवर तसेच हाताला जखम झाल्याची माहिती आहे.
- टायगरच्या गाडीचा चालक फिरदौस हा गोळीबारात जखमी झाला असून, उमेश चरण हा त्याचा फॅनदेखील जखमी झाला आहे. चाहत्याच्या थेट छातीत गोळी लागली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फिरदौसवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read About : Tiger Shroff Mumbai Car Firing Incident 18 Oct: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.