मॉस्कोनंतर अमेरिकेच्या विशेष दूतांची कीवमध्ये झेलेन्स्की यांच्याशी भेट
Russia Ukraine War कीव : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी जागतिक स्तरावर राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर हे अमेरिकन दूत थेट युक्रेन दौऱ्यावर पोहोचले आहेत.
शांतता वार्ता आणि सुरक्षा हमीवर चर्चा
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या बैठकीला अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी म्हटले आहे. या उच्चस्तरीय बैठकीत रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी थांबलेली त्रिपक्षीय शांतता चर्चा (युक्रेन, अमेरिका आणि रशिया) पुन्हा सुरू करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. याशिवाय, युक्रेनची सुरक्षा, आर्थिक हमी आणि आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणाऱ्या मदत पॅकेजवर दोन्ही बाजूंमध्ये सविस्तर चर्चा झाली.
हवाई सुरक्षा आणि ऊर्जेसाठी अमेरिकेकडून अपेक्षा
झेलेन्स्की यांनी सांगितले की, युक्रेनला सध्याच्या परिस्थितीत हवाई सुरक्षा आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. तसेच, अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर लिक्विफाइड नॅशनल गॅस मिळण्याबाबत युक्रेन आशावादी आहे. या चर्चेच्या तिसऱ्या फेरीत ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसह अनेक युरोपीय देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
त्रिपक्षीय चर्चेची लवकरच घोषणा होण्याची शक्यता
अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोतील चर्चेत महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे सांगत, लवकरच त्रिपक्षीय शांतता चर्चेची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, रशियानेही अमेरिकेसोबत राजकीय आणि राजनैतिक तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी अबुधाबी आणि जिनेव्हा येथे या चर्चेच्या फेऱ्या झाल्या होत्या, मात्र नंतर त्या स्थगित झाल्या होत्या.
