अंत्यविधीसाठी जात असताना अनंतगिरी घाटात भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने बस दरीत कोसळल्याची माहिती
विकाराबाद : Vikarabad Bus Accident तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यात अनंतगिरी घाट रोड परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खाजगी बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. या भीषण अपघातात ३ महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
ब्रेक फेल झाल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, संगारेड्डी जिल्ह्यातील केसारम गावचे काही ग्रामस्थ एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी खाजगी बस भाड्याने करून चिंताकुंटा गावाकडे चालले होते. बस अनंतगिरी डोंगराच्या धोकादायक घाट रस्त्यावरून खाली उतरत असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले. घाट रस्त्यावरील तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्यावरून घसरून दरीच्या दिशेने कोसळली.
स्थानिकांकडून तातडीने बचावकार्य
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बस दरीत उलटल्यामुळे अनेक प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. स्थानिकांनी प्राणांची बाजी लावून बसच्या काचा तोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी विकाराबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
या भीषण अपघातावर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना प्रकट केल्या असून, जिल्हा प्रशासनाला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.