मनपा आयुक्तांचा दुजाभाव : नागरिकांना एक न्याय, कर्मचाऱ्यांना दुसरा
Chh. Sambhajinagar Municipal Corporation fine छत्रपती संभाजीनगर : नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या मुदतीत त्यांच्याकडील संचिका (फाइल) निकाली काढणे बंधनकारक आहे. वेळेत संचिका निकाली न काढणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दंड लावण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला आहे. मात्र हा दंड १ ते ५० रुपयांमध्ये आहे, तर दुसरीकडे पाणी वाया घालणाऱ्या नागरिकांना मात्र ५ ते २५ हजारांपर्यंत दंडाचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. नागरिकांना एक न्याय आणि मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय देणाऱ्या आयुक्तांची भूमिका म्हणजे ‘आपला तो बबड्या, दुसऱ्याचे ते कारटं’ अशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
महापालिकेतील कामांसाठी नागरिकांना चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेत दाखल केलेल्या संचिका सापडत नसल्याचे प्रकारही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे ई-ऑफिस प्रणालीचा वापर केला जात आहे. संबंधित कर्मचारी, विभागप्रमुखांकडे ऑनलाइन प्रणालीद्वारे संचिका जात आहेत. संचिका मिळाल्यानंतर त्यावर आवश्यक कार्यवाही करून अभिप्राय आणि स्वाक्षरीसह पुढे पाठविणे आवश्यक आहे. ई-ऑफिस प्रणाली संचिकेचा प्रवास दिसून येतो.
कोणत्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे ही संचिका आहे, किती दिवसांपासून प्रलंबित आहे, त्यांनी ती कधी निकाली काढली, याची नोंद असते. संचिका प्रलंबित राहू नये, यासाठी आयुक्तांनी कालमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. असे असतानाही, संचिकांचा वेग काही वाढलेला नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे संचिका दहा-दहा दिवस अडकून पडत आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांकडूनही ओरड सुरू झाली आहे. कामाची गती वाढविण्यासाठी आयुक्तांनी आता अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे.
असा आहे कर्मचाऱ्यांसाठी दंड
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सात दिवसांत संचिका निकाली काढावी, अन्यथा ८ ते १४ दिवसांसाठी संचिका निकाली न काढल्यास प्रति संचिका प्रतिदिन १ रुपया, १५-३० दिवसांत निकाली न काढल्यास २ रुपये आणि ३० ते ६० दिवसातही संचिका निकाली न काढल्यास ५० रुपये प्रति दिन प्रति संचिका दंड आकारण्यात येणार आहे. एखाद्या कर्मचारी, अधिकाऱ्याने १० संचिका ३० दिवस जरी दाबून ठेवली, तरी त्याच्या दंडाची रक्कम रुपयांमध्येच असणार आहे.
दुसरीकडे पाणी वाया घालणाऱ्या शहरातील नागरिकांकडून पहिल्या वेळेस आढळल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्या वेळेस १० हजार रुपये आणि दोनदा दंड आकारल्यानंतरही पाणी बचतीची शिस्त न लागल्याचे दिसून आल्यास, तिसऱ्या वेळी मात्र २५ हजार रुपये दंड व फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत.
Read about https://epunyanagari.com/nashik-viral-video-road-jail-md-drugs/
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.