NIT राउरकेलाच्या संशोधकांचे नाविन्यपूर्ण संशोधन; फणसाच्या सालीपासून तयार केलेल्या विशेष पदार्थाला पेटंट, ग्रामीण भागांसाठी स्वस्त फिल्टर विकसित करण्याचे उद्दिष्ट
नवी दिल्ली : Water Purification Technology ज्या फणसाच्या सालाला आपण कचरा समजून फेकून देतो, त्याचाच वापर करून आता दूषित पाणी स्वच्छ करण्याचा एक अनोखा मार्ग संशोधकांनी शोधून काढला आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) राउरकेला येथील संशोधकांनी फणसाच्या सालीपासून एक विशेष पदार्थ विकसित केला आहे, जो अवघ्या १० मिनिटांत पाण्यातून ९० टक्क्यांहून अधिक फ्लोराईड यशस्वीरित्या काढून टाकतो. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला पेटंट देखील मिळाले आहे.
असे कार्य करते हे तंत्रज्ञान
या प्रक्रियेत फणसाच्या सालीपासून सक्रिय कार्बन (ॲक्टिव्हेटेड कार्बन) तयार केला जातो. त्यानंतर त्यात झिरकोनियम मिसळून त्याची पाण्यातून फ्लोराईड शोषून घेण्याची क्षमता वाढवली जाते. एनआयटी राउरकेलाच्या प्राध्यापक सुस्मिता मिश्रा आणि संशोधक डॉ. प्रतिमा मिंज यांच्या टीमने हे संशोधन केले आहे. त्यांनी १ ते ५ मिग्रॅ/लिटर फ्लोराईड असलेल्या पाण्यावर प्रयोग केला असता, अवघ्या १० ते २० मिनिटांत ९० ते ९७ टक्क्यांपर्यंत फ्लोराईड नष्ट झाल्याचे दिसून आले.
इतर तंत्रज्ञानापेक्षा फायदेशीर
सध्या बाजारात असलेल्या आरओ सिस्टीममुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते आणि कॅल्शियम-मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजेही पाण्यातून निघून जातात. तर इतर पद्धतींमध्ये रसायनांचा वापर करावा लागतो. त्या तुलनेत फणसाच्या सालीपासून बनवलेला हा पर्याय स्वस्त आणि शाश्वत आहे.
खर्च आणि भविष्य
वीज आणि रसायनांचा खर्च धरून हा पदार्थ तयार करण्याचा अंदाजे खर्च ३७ रुपये प्रति ग्रॅम आहे. सध्या हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या पातळीवर यशस्वी झाले असून, लवकरच याचे प्रात्यक्षिक मॉडेल तयार करून ग्रामीण व निमशहरी भागांसाठी घरगुती फिल्टर विकसित केले जातील.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास दातांचे आणि हाडांचे गंभीर आजार (फ्लोरोसिस) होऊ शकतात. त्यामुळे भारतातील अनेक भागांतील भूजलाची समस्या सोडवण्यासाठी हा कृषी कचऱ्यापासून बनवलेला पर्याय अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
Read About: Japan MMX Mission : मंगळाच्या चंद्रावरून माती आणणार जपान; 2031 मध्ये नमुने पृथ्वीवर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.