Ad Advertisement Ad Advertisement

YCMOU Answer Sheet Evaluation Scam – मुक्त विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत मोठा घोटाळा!

बनावट आयडीने १९ हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन; ४८ जणांवर गुन्हा, २ लाख ७६ हजारांचे मानधन उचलल्याचा आरोप; केंद्र संचालक, प्राचार्यांसह शिक्षकांचा समावेश

लासुर स्टेशन : YCMOU Answer Sheet Evaluation Scam यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील उत्तरपत्रिका मूल्यमापन प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषयाचे तज्ज्ञ नसलेल्या शिक्षकांकडून बनावट आयडीचा वापर करून तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून घेतल्याचा आणि त्यापोटी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांचे मानधन घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कॅप सेंटर संचालक, प्राचार्य, तांत्रिक सहाय्यक आणि शिक्षकांसह एकूण ४८ जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायोमेट्रिकचा वापर करून बनावट आयडी

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, ९ जून ते ४ जुलै २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. विद्यापीठाच्या नियमांनुसार अधिकृत परीक्षकांकडूनच संबंधित विषयांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून अधिकृत परीक्षकांच्या बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) घेऊन उत्तरपत्रिका तपासणीची लिंक अथवा साईट उघडली. त्यानंतर बनावट आयडीचा वापर करून संबंधित विषयांचे तज्ज्ञ नसलेल्या अनधिकृत शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचा आरोप आहे.

१९ हजार २३१ उत्तरपत्रिकांची तपासणी

या कथित गैरव्यवहारात विविध विषयांच्या एकूण १९ हजार २३१ उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यात आले. या कामापोटी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपयांचे मानधन घेण्यात आले. या रकमेतील काही हिस्सा अनधिकृत शिक्षकांना देण्यात आला, तर विद्यापीठाच्या निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

केंद्र संचालक, प्राचार्याचाही समावेश

या प्रकरणात प्रा. मधुकर साठे (कॅप सेंटर संचालक), प्राचार्य डॉ. संदीप राजाभाठ चिरडे, तांत्रिक सहाय्यक दादासाहेब कन्हाळे, अंकुश गंगाराम पडाळे, प्रा. विशाल अशोकराव चपटे यांच्यासह अन्य ४३ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

विद्यापीठासह विद्यार्थ्यांची फसवणूक

उत्तरपत्रिका तपासणीसाठी अधिकृत शिक्षकांच्या नावाचा आणि बायोमेट्रिक प्रक्रियेचा वापर करून प्रत्यक्षात अनधिकृत शिक्षकांकडून मूल्यमापन करून घेण्यात आले. यामुळे विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन होण्याबरोबरच विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपकुलसचिव मनोज नारायण घंटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

तपासात डिजिटल पुरावे महत्त्वाचे

या प्रकरणात उत्तरपत्रिका तपासणीसाठी वापरलेले आयडी, बायोमेट्रिक नोंदी, डिजिटल लॉगिन रेकॉर्ड, परीक्षकांची उपस्थिती आणि मानधनाचे आर्थिक व्यवहार तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. या तपासातून उत्तरपत्रिका मूल्यमापनातील कथित गैरव्यवहाराची व्याप्ती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Read About : MPSC Group C Recruitment 2026 – एमपीएससीचा मेगा दिलासा; गट-क परीक्षेची पदसंख्या आता १६ हजार ७१७ वर!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.