Ad Advertisement Ad Advertisement

MPSC Group C Recruitment 2026 – एमपीएससीचा मेगा दिलासा; गट-क परीक्षेची पदसंख्या आता १६ हजार ७१७ वर!

११ हजार १० पदांची थेट वाढ : १३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज व विकल्पांची संधी; परीक्षा आता २४ जानेवारीला

मुंबई : MPSC Group C Recruitment 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत थेट ११ हजार १० पदांची वाढ करण्यात आली असून आता ही भरती एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी होणार आहे. वाढीव पदसंख्येमुळे उमेदवारांना नव्याने अर्ज आणि विकल्प सादर करण्यासाठी १३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान मुदत देण्यात आली असून पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीऐवजी २४ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.


राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अंतरिम अहवालातील शिफारशींनुसार आणि आयोगाला प्राप्त अतिरिक्त मागणीपत्रांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेसाठी २५ जून २०२६ रोजी २ हजार ६१९ पदांची मूळ जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर २२ जुलै रोजी ३ हजार ८८ पदांची भर पडून पदसंख्या ५ हजार ७०७ झाली होती. आता नव्याने ११ हजार १० पदांचा समावेश झाल्याने पदसंख्या १६ हजार ७१७ वर पोहोचली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली एक वर्षाची शिथिलता या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना लागू राहील.

१३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज

वाढीव पदसंख्येनुसार नवीन उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करता येतील. यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक अर्हतेनुसार नव्या संवर्गांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना केवळ पसंतीक्रम किंवा विकल्प नोंदवता येतील; त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली जाईल.

पूर्व परीक्षा २४ जानेवारी

सर्व संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा १५ नोव्हेंबर २०२२ च्या अभ्यासक्रमानुसार लेखी (उत्तरपत्रिका/ओएमआर) पद्धतीने होईल. अर्ज व विकल्पांसाठी मुदतवाढ दिल्याने पूर्वी ३ जानेवारी रोजी नियोजित परीक्षा आता २४ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाईल. विशेष शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार असून त्याचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे.

Read About : MPSC Age Relaxation 2026 – सरळसेवा पदभरतीची वयोमर्यादा एक वर्षाने शिथिल

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.