Ad Advertisement Ad Advertisement

850-Year-Old Inscription in Murti Village धुण्याच्या दगडाखाली ८५० वर्षांचा इतिहास !

मूर्ती गावात आढळून आला हळेकन्नड शिलालेख : मातीत दडलेला शतकांचा इतिहास पुन्हा उजेडात

850-Year-Old Inscription in Murti Village अंबाजोगाई : तालुक्यातील मूर्ती गावात रस्त्यालगत धुणे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाच्या रूपात पडून असलेल्या शिळेवर तब्बल आठशे-पन्नास वर्षे जुना असण्याची शक्यता असलेला हळेकन्नड शिलालेख आढळून आला आहे. ‘श्री नागेश्वर देवाची जमीन’ असा आशय असलेल्या या शिलालेखामुळे मूर्ती परिसराच्या प्राचीन धार्मिक व ऐतिहासिक वारशावर नव्याने प्रकाश पडला आहे.

सीताराम रतन फड यांच्या घरासमोर ही शिळा आडवी पडलेली होती. शिळेवर सूर्य, चंद्र, शिवपिंड, गाय आणि तलवारीचे अंकन असून, त्याखाली दोन ओळींचा हळेकन्नड भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. मूर्ती गावाला भेट दिल्यानंतर बालाजी मुंडे यांच्या निदर्शनास हा शिलालेख आला. त्यांनी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यानंतर इतिहास संशोधक कृष्णा गुडदे यांनी गावाला भेट देऊन शिलालेखाची छाप घेतली.

हळेकन्नड वाचक डॉ. देवरकोंडा रेड्डी यांनी केलेल्या वाचनातून शिलालेखातील मजकूर समोर आला. त्यात ‘श्री नागेश्वर देवाची जमीन’ असा अर्थ स्पष्ट होतो. शिलालेखात कालोल्लेख नसला तरी लिपी, भाषा आणि अक्षरवळणाच्या आधारे तो साधारण १२ व्या शतकातील, सुमारे ८५० वर्षे जुना असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

ही शिळा सध्या १०५ सेंमी उंच व ३० सेंमी रुंद असून, त्यातील सुमारे ५० सेंमी भागावर शिल्प व लेख आहे. शिलालेखाचा भाग १२ बाय ३० सेंमी आहे. विशेष म्हणजे, सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी ‘दराडे’ नावाच्या व्यक्तीने ही शिळा मूर्तीच्या उत्तरेस असलेल्या ‘तांबूळ’ शिवारातून गावात आणल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

विशेष म्हणजे, आज मूर्ती या गावात नागेश्वराचे प्राचीन मंदिर अस्तित्वात नाही; मात्र, शिलालेखातून नागेश्वर देवासाठी जमीन दान देण्यात आल्याचा प्रथमच पुरावा मिळाला आहे. त्यामुळे या परिसरात पूर्वी एखादे मंदिर अस्तित्वात असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. मूर्तीच्या नैऋत्येस सूर्य, चंद्र, गाय आणि भगवान महावीर यांचे अंकन असलेले आणखी एक शिल्प आढळले. यावरून परिसरातील प्राचीन धार्मिक परंपरांचा अभ्यास करण्यास नवा धागा मिळाला आहे.

या शोधासाठी पुरातत्व अभ्यासक राजेश फड (धर्मापुरी), युट्यूबर बालाजी मुंडे, राम फड (मूर्ती) यांच्यासह ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, तरुण व जिज्ञासू मुलांचे सहकार्य लाभले. डॉ. देवरकोंडा रेड्डी आणि निर्मला मॅडम यांच्या मदतीने शिलालेखाचे वाचन शक्य झाले. धुण्याच्या दगडाच्या रूपात दुर्लक्षित पडलेल्या या शिळेने मूर्ती गावाच्या मातीत दडलेला शतकांचा इतिहास पुन्हा उजेडात आणला आहे.

धर्मापुरीच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक पटाशी संबंध?

तांबूळ परिसरात मूर्ती, धर्मापुरी आणि लाडझरी या गावांच्या सीमा एकत्र येतात. हा परिसर धर्मापुरी येथील मरळसिद्ध मंदिरापासून अवघ्या १.१ किलोमीटरवर आहे. चालुक्य काळात धर्मापुरी हे महत्त्वाचे नगर होते. त्यामुळे या शिलालेखामुळे मूर्ती परिसराचा धर्मापुरीच्या तत्कालीन ऐतिहासिक-सांस्कृतिक पटाशी असलेला संबंध अधोरेखित होण्याची शक्यता आहे.

मूर्ती सापडत असल्याने गावाचे नाव मूर्ती

मूर्ती गावात श्री नागेश्वर देवाची जमीन असल्याचे शिलालेखातून समजते व ते मंदिर पूर्वी अस्तित्वात होते हेही यातून समजते. गावात नागोबा मंदिर आहे. मात्र ो एका ओट्यावर नाग मूर्ती व इतर काही मूर्ती उघड्यावर ठेवलेल्या आहेत. जुने म्हणावे असे एकही मंदिर मूर्ती गावात नाही. एक अंदाज असा की, येथे पूर्वी मूर्ती सापडत असल्याने या गावाचे नाव मूर्ती पडले असावे.

Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.