Loan EMI and Financial Stress : घर, शिक्षण, व्यवसाय किंवा आजारपणासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. योग्य गरजेसाठी परतफेडीची क्षमता पाहून घेतलेले कर्ज उपयोगी ठरते. त्याची जबाबदारी पेलताना आरोग्यावरील ताण शक्य तितका कमी ठेवणे, हेही आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट असले पाहिजे.
चिता चिन्ता समाप्रोक्ता बिन्दुमात्रं विशेषता।
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता॥ – सुभाषित
चिता आणि चिंता यांत फक्त एका बिंदूचा फरक. चिता मृत शरीराला जाळते, चिंता मात्र जिवंत माणसाला आतून जाळत राहते.
रात्रीचे २ वाजले होते. प्रशांत चौथ्यांदा बँकेचे ॲप उघडून बॅलेन्स पाहत होता. हातात येणारा पगार ८० हजार रुपये, त्यातले ४५ हजार हप्त्यांमध्ये आणि ३० हजार घरखर्चात. उरले फक्त ५,०००. गेले तीन आठवडे डोकेदुखी पाठ सोडत नव्हती. पण ‘हा हप्ता जाऊ दे मग डॉक्टरांकडे जाऊ’ म्हणत तो तपासणी पुढे ढकलत होता. हप्ते वेळेवर जात होते, झोप मात्र रोज उशिरा येत होती. ‘या महिन्याचा हप्ता भरला, पण पुढच्या महिन्याचे काय?’ हा प्रश्न अनेकांच्या मनात प्रशांतसारखाच फिरत असतो.
कर्जाचा आरोग्यावर परिणाम?
१. हप्ता डोक्यात राहतो, झोप आणि कामातून जातो : पगार जमा होण्यापूर्वीच त्याचे वाटप झालेले असते. ‘नोकरी गेली तर? व्यवसायाचे पैसे अडकले तर?’ हे प्रश्न सुटत नाहीत. शरीर थकलेले असते, पण मनात हप्त्यांचे गणित सुरूच राहते. ज्या कामातून कर्ज फेडायचे आहे, त्या कामावरच त्याचा परिणाम होतो. झोप उडालेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी अनेकदा आणखी एक टॉप-अप किंवा कार्डचे कर्ज स्वीकारते.
२. आरोग्यावरील खर्च टाळताना वैद्यकीय बिल वाढते : ‘हप्ता भरू, औषधे पुढच्या आठवड्यात घेऊ,’ ही तडजोड धोकादायक ठरते. ताणामुळे रक्तदाब तात्पुरता वाढू शकतो आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.
३. अतिरिक्त कामाच्या नादात आरोग्याच्या सवयी मोडतात : हप्ते भागवण्यासाठी अधिक काम स्वीकारले जाते. जेवणाच्या वेळा बदलतात आणि सुट्टीच्या दिवशीही विश्रांती मिळत नाही. अतिरिक्त काम हप्ता भागवते, पण झोप आणि जेवणाची नियमितता सतत बिघडली तर कमावण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि कामाची गुणवत्ता कमी होते.
४. घरातील संवादाचे रूपांतर वादात होते : मुलाने छोटी वस्तू मागितली तरी चिडचिड होते. जोडीदाराने खर्चाचा विषय काढला की वाद सुरू होतो. आर्थिक परिस्थिती लपवल्याने गैरसमज आणखी वाढतात. कर्ज लपवल्याने घरच्यांच्या अपेक्षा बदलत नाहीत आणि त्या पूर्ण करण्याचा दबाव वाढत राहतो. कर्ज घेणे कधी अपरिहार्यही असते – प्रत्येक कर्ज उधळपट्टीतून निर्माण होत नाही. घर, शिक्षण, व्यवसाय किंवा आजारपणासाठी कर्ज घ्यावे लागू शकते. योग्य गरजेसाठी परतफेडीची क्षमता पाहून घेतलेले कर्ज उपयोगी ठरते. त्याची जबाबदारी पेलताना आरोग्यावरील ताण शक्य तितका कमी ठेवणे, हेही आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट असले पाहिजे.
कर्जाचा ताण आरोग्यावर येऊ नये म्हणून तुम्ही खालील काळजी घ्या…
१. आरोग्याचा खर्च बाजूला ठेवूनच हप्ता ठरवा : कुटुंबाचे औषधपाणी, आवश्यक तपासण्या, विम्याचे हप्ते आणि घरखर्च यासाठी पैसे राखून मगच किती ईएमआय परवडेल ते ठरवा. बँकेने मंजूर केलेली रक्कम आणि आपल्याला परवडणारी रक्कम वेगवेगळी असते.
२. डोक्यातील हिशेब कागदावर आणा : सर्व कर्जांची बाकी, व्याजदर, हप्ते आणि देय तारखा एका ठिकाणी लिहा. नातेवाईकांकडून, सोनाराकडून किंवा खाजगी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज सिबिलमध्ये दिसत नाही, पण झोपेत मात्र दिसते. त्याची देय तारीख, व्याज आणि लाज एकाच वेळी डोक्यात राहते. कागदावर लिहिताना हे कर्जही लिहा. लपलेले कर्ज फेडले जात नाही, फक्त चिंता वाढवते. गणिताने पाहिले तर जास्त व्याजाचे कर्ज आधी फेडणे फायद्याचे. पण, मन:शांतीसाठी कधी सर्वात लहान कर्ज पूर्ण संपवणेही उपयोगी ठरते.
३. अडचण वाढण्यापूर्वी बँकेशी बोला : हप्ता चुकल्यानंतर नाही, चुकण्याआधी बँकेशी बोला. सर्व हप्त्यांच्या तारखा पगार जमा झाल्यानंतर २ ते ३ दिवसांनी ठेवता येतात का हेही विचारा. मुदत वाढवल्यास हप्ता कमी होतो, पण एकूण व्याज नक्की वाढते.
४. आणीबाणी निधीसोबत विम्याचे संरक्षण ठेवा : घरखर्च आणि हप्ते मिळून ३ ते ६ महिने पुरेल असा निधी टप्प्याटप्प्याने उभा करा. घरात ७० वर्षांवरील ज्येष्ठ असतील, तर उत्पन्नाची अट नसलेल्या ‘आयुष्मान वय वंदना’ कार्डची नोंदणी करून घ्या. तुमच्या उत्पन्नावर कुटुंब अवलंबून असेल तर पुरेशा टर्म विम्याचाही विचार करा. औषधांचा निधी, विम्याचा हप्ता किंवा तीन महिन्यांचा आणीबाणी निधी शून्यावर आणू नका.
५. कुटुंबाला परिस्थिती आणि योजना दोन्ही सांगा : ‘सगळी जबाबदारी माझीच’ म्हणून चिंता एकट्याने वाहू नका. जोडीदारासमोर अडचणीबरोबर त्यातून बाहेर पडण्याची योजनाही मांडा. परिस्थिती समजली की एकमेकांना आधार देणे सोपे होते.
६. व्यावसायिक मदत घ्या : कर्जफेड सुरू असतानाही झोप, विश्रांती आणि आवश्यक उपचार पुढे ढकलू नका. सरकारची Tele-MANAS हेल्पलाइन १४४१६ मोफत, २४ तास आणि आपल्या भाषेत उपलब्ध आहे. मानसिक ताण हाताळणे कठीण होत असेल तर नक्की संपर्क साधा. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त १५ मिनिटे काढा. सर्व कर्जे, हप्ते आणि देय तारखा एका कागदावर लिहा आणि तो कागद जोडीदाराला दाखवा. डोक्यातली चिंता मोठी वाटते; कागदावर आली की तिचा खरा आकार कळतो.
अभिजीत कोळपकर
संपर्क : ९५०३०८२७७८
Read About : Why Naval Ships Are Grey : सैन्यांच्या जहाजांसाठी राखाडी रंग महत्वाचा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.