Telangana Principal Murder : रूपाने त्याला ओळखून ‘बाबू? तू?’ असे उद्गार काढले. लगेच त्याने रूपावर सपासप चाकूचे वार करायला सुरुवात केली. तब्बल सत्तावीस वार केले. रूपा रक्ताच्या थारोळ्यात मरून पडल्या.
गेले काही महिने ‘जेन झी’ नावाने संबोधली जाणारी युवा पिढी देशभर चांगल्या अर्थाने चर्चेत आहे. स्वत:वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही पिढी जातपात-धर्म विसरून एक झाली आणि एकजुटीने अन्यायाविरुद्ध उभी राहिली म्हणून ज्येष्ठ नागरीक तिचे कौतुक करीत आहेत. विविध राजकीय पक्ष तिच्याशी संवाद साधून तिला समजून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत. या पिढीकडून देशाला खूप मोठ्या आशा आहेत. कारण हीच पिढी उद्याची मतदार आणि जबाबदार नागरीक असणार आहे.
असे असताना काही अपवादभूत ठरणाऱ्या घटना या आशेला गालबोट लावतात तेव्हा दु:ख होते. आपल्या संस्कृतीत गुरूला किती मोठे स्थान आहे हे सांगायची गरज नाही. माता आणि पित्यानंतर गुरूलाच आपण वंदन करतो. तेलंगणाच्या नलगोंडा शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी नागार्जुन पब्लिक स्कूलची प्राचार्य आणि संचालक रूपा रेड्डी (वय वर्षे ४८) या देवराकोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या शरीरावर एक दोन नव्हे, चाकूचे २७ वार झाले होते. पोलिसांना ही घटना समजल्यावर त्यांचे पथक घटनास्थळी पोचले तेव्हा त्यांच्या घरात कोणी नव्हते. रुपा यांचा मोबाइल आणि घरातील बरीच मोठी रोकड गायब होती. रूपाचे पती राजेंद्र आपल्या मुलासह हैदराबाद येथे होते. त्यांचा मुलगा अभिनव हैदराबादमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो. रूपाच्या खुनाची हकीकत समजल्यावर ते देखील त्वरित नलगोंडा येथे येऊन दाखल झाले.
दिवंगत रुपाचे कोणाशी वैर नव्हते. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून खून झाला नव्हता. घरातील रोकड आणि रूपाचा मोबाइल गायब होता त्या अर्थी हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा. हा धागा पकडून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. खुनाच्या आधी घडलेल्या घटनांचा क्रम असा होता. राजेंद्र रेड्डी आणि अभिनव हैदराबादमध्ये राहतात. रुपाने तीन दिवस रजा काढली होती. पती आणि मुलांसह राहण्यासाठी त्या हैदराबादला आल्या होत्या. पण १० ऑगस्ट रोजी कॉलेजच्या काही कामासाठी त्यांना अचानक नलगोंडा येथे जावे लागले. रुपा रेड्डी १० ऑगस्ट रोजी कॉलेजमध्ये आल्या होत्या. त्या दिवशी त्यांना संध्याकाळी साडेसहापर्यंत काम करावे लागले. तोच त्यांचा कॉलेजमधला शेवटचा दिवस ठरणार हे त्यांना ठाऊक नव्हते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी जमा झाली होती. फीमधील बरीच रक्कम रोख स्वरूपात होती. ती दुसऱ्या दिवशी बँकेत जाणे अपेक्षित होते. पण या फीच्या रकमेनेच त्यांचा घात केला.
दिनांक ११ ऑगस्ट रोजी रुपा कॉलेजमध्ये आल्याच नाहीत. कॉलेजमधील सहकाऱ्यांना अचंबा वाटला. त्याच वेळी राजेंद्र रेड्डी यांनी पत्नीला अनेकदा फोन केला. पण फोन लागत नाही म्हटल्यावर त्यांनी नलगोंडा येथील घराजवळच्या पोलीस स्टेशनला फोन करून चौकशीची विनंती केली. पोलीस पथक घटनास्थळी गेले आणि शेजारीपाजारी चौकशी करून रेड्डींच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना रुपा रेड्डी मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनी त्वरित तपासाला सुरुवात केली. वर सांगितल्याप्रमाणे चोरी हाच खुनाचा मोटिव्ह दिसत होता. आधी पोलिसांनी राजेंद्र रेड्डी आणि आसपासच्या ऐंशी लोकांना गाठून चौकशी केली. पण त्यात काही हाती लागले नाही. दरम्यान घराजवळील सर्व सीसीटीव्हीची फूटेजेस त्यांनी तपासायला सुरुवात केली. जवळपास ७० फूटेजेस तपासल्यावर त्यांना काही धागेदोरे मिळाले. पण त्याआधी आणखीन एक महत्त्वाचा स्रोत हाती आला तो रूपाच्या कॉल रेकॉर्डमुळे. मृत्यूपूर्वी काही क्षण रुपा आपल्या मावशीबरोबर फोनवर बोलत होत्या. फोन चालू असतानाच त्यांच्या खोलीत आरोपी शिरले. ओळख लपवण्यासाठी त्यांनी डोक्यावर मंकी कॅप (माकड टोपी) आणि चेहऱ्यावर मास्क लावले होते. चाकू दाखवून रुपाना धमकावताना एकाच्या चेहऱ्यावरचा मास्क घसरला. त्याचा चेहरा बघून रूपा आश्चर्याने ओरडल्या, ‘बाबू? तू?’ मावशीने ते शब्द ऐकले होते. शिवाय फोनवरील संभाषण रेकॉर्ड झाले होते.
रुपावर खुनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीला रुपा ओळखत होत्या आणि त्याचे नाव बाबू होते हे पोलिसांना समजले. सखोल चौकशीअंती लक्षात आले की कॉलेजमध्ये पाच विद्यार्थ्यांना रुपा ‘बाबू’ म्हणून संबोधायच्या. पोलिसांनी त्या पाच जणांवर पाळत ठेवली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यावर लक्षात आले की त्या पाच जणांपैकी एक जण खुनाच्या घटनेआधी पाच दिवस रूपाच्या घराभोवती घिरट्या घालत होता आणि रेकी करीत होता. आता त्या पाच जणांपैकी तीन जण आपोआप गळाले आणि रेकी करणाऱ्या मुलासह दोनजण उरले. त्यांना ताब्यात घेतल्यावर अवघ्या काही मिनिटात त्यांनी गुन्हा कबूल केला. घटनास्थळी आढळलेले हातांचे ठसे आणि या दोघांपैकी एकाच्या हातांचे ठसे देखील जुळले. अशा रीतीने दोघांभोवतीचे कायद्याचे दोर भक्कमपणे आवळले गेले.
खुनाच्या दिवशी रात्री दोघेजण रूपाच्या घरापाशी आले होते. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी डोक्यावर माकड टोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावले होते. आसपास लक्ष ठेवण्यासाठी दोघातील एक जण बाहेर थांबला. दुसरा घरात शिरला. त्या वेळी रुपा मावशीशी बोलत होत्या. त्यांना चाकू दाखवून पैसे मागितले. तेवढ्यात त्याला जवळ ठेवलेली रक्कम दिसली ती उचलताना चुकून त्याचा मास्क घसरला. रुपाने त्याला ओळखून ‘बाबू? तू?’ असे उद्गार काढले. लगेच त्याने रूपावर सपासप चाकूचे वार करायला सुरुवात केली. तब्बल सत्तावीस वार केले. रुपा रक्ताच्या थारोळ्यात मरून पडल्या. त्याने रूपाचा मोबाईल उचलला. आणि घरातून उचललेली दोन लाख वीस हजारांची रोकड घेऊन घराबाहेर पडला. घराबाहेर उभ्या मित्राला त्याने चाळीस हजार रुपये दिले. नंतर दोघे पळून गेले.
पण त्याचे हातांचे ठसे सर्वत्र उमटले होते. शिवाय रुपाने ओरडलेला ‘बाबू’ शब्द पोलिसांना त्याच्यापाशी नेऊ शकला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या रकमेपैकी एक लाख साठ हजार रुपये परत मिळवले. या नोटांना रूपाच्या रक्ताचे डाग लागले होते. कोर्टात हा आणखीन एक पुरावा म्हणून उपयोगी पडणार होता. चोरीची इतर रक्कम दोघांनी चैनीत उडवली होती. दोघांना ताब्यात घेतल्यानंतरच्या चौकशीअंती लक्षात आले की या दोघांचे एकूण रेकॉर्ड चांगले नव्हते. बेशिस्त वर्तनाबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकले होते. रूपाचा खून करण्याआधी त्यांनी अनेक लहानमोठ्या चोऱ्या केल्या होत्या. खुनाच्या कृत्याआधी काही दिवस एक आयफोन देखील खरेदी केला होता. त्याचे पैसे बहुधा चोरीतूनच मिळवले असतील.
खून केल्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी रक्ताने माखलेला शर्ट, तसेच आपापल्या माकड टोप्या आणि मास्क एका ठिकाणी पुरून ठेवले आणि गोव्याला जाऊन मजा केली. पण तिथून परतले आणि पोलिसांनी त्यांना पकडले. गुरु-शिष्य नात्याला काळिमा लावणारे दोघेजण अखेर कायद्याच्या पकडीत सापडले. पण अल्पवयीन असल्याने त्यांना सध्या सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
विजय तरवडे

You need an account to post comments.