निवासस्थानी गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास
लातूर : (Latur Education Founder Dies by Suicide) शहरातील शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे (वय ६२) यांनी स्वतःच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे परवानाधारक बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समोर येत आहे. आत्महत्या स्वखुशीने करीत असून Don’t trouble anybody असाही उल्लेख असल्याचे समजत आहे.
शिक्षण संस्थाचालक हे गेल्या काही दिवसांपासून पद्मा नगर येथील घरी एकटेच वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रात्री ते घरी आले होते. मध्यरात्री त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त सकाळी समोर आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचे कारण समजू शकले नसते तरी त्यांची पत्नी सुचिता या अमेरिकेत असलेल्या मुलीकडे गेल्या होत्या. यातच काही दिवसांपूर्वी संजीव सोनवणे यांचा किरकोळ अपघात झाला होता.
आज मंगळवारी ते ड्रेसिंगसाठी पुण्याला जाणार होते तर त्यांची बहिणही आज लातूरला आल्याने सकाळी वाहन चालक हा त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेला होता बहीण घरी आली असता दुसऱ्या मजल्यावरील कॉटवर संजीव सोनवणे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नेण्यात आला होता. आता घरची मंडळी आल्यानंतरच त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
‘कोणाला दोष देऊ नका’ चिठ्ठीतील उल्लेखाने अनेक प्रश्न
संजीव सोनवणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येचा निर्णय हा माझ्या खुशीने घेत आहे…. Don’t trouble anybody असा उल्लेख आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांचे वाढलेले जाळे यातून ते अडचणीत होते की कौटुंबिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले याचा पोलीस तपास घेत आहेत.
शैक्षणिक साम्राज्य
संजीव सोनवणे हे मूळचे मोगरगा (ता. औसा) येथील असून आता ते पद्मा नगर लातूर येथे वास्तव्यास होते. त्यांनी परळी येथे संकल्प क्लासेस ला सुरुवात केली होती. त्यानंतर २००० साली लातूर, बार्शी तालुक्यातील उक्कडगाव आणि खडकवास येथे चंद्रभानू सोनवणे महाविद्यालय उभारले होते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
संजीव सोनवणे हे संस्थापक होते तर त्यांच्या पत्नी सुचिता या शाहू महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असून ते दोन्हीही अमेरिका येथे असतात. संजीव सोनवणे यांच्या पत्नी मुलीच्या बाळंतपनासाठी अमेरिका येथे गेल्या होत्या. तर त्यांची बहीण आज त्यांना भेटण्यासाठी लातूरला येणार होत्या.
Read About: MPSC Paper Leak Row : पेपरफुटी आयोगाची बेपर्वाई
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.