Mumbai Goa Highway Delay : यंदाच्या गणपतीत मात्र कहर झाला आणि कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना अभूतपूर्व अशा कोंडीला तोंड द्यावं लागलं. यंदा कोकणात जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची घोषणा रायगड पोलिसांनी वाजतगाजत केली होती. आपण आखलेल्या या नियोजनाचा मोठा डांगोराही रायगड पोलिसांकडून पिटण्यात आला होता. पण या पर्यायी मार्गावरही वाहनांची कोंडी झालीच आणि कोकणाकडे निघालेल्या मराठी माणसाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी उपस्थित राहणार नाही; याचे कारण म्हणजे या महामार्गाच्या कामाला इतका विलंब झाला आहे की त्याची लाज वाटते.
नितीन गडकरी,
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री.
‘नेमेचि येतो पावसाळा!’ याच न्यायाने नेमेचि येणाऱ्या गणपतींची चाहूल लागली की कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतूक कोंडीच्या बातम्याही नित्यनेमानं येऊ लागतात. पण त्याचे कोणालाही काहीही वाटत नाही. ना सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना या महामार्गाचं काम इतकं प्रदीर्घ काळ लांबल्याचं काही वाटतं, ना या वाहतूक कोंडीत तासन तास अडकून पडणाऱ्या कोकणवासीयांना. गणेशोत्सवातील दणदणाटाची जशी आपल्याला सवय होऊन गेलीये, त्याचप्रमाणे या बातम्या आणि ही वाहतूक कोंडी यांची आपल्याला सवयच होऊन गेली आहे.
दोन-तीन दशकांपूर्वी ‘कोकणचा कॅलिफोर्निया’ करण्याच्या बाता राज्यकर्ते करत असत. पण तेव्हाही कोकणात जाण्याची वाट ही अशीच बिकट होती. तरीही कोणत्याच पक्षाला कोकणात जायला किती वेळ लागतोय, याची चिंता नसे. एकवेळ मुंबईहून कॅलिफोर्नियाला माणूस जाऊन पोहोचेल; पण कोकणात आणि विशेषत: तळकोकणात जायला मुंबई-पुण्याहून निघालेला माणूस मात्र वाहतूक कोंडीतच अडकून पडलेला असेल, असे विनोदही त्या काळात ऐकायला मिळायचे. ते ऐकायचे आणि हसायचं, याचीही सर्वांना सवयच होऊन गेली होती. त्यास आता अनेक वर्षं लोटली. दरम्यान राज्यात नवनवे महामार्ग बांधले गेले. महानगरांमध्ये अनेक उड्डाणपूल झाले. काही ठिकाणी तर ते पाडून नवे बांधण्याची कामंही वेगानं सुरू आहेत. तरीही कोकणची वाट ही बिकटच राहिली.
तर या मुंबई-गोवा (म्हणजेच प्रत्यक्षात पनवेल ते दक्षिण गोव्यातील पोलेम) या साधारणपणे ५०० किलो मीटरच्या (एनएच-६६) या महामार्गाचं काम अधिकृतरीत्या २०११ मध्ये सुरू झालं. तेव्हा केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारं होती. आज त्यास चक्क १५ वर्षें उलटून गेली आहे. खरं म्हणजे त्यानंतर २०१४ मध्ये लोकसभा तसंच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत्या. या तीन वर्षांत हे काम पूर्ण व्हायला काहीच हरकत नव्हती. पण ते झालं नाही. या निवडणुकांनंतर केंद्र तसंच राज्य, या दोन्ही ठिकाणी सत्तांतर झालं. त्यासही आता एक तप झालं आहे. पण या १२ वर्षांतही हे कामत पूर्ण होऊ शकलेलं नाही.
महाराष्ट्रात तर या दरम्यान दोन-अडीच वर्षांसाठी का होईना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांचं संयुक्त सरकारही येऊन गेलं. खरं तर कोकण हा शिवसेनेचा (म्हणजेच तेव्हाच्या अखंड शिवसेनेचा) बालेकिल्ला होता. पण त्या काळातही हे काम रेंगाळतच राहिलं आणि सारेच जण ‘कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी!’ अशा काव्यपंक्ती गुणगु:णत कोकणच्या माणसांची फसवणूक करत राहिले.
याच दरम्यान महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या दृतगती महामार्गाचा प्रस्ताव पुढे आला. ते साल होतं २०१५. हा महामार्ग ७०० किलो मीटर लांबीचा होता. मुंबई-गोवा महामार्गापेक्षा हा पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत बांधावा लागणार होता. त्यासाठी जमीन अधिग्रहण, मधे असलेला सह्याद्रीचा काळा कातळ पार करणे, अशा अनेक अडचणी त्यासाठी पार कराव्या लागणार होत्या. त्या तुलनेत गोवा महामार्ग म्हणजे फक्त अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे रूंदीकरण आणि नुतनीकरण असा तुलनेनं सोपा प्रवास होता. पण आता प्रत्यक्षात बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असलेल्या पण ‘समृद्धी’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या महमार्गाचं काम २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीलान्यास केल्यानंतर वेगानं सुरू झालं. आणि बघता बघता पुढच्या चारच वर्षांत म्हणजे २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी असा सव्वा पाचशे किलो मीटरचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुलाही झाला. त्यानंतरच्या पुढच्या टप्प्याचं काम सुरू झालं आणि नंतरच्या तीनच वर्षांत म्हणजे २०२५ मध्ये हा अप्रतिम महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला. राज्यकर्ते आणि प्रशासन यांची इच्छाशक्ती असली की काम कसं वेगानं होऊ शकतं, याचा आदर्शच या समृद्धी महामार्गानं घालून दिला.
दरम्यान सरकारं बदलत होती आणि कोकणवासीयांच्या आपला महामार्ग कधी पूर्ण होणार, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं. राज्यकर्तेही कोकणच्या भोळ्या-भाबड्या जनतेच्या तोंडाला पानं पुसणारे वायदे करण्यात आता वाक्बगार झाले होते. याच काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचं अंतर कमी करण्याची एक नवी आयडियाची कल्पना पुढे आली आली. ती कल्पनाही वेगानं धाऊ लागली आणि मिसिंग लिंक का कनेक्टीग लिंक नावानं सह्याद्रीचा घाट कापून हा एक ‘शॉर्टकट’ पण सुरू झाला.
कोकणवासीयांचा आपल्या गावाकडचा प्रवास मात्र त्याच त्या कुर्मगतीनं पुढे सुरू होता. कोकणच्या जनतेची आंदोलनंही सुरू होती. मध्यंतरी एकदा कोकणातल्या पत्रकारांनी एकत्र येऊन ‘रस्ता रोको’ही केला होता. पण कामाला वेग येत नव्हता. कधी कंत्राटदार काम अर्धवट टाकून पळून गेल्याचं सांगण्यात येत असे. तर कधी झालेल्या कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, असं सांगायचे. खरं तर नित्यनेमानं सांगितल्या जाणाऱ्या या कथांना आता सारेच कंटाळले होते. तरीही हाताची बोटं कडाकडा मोडत करत शहरातला कोकणवासी कधी गणपतीच्या निमित्तानं तर कधी होळीच्या निमित्तानं कोकणाकडे धाव घेतच होता.
यंदाच्या गणपतीत मात्र कहर झाला आणि कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना अभूतपूर्व अशा कोंडीला तोंड द्यावं लागलं. यंदा कोकणात जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची घोषणा रायगड पोलिसांनी वाजतगाजत केली होती. आपण आखलेल्या या नियोजनाचा मोठा डांगोराही रायगड पोलिसांकडून पिटण्यात आला होता. पण या पर्यायी मार्गावरही वाहनांची कोंडी झालीच आणि कोकणाकडे निघालेल्या मराठी माणसाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता वर्धा जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या गावापासून थेट गोव्याच्या सरहद्दीला लागून असलेल्या बांदा गावापर्यंत जाणाऱ्या ‘भक्तीपीठ’ महामार्गाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतीची जमीन अधिग्रहित करावी लागणार असल्यानं, त्यास जनतेचा प्रचंड विरोध असल्यानं या महामार्गाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही.
त्यामुळेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा महामार्गाचं काम रडतखडत चालल्याबद्दल केलेली खंत महत्त्वाची आहे. मात्र, ते केवळ खंत व्यक्त करूनच थांबतात की या कामाला गती देतात, ते बघायचे.
प्रकाश अकोलकर
संपर्क : ९८९२७२७७००
Read About : Indian Wolf Satellite Collar लांडग्याला सॅटॅलाइट कॉलर; राज्यातील दुसरा प्रयोग संभाजीनगरात
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.