Philtrum Explained : का? ओठांवर ही खळी का आहे, असा सवाल कोणालाही का पडलेला नाही? नाही, तसं नाही, उत्क्रांतीची चिकित्सा करणाऱ्या काही वैज्ञानिकांना तो पडलेला आहे, त्यांनीच तिचं ‘फिल्ट्रम’ असं बारसंही केलेलं आहे.
तुम्ही मिशी ठेवता की दाढी करताना तीही काढून टाकता? तुम्ही भपकेदार छपरी मिशा बाळगत असाल किंवा अगदी एखाद्या लहान रेषेसारख्या कोरीव मिशीला पसंत करत असाल, तर तुम्हाला माफ करता येईल. कारण मग तुमचं लक्ष त्या वैशिष्ट्याकडे गेलं नसण्याची शक्यता बरीच आहे. पण, तुम्ही तुमचा वरचा ओठ साफ गुळगुळीत करत असाल तर मग तुमचं ध्यान आजवर तिच्याकडे कसं गेलं नाही हा प्रश्न सतावत राहतोच आणि हे झालं पुरुषांचं. स्त्रियांचं काय? त्यांना तर मिशी फुटतच नाही. त्यांचा वरचा ओठ अगदी फुलाच्या पाकळीसारखा गुळगुळीत असतो. पण, त्यांचंही ध्यान या वैशिष्ट्यानं वेधून घेतलं नाही याला काय म्हणावं!
आता जरा आरशात पहा. तुमच्या मुखकमलाकडे निरखून पहा. तुम्हाला दिसेल की तुमचा वरचा ओठ सरळ सपाट समतोल नाही. त्याच्या बरोबर मध्ये, नेमकी नाकाच्या शेंड्याखाली एक खळी आहे. खळी म्हणा, खळगी म्हणा, खाच म्हणा, काहीही म्हणा पण ती आहे. वरच्या ओठाचे उजवा आणि डावा असे दोन भाग करणारी खळी तिथं आहे. काहींची उथळ असेल, इतरांची जरा खोलगट असेल, कोणाची लांब तर कोणाची आखूड. प्रत्येक व्यक्तीची खळी थोडी थोडी वेगळी असते. काही मूठभर मंडळींच्या, बहुतांशी स्त्रियांच्या, गालावर पडणाऱ्या खळीचं कोण कौतुक! तिच्यावर कोणी कविता काय रचतं, कोणी तिच्या प्रेमात काय पडतं! पण सर्वांच्याच, कोणाचाही अपवाद नसलेल्या या ओठांवरच्या खळीची अशी उपेक्षा?
का? ओठांवर ही खळी का आहे असा सवाल कोणालाही का पडलेला नाही? नाही, तसं नाही, उत्क्रांतीची चिकित्सा करणाऱ्या काही वैज्ञानिकांना तो पडलेला आहे. त्यांनीच तिचं ‘फिल्ट्रम’ असं बारसंही केलेलं आहे. वास्तविक निसर्ग उधळ्या नाही. सजीवांच्या यच्चयावत शारीरिक वैशिष्ट्यांची जडणघडण तो एक चूस म्हणून करत नाही. प्रत्येकाचं काही ना काही प्रयोजन असतंच, म्हणूनच या वैज्ञानिकांनी त्याचाच शोध लावण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या मते आकारानं अगदी लहान असली तरी या खळीमागे उत्क्रांती, भ्रूणविकास, सौंदर्य आणि आरोग्य अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत.
शरीराचा हा भाग आपल्या जन्मानंतर तयार होत नाही. गर्भ आईच्या पोटात वाढत असतानाच तो तयार होतो. गर्भधारणेनंतर साधारण सहा ते आठ आठवड्यांच्या काळात बाळाचा चेहरा घडू लागतो. सुरुवातीला चेहरा हा एकसंध नसतो. तो वेगवेगळ्या भागांपासून तयार होत असतो. उजवी आणि डावी बाजू, नाकाचा भाग आणि वरचा जबडा हे स्वतंत्रपणे वाढतात. नंतर हे सर्व भाग अगदी अचूकपणे एकमेकांना जोडले जातात.
पण, या जोडणीची रेषा पूर्णपणे नाहीशी होत नाही, तिची आठवण मागे राहतेच. ती आठवण म्हणजेच ही खळी, फिल्ट्रम. म्हणजेच फिल्ट्रम हा आपल्या चेहऱ्यावर उमटलेला विकासाचा ठसा आहे. जर ही जोडणी व्यवस्थित झाली नाही तर काही बाळांमध्ये ओठाला फट (Cleft Lip) किंवा टाळूला फट अशी जन्मजात विकृती निर्माण होऊ शकते, त्यामुळे ही छोटीशी खाच चेहऱ्याच्या योग्य विकासाची साक्ष देणारी खूण मानली जाते.
आता सहाजिकच मनात असा सवाल फडा काढून उभा राहील की इतर प्राण्यांनाही फिल्ट्रम असतं का? तर, होय. माणूस हा काही अपवाद नाही. कुत्री, मांजरं, घोडे, गुरंढोरं आणि विशेषत: माकडं व ती ज्या जातकुळीत मोडतात ते इतर प्रायमेट्स यांच्या नाकाखालीही अशीच खाच दिसते. मात्र, तिचा आकार, खोली आणि उपयोग प्रत्येक प्राण्यात वेगळा असतो. कुत्री आणि मांजरं यांच्यात फिल्ट्रम अधिक ठळक असतं. त्यांचं नाक सतत ओलसर राहण्यामागे त्याचा थोडाफार हात असल्याचं मानलं जातं. नाकावर आलेला ओलावा या खाचेतून वरच्या ओठाकडे पसरतो. ओलसर नाकामुळे गंधकण अधिक चांगल्या प्रकारे अडकतात आणि वास घेण्याची क्षमता वाढते. माणसात मात्र गंधज्ञान इतर अनेक सस्तन प्राण्यांइतकं तीव्र राहिलेलं नाही, त्यामुळे फिल्ट्रमची ती मूळ भूमिका मानवप्राण्यामध्ये तरी जवळजवळ नाहीशी झाली आहे.
असं जर आहे तर मग उत्क्रांतीच्या प्रवाहात ती टिकूनच का राहिली?
उत्क्रांती प्रत्येक अवयवाला नवीन काम देत नाही. अनेक वैशिष्ट्यं केवळ ती हानिकारक नसल्यामुळे टिकून राहतात. फिल्ट्रम हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. चेहरा तयार होण्याच्या प्रक्रियेत ते नैसर्गिकरित्या निर्माण होतं. त्यापायी कोणताही विशेष तोटा होत नसल्यामुळे उत्क्रांतीनं ते काढून टाकण्याचं कारणच नव्हतं. उलट, त्यातून चेहऱ्याची सममिती आणि आकार अधिक उठून दिसू लागला. व्यक्तीच्या सौंदर्यात तिनं भरच टाकली आहे.
म्हणूनच चित्रकार, शिल्पकार आणि प्लास्टिक सर्जन यांना फिल्ट्रमचं महत्त्व चांगलंच माहीत असतं. सुंदर आणि तरुण दिसणाऱ्या चेहऱ्यात फिल्ट्रम सहसा स्पष्ट दिसतं. त्याच्या दोन्ही बाजूंचे उंचवटे वरच्या ओठाला आकर्षक आकार देतात. ओठाच्या मध्यभागी दिसणारा धनुष्याच्या आकाराचा वक्र भाग, ज्याला क्युपिड्स बो, मदनधनु म्हणतात; तोही फिल्ट्रमशी जवळून संबंधित असतो. वय वाढत गेल्यावर त्वचेतील कोलाजेन कमी होतं, त्यामुळे फिल्ट्रम उथळ होत जातं आणि वरचा ओठ थोडासा सपाट दिसू लागतो, म्हणूनच सौंदर्यशास्त्रात आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये या भागाकडे विशेष लक्ष दिलं जातं.
डॉक्टर नवजात बाळाचं निरीक्षण करताना फिल्ट्रमकडेही लक्ष देतात. जर ते खूपच सपाट असेल किंवा त्याची रचना वेगळी दिसत असेल तर काही आनुवंशिक किंवा विकासाशी संबंधित विकारांची शक्यता तपासली जाते. उदाहरणार्थ, गर्भावस्थेत मद्यपानामुळे निर्माण होणाऱ्या फीटल अल्कोहोल सिंड्रोम या विकारात फिल्ट्रम खूप सपाट दिसू शकतं. अर्थात, फक्त फिल्ट्रम पाहून निदान करता येत नाही. तो अनेक लक्षणांपैकी एक संकेत असतो.
पूर्णपणे फिल्ट्रम नसणं अत्यंत दुर्मीळ आहे. पण, ते अगदी अस्पष्ट असू शकतं. जर गर्भावस्थेतील चेहऱ्याची वाढ व्यवस्थित झाली नाही, तर वरच्या ओठाच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा ओठात फट निर्माण होते. परंतु, आधुनिक शस्त्रक्रियांमुळे अशा मुलांचा चेहरा आणि ओठ मोठ्या प्रमाणावर पूर्ववत करता येतात.
आपल्या शरीरात अशा अनेक खुणा आहेत ज्या आज फारसं काम करत नाहीत, पण आपल्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतात. फिल्ट्रम त्यांपैकीच एक आहे. ते आपल्याला आठवण करून देतं की, आपला चेहरा एकदम तयार झालेला नसून अनेक सूक्ष्म टप्प्यांतून घडलेला आहे. त्याचबरोबर तो इतर सस्तन प्राण्यांशी असलेलं आपलं नातंही दाखवतो.
तर पुढच्या वेळी आरशात स्वत:कडे पाहाल तेव्हा नाकाखालची ती छोटीशी उभी खळी तुमचं ध्यान वेधून घेईल. तुम्ही तिच्याकडे कदाचित वेगळ्याच नजरेनं बघाल. कारण ती केवळ चेहऱ्याचा एक भाग नाही. ती आपल्या जन्मापूर्वीच्या विकासाची, लाखो वर्षांच्या उत्क्रांतीची आणि निसर्गाच्या अचूक कारागिरीची शांत साक्ष आहे.
बाळ फोंडके
balphondke@gmail.com
Read About : MSCI India Standard Index : परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधणारा निर्देशांक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.