‘रामायण’ चं संपूर्ण मानधन ५० कॅन्सरग्रस्त मुलांसाठी
मुंबई : Vivek Oberoi Ramayana fees donation : वाढदिवस म्हटलं की सेलिब्रेशन, पार्टी आणि खास भेटवस्तू…पण अभिनेता विवेक ओबेरॉयने आपल्या ५० व्या वर्षाची सुरुवात एका वेगळ्याच निर्णयाने केली आहे. ‘कॅन्सर रोज डे’च्या निमित्ताने विवेकने ‘रामायण’साठी मिळणारं संपूर्ण मानधन कॅन्सरशी झुंजणाऱ्या ५० मुलांच्या उपचारासाठी देण्याचं वर्षभरापूर्वी केलेलं वचन पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्याचा ५० वा वाढदिवस एका खास सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत आला आहे.
वाढदिवस नाही, ५० मुलांसाठी आशेची सुरुवात
५० व्या वर्षात प्रवेश करताना विवेकने स्वत:साठी काही खास करण्याऐवजी कॅन्सरशी लढणाऱ्या मुलांच्या मदतीचा निर्णय घेतला. समाजालाही आपण काही देणं लागतो या प्राजंळ हेतुने त्याने ५० मुलांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारत आपल्या या खास दिवसाला सामाजिक अर्थ दिला आहे.
एक वर्षापूर्वीच दिलं होतं वचन
ऑक्टोबर २०२५ मध्ये विवेकने ‘रामायण’मधून मिळणारं मानधन स्वत:कडे ठेवणार नसल्याचं सांगितलं होतं. हे संपूर्ण मानधन कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी देण्याचा त्याचा निर्धार होता.
त्यावेळी निर्माते नमित मल्होत्रा यांच्याशी बोलताना विवेकने आपल्याला या कामासाठी एक पैसाही नको असल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘मला हे अशा कारणासाठी दान करायचं आहे, ज्यावर माझा विश्वास आहे —कॅन्सरशी झुंजणारी मुलं,’ असं त्याने म्हटलं होतं.
‘रामायण’… आणि पडद्याबाहेरचीही एक कथा
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा भारतीय सिनेमातील महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात आहे रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्यासोबत विवेकही या चित्रपटाचा भाग आहे.
या चित्रपटाशी जोडताना विवेकने भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्याच्या निर्मात्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता याच चित्रपटातून मिळणारं मानधन सामाजिक कारणासाठी वापरून त्याने आपल्या निर्णयाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे.
५० वर्षं… ५० मुलं… आणि एक मोठं वचन
विवेकचा हा निर्णय केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांच्या मदतीशी तो गेल्या काही वर्षांपासून जोडलेला आहे. त्यामुळे ‘रामायण’चं मानधन या उपचारांसाठी देण्याचा निर्णय त्याच्या दीर्घकाळाच्या सामाजिक कार्याशी जोडला जात आहे.
‘रामायण’ च्या मानधनातून उपचारांना आधार
गेल्या वर्षी जाहीर केलेलं वचन आता प्रत्यक्षात उतरलं आहे. ‘कॅन्सर रोज डे’ आणि आपल्या ५० व्या वर्षाचं औचित्य साधत विवेकन ५० मुलांच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
त्याच्या या निर्णयामुळे वाढदिवसाचा अर्थच वेगळा झाला आहे. स्वत:चा खास दिवस साजरा करण्यापेक्षा एखाद्याच्या आयुष्यात आशा निर्माण करण्याचा आनंद अतुलनीय आहे.
पडद्यावर भूमिका…आयुष्यात माणुसकी
विवेक ओबेरॉयचा ‘रामायण’मधील प्रवास अद्याप प्रेक्षकांसमोर यायचा आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या प्रोजेक्टशी जोडलेलं त्याचं एक वचन चर्चेत आलं आहे. ५० व्या वर्षात ५० मुलांसाठी मदतीचा हात…कदाचित यापेक्षा सुंदर ‘रिटर्न गिफ्ट’ स्वत:लाच देण्याचा दुसरा मार्ग नसावा.
Read About: AI Cancer Detection : श्वानाच्या हुंगण्याच्या क्षमतेने ७ प्रकारचे कर्करोग ओळखणार
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.