Ad Advertisement Ad Advertisement

RO Water & Vitamin B12 : आरओचे पाणी पिणाऱ्यांमध्ये B12 कमतरतेचा धोका?

२५० जणांच्या अभ्यासात RO पाणी वापरणाऱ्या गटातील ५०.६ टक्के लोकांमध्ये B12 कमतरता; संशोधकांनी अधिक अभ्यासाची गरज व्यक्त केली

नवी दिल्ली : RO Water & Vitamin B12 लाखो भारतीय घरांमध्ये पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी आरओ फिल्टरचा वापर केला जातो, मात्र हेच पाणी शरीरातील एका महत्त्वाच्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेसाठी कारणीभूत ठरत असल्याचा अंदाज एका भारतीय अभ्यासात वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम भारतातील डॉक्टर एकांत सुरेंद्र गुप्ता, संकेत प्रांजीवन शेठ आणि जयश्री दीपक गंजवाले यांच्या टीमने २५० लोकांवर केलेल्या एका विशेष संशोधनात आरओचे पाणी आणि व्हिटॅमिन बी१२ यांच्यातील संभाव्य संबंध समोर आणला आहे. या संशोधनानुसार, अभ्यासात समाविष्ट केलेल्या २५० पैकी तब्बल ५०.६ टक्के लोकांमध्ये बी१२ चे प्रमाण कमी पाहायला मिळाले, तर याउलट बोरिंग, नळ किंवा सामान्य फिल्टरचे पाणी पिणाऱ्यांमध्ये ही कमतरता केवळ १७.५ टक्के लोकांमध्येच दिसून आली.

डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, आरओचे पाणी थेट व्हिटॅमिन बी१२ नष्ट करत नाही, कारण पाण्यात स्वत:हून बी१२ नसते. परंतु, आरओच्या प्रक्रियेत पाण्यातील आवश्यक खनिजांसोबत काही असे नैसर्गिक घटक किंवा सूक्ष्म जीवाणूही गाळले जातात, जे आपल्या पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मजबूत ठेवतात. जेव्हा पोटातील हे जिवाणू कमकुवत होतात, तेव्हा आपले शरीर आपण खाल्लेल्या अन्नातून व्हिटॅमिन बी१२ शोषून घेण्यास असमर्थ ठरते.

लक्षणीक धोके आणि उपाय

शरीरात बी१२ कमी झाल्यास सकाळी उठताना प्रचंड थकवा येणे, हात-पायांना मुंग्या येणे किंवा ते सुन्न पडणे, वारंवार तोंड येणे आणि विसरभोळेपणा वाढणे अशी लक्षणे दिसतात. यापासून वाचण्यासाठी आहारात दूध, दही, पनीर यांसारख्या डेअरी उत्पादनांचा वापर वाढवावा. तसेच दीर्घकाळ आरओचे पाणी वापरणाऱ्यांनी वर्षातून एकदा बी१२ ची चाचणी करून घ्यावी आणि कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स घ्याव्यात. खारट पाणी असलेल्या भागात आरओ आरोग्याचे रक्षण करत असल्याने तो थेट बंद न करता केवळ आरोग्याची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

Read About: RSV Virus Warning: लहान मुलांसाठी आरएसव्ही व्हायरस ठरू शकतो प्राणघातक

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.