Michel Peiry : स्वित्झर्लंड या देशाचे नाव ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर बर्फाच्छादित आल्प्स पर्वत, हिरवेगार निसर्ग, निळेभोर तलाव, स्वादिष्ट चॉकलेट्स आणि जगात शांततेसाठी प्रसिद्ध असलेला एक अत्यंत सुरक्षित देश उभा राहतो. गुन्हेगारी आणि त्यातही ‘सीरियल किलिंग’ या गोष्टी स्वित्झर्लंडच्या संस्कृतीशी जुळत नाहीत. पण, १९८० च्या दशकात या शांत आणि नंदनवनासारख्या देशात एका माणसाने मृत्यूचं असं अमानुष तांडव घडवलं, ज्याने संपूर्ण युरोपला हादरवून सोडलं. या क्रूरकर्म्याचं नाव होतं मिशेल पेरी, (Michel Peiry) ज्याला स्विस माध्यमांनी आणि गुन्हेगारी इतिहासाने ‘द सॅडिस्ट ऑफ रोमोंट’ (The Sadist of Romont) असं नाव दिलं. स्वित्झर्लंडच्या गुन्हेगारी इतिहासातील हा सर्वांत भयंकर आणि कुप्रसिद्ध सीरियल किलर मानला जातो.
मिशेल पेरीचा (Michel Peiry) जन्म २८ फेब्रुवारी १९५९ या दिवशी स्वित्झर्लंडमधील एका सामान्य कुटुंबात झाला. त्याचं बालपण अत्यंत सामान्य पार्श्वभूमीत गेलं. समाजात तो एक अतिशय शांत, लाजाळू आणि चांगला तरुण म्हणून वावरत होता. तो समाजातील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा आणि एक ‘आदर्श नागरिक’ म्हणून त्याची ओळख होती. पण या शांत चेहऱ्यामागे एक अत्यंत भयानक वादळ शिजत होतं. तारुण्यात आल्यावर त्याला आपल्यातील समलैंगिक प्रवृत्तींची जाणीव झाली. तत्कालीन समाजात आणि त्याच्या सनातनी कुटुंबात या गोष्टीला मान्यता नसल्यामुळे त्याने आपल्या भावना अत्यंत खोलवर दाबून ठेवल्या. याच दडपलेल्या भावनांचं रूपांतर नंतर एका अत्यंत हिंसक आणि विकृत मानसिकतेत झालं. दुसऱ्याला शारीरिक वेदना दिल्यानंतर त्याला मिळणारा आनंद (सॅडिझम) ही त्याची सर्वांत मोठी विकृती बनली.
मिशेल पेरीच्या (Michel Peiry) हत्यासत्राला १९८१ मध्ये सुरुवात झाली आणि मे १९८७ पर्यंत त्याचा हा क्रूर खेळ सुरू राहिला. या सहा वर्षांच्या काळात त्याने प्रामुख्याने किशोरवयीन आणि तरुण मुलांना (विशेषत: १५ ते २० वर्षे वयोगटातील) आपलं लक्ष्य बनवलं. त्याचं सावज शोधण्याची पद्धत अत्यंत साधी पण धोकादायक होती. युरोपमध्ये ‘हिचहायकिंग’ (म्हणजे रस्त्यावर लिफ्ट मागून प्रवास करणं) ही अत्यंत सामान्य गोष्ट मानली जाते. पेरी आपल्या कारमधून फिरत असे आणि रस्त्यावर एकट्या लिफ्ट मागत उभ्या असलेल्या तरुण मुलांना तो आपल्या गाडीत बसवत असे. त्याचा शांत चेहरा आणि चांगली वागणूक पाहून ही मुलं निर्धास्तपणे त्याच्या गाडीत बसत.
एकदा का ती मुले गाडीत बसली की तो गाडी जंगलात किंवा अत्यंत निर्जन पर्वतीय भागात नेत असे. तिथे तो अचानक हिंस्र होऊन त्यांना बंदुकीचा किंवा शस्त्राचा धाक दाखवून बांधून ठेवत असे. त्यानंतर तो त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत असे आणि त्यांचा अमानुष छळ करत असे. हत्येसाठी तो बऱ्याचदा त्यांचा गळा दाबत असे किंवा त्यांना चाकूने भोसकत असे. त्याचं हे कृत्य इतकं भयंकर होतं की, हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि आपल्या विकृत आनंदासाठी तो अनेकदा मृतदेह जाळून टाकत असे. काही मृत्यू तर इतके वेदनादायक होते की त्याने पीडितांना जिवंत जाळल्याचंही तपासात निष्पन्न झालं. मिशेल पेरीचं (Michel Peiry) जीवन हे ‘डॉ. जेकिल आणि मिस्टर हाईड’ या सुप्रसिद्ध कथेसारखंच दुटप्पी होतं. रात्रीच्या अंधारात किंवा निर्जन जंगलात तो एक नरभक्षक राक्षस बनून तरुणांचे प्राण घेत असे, तर दिवसा तो स्विस समाजात एक अत्यंत जबाबदार व्यक्ती म्हणून वावरत असे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तो स्थानिक ‘स्काऊट आणि गाईड’चा एक अत्यंत आदरणीय नेता आणि प्रशिक्षक होता. तसेच तो स्विस सैन्यातही सेवा बजावत होता. लहान मुलांना आणि तरुणांना तो शिस्त आणि जीवनमूल्य यांचे धडे देत असे. त्याच्या याच दुटप्पी आणि प्रतिष्ठित प्रतिमेमुळे पोलिसांचा त्याच्यावर कधीच संशय गेला नाही आणि तो तब्बल सहा वर्षे मोकाट राहून हत्या करत सुटला.
अखेर मे १९८७ मध्ये मिशेल पेरीच्या (Michel Peiry) पापाचा घडा भरला आणि त्याने एक मोठी चूक केली. त्याने ‘थॉमस’ नावाच्या एका तरुण मुलाला लिफ्ट दिली. नेहमीप्रमाणे त्याने थॉमसला एका निर्जनस्थळी नेऊन त्याला बांधण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, थॉमसने अत्यंत धैर्याने प्रतिकार केला. दोघांमध्ये झटापट झाली आणि या झटापटीत थॉमस त्याच्या तावडीतून निसटून पळून जाण्यात यशस्वी ठरला. थॉमसने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि पेरीचं अत्यंत अचूक वर्णन पोलिसांना दिलं. तसंच त्याच्या कारची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
१ मे १९८७ या दिवशी मिशेल पेरी (Michel Peiry) स्वित्झर्लंडच्या श्विझ या भागात आपल्या स्विस सैन्याच्या एका प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला होता. पोलिसांनी याच लष्करी शिबिरातून त्याला नाट्यमयरित्या अटक केली. सैन्याच्या गणवेशात असलेला आणि समाजाचा एक आदर्श नागरिक मानला जाणारा व्यक्ती जेव्हा बेड्या ठोकून बाहेर आणला गेला, तेव्हा संपूर्ण स्वित्झर्लंडमध्ये एकच खळबळ उडाली. अटकेनंतर जेव्हा पोलिसांची कसून चौकशी सुरू झाली, तेव्हा मिशेल पेरीने अत्यंत थंड डोक्याने आणि कोणत्याही पश्चात्तापाशिवाय आपले गुन्हे कबूल केले. त्याने सांगितलं की, ‘मी फक्त स्वित्झर्लंडमध्येच नाही तर अमेरिका, फ्रान्स, इटली आणि युगोस्लाव्हिया या देशांमध्येही प्रवास करताना हत्या केलेल्या आहेत.’ त्याने एकूण ११ हून अधिक तरुणांवर हल्ला केल्याची आणि हत्या केल्याची कबुली दिली. मात्र, पोलिसांना पुराव्यांनिशी त्याच्या पाच हत्या आणि दोन खुनाचे प्रयत्न सिद्ध करण्यात यश आलं. या हत्या प्रामुख्याने ‘रोमोंट’ या स्विस शहराच्या आसपास झाल्या असल्यामुळे, माध्यमांनी त्याला ‘रोमोंटचा सॅडिस्ट’ हे नाव दिलं.
१९८९ मध्ये मिशेल पेरीवर (Michel Peiry) खटला चालवण्यात आला. हा स्वित्झर्लंडच्या इतिहासातील सर्वात चर्चित आणि धक्कादायक खटला होता. न्यायालयाच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी आणि संताप होता. न्यायालयात त्याच्या बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, पेरी हा बालपणीच्या मानसिक दडपणाचा आणि छळाचा बळी आहे. परंतु, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की त्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि थंड डोक्याने हे खून केले आहेत. न्यायालयाने त्याला हत्येच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवलं आणि स्विस कायद्यानुसार उपलब्ध असलेली सर्वांत कठोर जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Michel Peiry : मिशेल पेरी सध्या स्वित्झर्लंडच्या तुरुंगात आपली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्या या प्रकरणामुळे स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत सुरक्षित आणि गुन्हेगारीमुक्त मानल्या जाणाऱ्या देशाचा इनोसन्स कायमचा हरवला.
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Read About : The Theft of the Western Star : वेस्टर्न स्टारची चोरी !
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.