हाँगकाँगच्या जोडीविरुद्ध रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात 10-11, 11-2, 10-11 असा पराभव; निर्णायक गेममध्ये 10-7 अशी आघाडी गमावली
आयची-नागोया (जपान) : Asian Games 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या जोशना चिनप्पा आणि वेळावन सेंथिलकुमार या जोडीने स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले. उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या ली का यी आणि टांग मिंग हाँग या जोडीकडून भारतीय जोडीला 10-11, 11-2, 10-11 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये चुरशीची लढत झाली. लांब रॅली आणि गुणांची बरोबरी यामुळे कोणत्याही जोडीला मोठी आघाडी घेता आली नाही. अखेरच्या टप्प्यात हाँगकाँगच्या जोडीने आघाडी घेत पहिला गेम 11-10 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र जोशना आणि वेळावन यांनी आक्रमक खेळ करत सामन्यात जोरदार पुनरागमन केले. भारतीय जोडीने सुरुवातीला 3-0 अशी आघाडी घेतली आणि ती 7-2 पर्यंत वाढवली. अखेर हा गेम 11-2 असा जिंकत भारतीय जोडीने सामना निर्णायक गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्ये ली आणि टांग यांनी 5-2 अशी आघाडी घेतली. भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करत स्कोअर 6-6 असा बरोबरीत आणला. त्यानंतर जोशना-वेळावन यांनी सलग गुण मिळवत 10-7 अशी आघाडी घेतली. विजयासाठी त्यांना केवळ एका गुणाची गरज होती. मात्र, निर्णायक क्षणी हाँगकाँगच्या जोडीने सलग चार गुण मिळवत सामन्याचे चित्र पालटले. ली का यी आणि टांग मिंग हाँग यांनी निर्णायक गेम 11-10 असा जिंकत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे जोशना-वेळावन यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
सावन बरवालचे मॅरेथॉनमध्ये रौप्य
दरम्यान, भारताच्या सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये 2:11:37 अशी राष्ट्रीय विक्रमी वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. नेमबाजीत आशी चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदार्सा विनोद यांनी महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. तिलोत्तोमा सेनने 590 गुणांसह तिसरे, तर विदार्सा विनोदने 588 गुणांसह सहावे स्थान मिळवत वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली.
तिरंदाजीत भारतीय संघांची दमदार कामगिरी
महिलांच्या कंपाउंड सांघिक पात्रता फेरीत भारताने 2099 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. चिकिता तनीपार्थी (705), ज्योती सुरेखा वेन्नम (699) आणि पृथिका प्रदीप (695) यांनी भारतासाठी ही कामगिरी केली.
पुरुषांच्या रिकर्व सांघिक पात्रता फेरीत धीरज बोम्मदेवरा, नीरज चौहान आणि यशदीप भोगे यांनी 2039 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. धीरजने 698 गुणांसह वैयक्तिक पात्रता क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत आशियाई आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला.
अॅथलेटिक्समध्ये तेजस्विन शंकरची आगेकूच
दशक्रीडा प्रकारात तेजस्विन शंकर आणि थॉफीक नुशाद यांची मोहीम सुरू आहे. लांब उडीत तेजस्विनने 7.53 मीटरसह पहिले, तर थॉफीकने 7.37 मीटरसह तिसरे स्थान मिळवले. गोळाफेकीत तेजस्विनने 13.16 मीटरची कामगिरी करत 677 गुण मिळवले, तर थॉफीकने 10.76 मीटरसह 531 गुण मिळवले. त्यानंतर तेजस्विन एकूण 2484 गुणांसह तिसऱ्या, तर थॉफीक 2290 गुणांसह नवव्या स्थानावर होता. 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत अनिमेष कुजूरने 21.10 सेकंदांची वेळ नोंदवत आपली पात्रता फेरी जिंकली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अन्य क्रीडा प्रकारांतही भारताची कामगिरी
कॅनो स्प्रिंटमध्ये हर्षवर्धन शक्तावत पुरुषांच्या कयाक एकेरी 500 मीटर प्रकाराच्या उपांत्य फेरीत पाचव्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरी ‘बी’साठी पात्र ठरला. पार्वती गीता आणि प्रसन्न कुमार यांनी मिश्र कयाक दुहेरी 500 मीटर उपांत्य फेरीत दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरी ‘ए’ गाठली. तलवारबाजीत भारतीय महिला फॉइल संघाने इंडोनेशियाचा 45-24, तर पुरुष सेबर संघाने फिलिपिन्सचा 45-27 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, त्यानंतर पुरुष सेबर संघाला दक्षिण कोरियाकडून 25-45, तर महिला फॉइल संघाला जपानकडून 14-41 असा पराभव पत्करावा लागला. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनचे पुरुष एकेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीत संपले. सिंगापूरच्या लो कीन यू याने लक्ष्यचा 21-12, 15-21, 21-14 असा पराभव केला.
टेबल टेनिसमध्ये यशस्विनी घोरपडे हिला महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जपानच्या मिवा हरिमोटो हिच्याकडून पराभव झाला. ई-स्पोर्ट्समध्ये पारितोषला प्युयो प्युयो चॅम्पियन्सच्या उपांत्यपूर्व फेरीत डोंगशिन कांगकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला.
Read About : Asian Games 2026 : ट्रीसा-गायत्रीचा वर्ल्ड नंबर-3 जोडीला धक्का
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.