हॅक केल्यानंतर स्मार्ट कारच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; लॉक, हेडलाईट्स आणि ऑडिओ-व्हिडिओ सिस्टीमवर हॅकर्सचा ताबा मिळवण्याचा धोका
सनशाईन कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : Car Cyber Security गाडी कोणत्याही देशात बनलेली असो, ती हॅक होऊ शकते का? या चिंतेने कारमालक ग्रासले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला एका सायबर सुरक्षा तज्ज्ञाने चीनमध्ये तयार झालेली ‘बीवायडी शार्क ६’ ही गाडी हॅक करून दाखवली. हॅकरने गाडीचे लॉक, हेडलाईट्स आणि ऑडिओ-व्हिडिओ सिस्टीमचा ताबा आपल्या हातात घेतला. ‘हे काम आम्ही विचार केला त्यापेक्षाही खूप सोपे होते,’ अशी प्रतिक्रिया या तज्ज्ञाने दिली. या घटनेमुळे बीवायडीसह इतर चिनी कंपन्यांच्या गाड्या चालकांचा ऑडिओ, व्हिडिओ आणि लोकेशन डेटा थेट चिनी सरकारला शेअर करतात का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉपोर्रेशन (एबीसी) ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
आजच्या आधुनिक गाड्या प्रचंड प्रमाणावर वैयक्तिक माहिती जमा करतात. हा डेटा अनेकदा परदेशातील सर्व्हरवर साठवला जातो. फक्त परकीय सरकारेच नाही, तर हॅकर्सही या सिस्टीममध्ये सहजरीत्या शिरकाव करू शकतात. पूर्वीच्या केवळ यांत्रिक (मेकॅनिकल) असलेल्या गाड्यांचे स्वरूप बदलून आता त्या ‘चाकांवर चालणाऱ्या कॉम्प्युटर नेटवर्क’सारख्या झाल्या आहेत. एका अत्याधुनिक कारमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी तब्बल ५० ते १०० लहान कॉम्प्युटर्स (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स) बसवलेले असतात. यात गाण्यांचे आणि स्क्रीनचे नियंत्रण, ब्रेक, स्टिअरिंग, इंजिन, सेन्सर्स आणि ड्रायव्हर असिस्टन्स हे सर्व घटक ब्लूटूथ, वाय-फाय आणि अंतर्गत सिम किंवा ई-सिमद्वारे इंटरनेटशी आणि कार कंपनीच्या सर्व्हरशी २४ तास जोडलेले असतात. सॉफ्टवेअर अपडेटही इंटरनेटवरूनच दिले जातात. त्यामुळे कंपनीच्या संपूर्ण सिस्टीमवरच हॅकिंगचा धोका निर्माण झाला आहे.
कमकुवत दुवा नक्की कुठे?
अनेक स्मार्ट गाड्यांमध्ये लागलेले ‘ई-सिम’ हे कंपनीशी संवाद साधण्याचे आणि सॉफ्टवेअर अपडेट मिळवण्याचे मुख्य साधन आहे. सिम कार्ड स्वत: सुरक्षित असले, तरी ते ज्या नेटवर्कशी जोडलेले असते, तिथेच हॅकर्सना चोरटी वाट सापडते. नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये ‘टेस्ला मॉडेल ३’ आणि ‘सायबरट्रक’च्या कम्युनिकेशन सिस्टीममध्येही तज्ज्ञांना मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. गाड्यांमध्ये वापरले जाणारे जुने तंत्रज्ञान आणि गुंतागुंतीचे नेटवर्क यामुळे हॅकर्स थेट कारच्या मुख्य नेटवर्कमध्ये किंवा कंपनीच्या क्लाउड सर्व्हरमध्ये प्रवेश करू शकतात.
सुरक्षितता आणि गोपनीयता धोक्यात
‘कॅस्परस्की’ या सायबर सुरक्षा कंपनीच्या अहवालानुसार, अँड्रॉइडवर चालणाऱ्या गाड्यांच्या हेड-युनिट्सना लक्ष्य करणारे मालवेअर पसरवले जात आहेत. ब्लूटूथच्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्सनी ‘निसान लीफ’ कार सिस्टीमचा ताबा मिळवून दाखवला आहे. हॅकरने चालत्या गाडीचे स्टिअरिंग, ब्रेक किंवा लाइट्स बंद केले, तर थेट अपघाताचा धोका निर्माण होतो. याशिवाय, गाडीचे लोकेशन, ट्रिप हिस्ट्री आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने चालकाच्या रोजच्या हालचालींवर पाळत ठेवली जाऊ शकते. त्यामुळे भविष्यात स्मार्ट गाड्या चालवताना केवळ रस्त्यावरील अपघातांपासूनच नव्हे, तर ‘सायबर हल्ल्यांमुळे होणारे डिजिटल अपघात’ यांपासूनही सावध राहावे लागणार आहे.
Read About : Copper Price Rise 2026 : सोने-चांदीच्या पाठोपाठ तांब्याच्या दरातही मोठी उसळी; नेमकं कारण काय?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.