वीज बंद करून १.३० लाखांची रोकड लुटल्याचा बनाव; पंपावरील कर्मचाऱ्यांसह तिघे गजाआड
सायंकाळीच आखला कट, मध्यरात्री ‘दरोडा’; पोलिसांच्या चौकशीत फुटले बिंग
गंगापूर : Petrol Pump Robbery : पेट्रोल पंपावर मध्यरात्री वीज बंद झाली… तोंडाला रुमाल बांधलेले दोन इसम कॅबिनमध्ये घुसले… कत्ती आणि लाकडी दांड्याचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांची रोकड लुटून पसार झाल्याचा थरारक प्रकार समोर आला. मात्र, पोलिसांच्या तपासात हा दरोडा नसून पंपावरील कर्मचाऱ्यांनीच रचलेला बनाव असल्याचे उघड झाले. अवघ्या १२ तासांत गंगापूर पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकल्या. चोरीला गेलेली संपूर्ण १ लाख ३० हजार रुपयांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली.
मध्यरात्री वीज बंद करून रचला बनाव
नांद्राबाद-सावखेडा रस्त्यावरील ‘गमर पेट्रोल पंपा’वर शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन जणांनी पंपाच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला. कत्ती आणि लाकडी दांड्याचा धाक दाखवत त्यांनी कॅश ड्रॉवरचे कुलूप तोडले आणि १ लाख ३० हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याचे रात्रपाळीवरील कर्मचाऱ्यांनी पंपमालक आमेर जुबेर नाहदी यांना सांगितले.घटनेची माहिती मिळताच नाहदी यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
कर्मचाऱ्याच्या चौकशीत संशय बळावला
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, पोलिस उपनिरीक्षक विश्वजित फर्ताडे आणि पोलिस अंमलदार मनोज घोडके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.यानंतर पंपावरील कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू करण्यात आली. रात्रपाळीवर असलेल्या तुषार बर्डे याच्या जबाबातील विसंगती पोलिसांच्या लक्षात आली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने बनावट दरोड्याचा संपूर्ण कट उघड केला.
सायंकाळीच आखला होता कट
तुषार बर्डे याने शनिवारी सायंकाळीच पंपावरील सहकारी कर्मचारी संदेश खंडागळे आणि त्याचा मित्र विकास मावस यांच्यासोबत मिळून गल्ल्यातील रोकड लुटण्याचा कट आखला होता. नियोजनानुसार मध्यरात्री पंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर संदेश आणि विकास यांनी तोंडाला रुमाल बांधून कॅबिनमध्ये प्रवेश केला आणि कत्ती व लाकडी दांड्याचा धाक दाखवत रोकड घेऊन पसार झाले.या संपूर्ण प्रकाराची तुषारसोबत ड्युटीवर असलेल्या ऋषिकेश नारळे याला कोणतीही माहिती नसल्याचे तपासात समोर आले.
तिघे गजाआड; १.३० लाखांची रोकड जप्त
या प्रकरणी तुषार बर्डे (रा. औरंगपूर हरसुली), संदेश खंडागळे आणि विकास मावस (दोघे रा. पुरी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची १ लाख ३० हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. पंपमालक आमेर नाहदी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दरोड्याचा तपास अवघ्या १२ तासांत पूर्ण केल्याने गंगापूर पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Read About : Baby Sale Deal : पोटच्या गोळ्याचा सव्वा लाखात सौदा; चौघे गजाआड
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.