नेपाळच्या मनांग जिल्ह्यातील चामे येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; मार्स्यांग्दी नदीचा प्रवाह अडल्याने पुराचा धोका
नेपाळ : Nepal Landslide Video : नेपाळमधील मनांग जिल्ह्यातील चामे परिसरातील असल्याचे सांगितला जाणारा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही सेकंदांतच डोंगरकडा अचानक कोसळताना दिसत आहे. डोंगरकड्यावर असलेली झाडे आणि काही घरेही मातीच्या ढिगाऱ्यासह खाली कोसळताना दिसतात. डोंगरकडा कोसळताच परिसरात मोठी धावपळ उडाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यावेळी एका महिलेच्या किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाजही ऐकू येतो.
मार्स्यांग्दी नदीचा प्रवाह अडल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, या भूस्खलनामुळे मार्स्यांग्दी नदीचा प्रवाह अडला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या खालच्या भागातील परिसरात अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडल्यास पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीकाठच्या आणि खालच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जीवितहानीबाबत अधिकृत माहिती नाही
या घटनेत नेमकी किती वित्तहानी झाली किंवा कोणी जखमी झाले का, याबाबत अधिकृत पुष्टी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओच्या आधारे घटनेचे ठिकाण आणि इतर तपशील सांगितले जात असल्याने अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, डोंगरकडा कोसळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
Read About : Maharashtra Drought : राज्यात दुष्काळी परिस्थितीवर सरकारचा मोठा निर्णय 2026
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.