रकुल प्रीत, वाशू भगनानी अन अली अब्बास जफर यांच्या ठिकाणी झडती
मुंबई: Bollywood Income Tax searches – बॉलिवूडमध्ये सोमवारी सकाळपासूनच एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडाली आहे. रुपेरी पडद्यावरील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक आयकर विभागाने छापा टाकत शोधाशोध सुरू केली. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, ज्येष्ठ निर्माते वाशू भगनानी, पॅनोरमा स्टुडिओज आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाने शोधमोहीम सुरू केली. मुंबईतील सुमारे १२ ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्राप्त माहितीनुसार, चित्रपटांचे परदेशातील चित्रिकरण, विदेशी वितरण आणि निर्मिती खर्चाशी संबंधित मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाच्या निदर्शनास आली आहे. या व्यवहारांमध्ये कराशी संबंधित काही अनियमितता आहे का, याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारवाईतून नेमके काय समोर आले, याबाबत अद्याप अधिकृत अंतिम माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या समोर आलेल्या आरोपांकडे निष्कर्ष म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही.
रकुल प्रीत सिंहच्या नावाचीही चर्चा
आयकर विभागाच्या कारवाईशी संबंधित नावांमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचाही समावेश असल्याची माहिती आहे. रकुल हिंदी तसेच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०२४ मध्ये तिने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांच्याशी विवाह केला. जॅकी हे प्रसिद्ध निर्माते वाशू भगनानी यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या कारवाईत भगनानी कुटुंबाशी संबंधित ठिकाणांचाही उल्लेख होत आहे.
वाशू भगनानींच्या ठिकाणीही तपास
निर्माते वाशू भगनानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील परिचित नाव आहे. ‘कुली नं. १’, ‘हिरो नं. १’, ‘बीवी नं. १’, ‘मुझे कुछ कहना है’ आणि ‘रहना है तेरे दिल में यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. अलीकडे ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटामुळेही भगनानी यांचे नाव चर्चेत आले होते. आता आयकर विभागाच्या शोधमोहीमेमुळे पुन्हा एकदा ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
अली अब्बास जफर यांच्या कार्यालयातही ‘सर्च’
या कारवाईची आणखी एक महत्त्वाची कडी म्हणजे दिग्दर्शक अली अब्बास जफर. त्यांच्या कार्यालयातही आयकर विभागाची शोधमोहीम सुरू असल्याची मिाहती आहे. ‘गुंडे’, ‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अली अब्बास जफर हे बॉलिवूडमधील चर्चेतील दिग्दर्शक आहेत.
पॅनोरमा स्टुडिओजही रडारवर?
पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित ठिकाणांवरही आयकर विभागाच्या पथकांकडून तपास सुरू असल्याचे वृत्त आहे. कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्या नेतृत्वाखालील या बॅनरने ‘प्यार का पंचनामा’, ‘रेड’, ‘खुदा हाफिज’ आणि ‘शैतान’ यांसारख्या चित्रपटांशी काम केले आहे.
विशेष म्हणजे, ‘दृश्यम द कन्क्लूजन’ हा या बॅनरचा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे.
कागदपत्रे, आर्थिक नोंदींची छाननी
मुंबईतील विविध ठिकाणी आयकर विभागाच्या पथकांकडून कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी तपासल्या जात असल्याचे वृत्त आहे. परदेशातील चित्रिकरण, वितरण आणि निर्मितीशी संबंधित खर्चाच्या व्यवहारांचा तपास या कारवाईतील महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे या शोधमोहीमेतून करचुकवेगिरी किंवा कोणतीही आर्थिक अनियमितता सिद्ध झाली आहे, असे सध्या म्हणता येणार नाही.
बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण
एका बाजूला मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तयारी आणि दुसऱ्या बाजूला आयकर विभागाची अचानक शोधमोहीम या दोन्ही घडामोडींमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता या कारवाईदरम्यान कोणती कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आहेत आणि आयकर विभागाकडून पुढे कोणती अधिकृम माहिती समोर येते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read About : Vidya Balan Romantic Moment – 47 वर्षीय विद्याच्या रोमँटिक अंदाजाने चाहत्यांना भुरळ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.