Ad Advertisement Ad Advertisement

Baby Trafficking Case : दीड महिन्याच्या बाळाचा भाजीपाल्यासारखा 4 वेळा निर्दयी सौदा

संभाजीनगर हादरले : जन्मदात्यांनी विकले, डॉक्टरांसह ७ जणांना बेड्या!

छत्रपती संभाजीनगर : Baby Trafficking Case : पैशांसाठी जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्याला १ लाख २० हजार रुपयांत विकल्याच्या प्रकरणात इवल्याशा जिवाचा अक्षरश: निर्दयी बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे देऊन विकत घेतलेले हे बाळ दलालांनी जणू एखादी वस्तू असल्यासारखे नफ्यासाठी पुढे-पुढे विकले. पाहता-पाहता हा चिमुकला जीव छत्रपती संभाजीनगरातून थेट हैदराबादला पोहोचला. मात्र, मुकुंदवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आणि ७ ऑगस्ट रोजी विकलेले हे बाळ तब्बल दीड महिन्यांनी सुखरुप परत आणले. यात बाळांची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी जन्मदाते, दलाल आणि डॉक्टरांसह तब्बल ७ जणांना बेड्या ठोकल्या.

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणारे जन्मदाते, बाळ दाखविणारी कौशल्या पवार, तिची मुलगी आणि पहिली दलाल सीमा रेशवाल, दुसरी दलाल संगीता आव्हाड (३५, रा. पडेगाव), तिच्या ओळखीचा डॉ. सुरेश राजाराम गुंटुका (४४, रा. पिग्गेरला, जि. जगित्याल, तेलंगणा) आणि त्याची नातेवाईक महिला उमा गंगाधर खटकम (४५, रा. तालागड, तेलंगणा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

तेलंगणातील उमा खटकम ही विवाहित आहे, पण तिला मूल-बाळ नाही. वैद्यकीय उपचारानंतरही अद्याप तिला अपत्यप्राप्ती झालेली नाही. त्यामुळे तिने बाळ दत्तक घेण्याचा विचार केला होता. तिचा नातेवाईक असलेला डॉ. सुरेश गुंटुका याच्या मध्यस्थीने तिने हे बाळ ३ लाख ५० हजार रुपयांत घेतले. धक्कादायक म्हणजे, आरोपी संगीता हिने त्यांना कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी हे बाळ घेतल्याचे तपासात समोर आले.

तीन वेळा सौदा; दलालांनी कमावला २ लाख ३० हजार नफा!
  • पहिला सौदा लाख १ लाख २० हजारांत : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांना बाळ नको होते. त्यांची अडचण ओळखून कौशल्या पवार हिने तिची मुलगी सीमा रेशवाल हिच्याशी त्यांची ओळख करून दिली. जन्मदात्यांनी १ लाख २० हजार रुपये रोख घेऊन आपला पोटचा गोळा सीमाला विकला.
  • दुसरा सौदा २ लाख ७० हजारांत : १ लाख २० हजार रुपयांत घेतलेल्या बाळाला आरोपी सीमा रेशवाल हिने दीड लाख रुपये नफा घेऊन तिच्या ओळखीतील संगीता आव्हाड हिला २ लाख ७० हजार रुपयांना विकले.
  • तिसरा सौदा ३ लाख ५० हजारांत : संगीता आव्हाड हिनेही ८० हजार रुपये नफ्यावर या बाळाचा सौदा तेलंगणातील जगित्याल जिल्ह्यातील पिग्गेरला येथील रहिवासी असलेल्या डॉ. सुरेश राजाराम गुंटुका याच्याशी केला. नांदेड येथे जाऊन तिने हे बाळ ३ लाख ५० हजार रुपयांना त्या डॉक्टरच्या ताब्यात दिले.
  • हैदराबादेतील नातेवाइकाला दिले बाळ : आरोपी डॉ. सुरेश गुंटुका याने हे बाळ तालागड, तेलंगणा येथे राहणारी त्याच्या भावाच्या साल्याची पत्नी उमा गंगाधर खटकम हिला ३ लाख ५० हजार रुपये घेऊन दिले.
पोटच्या गोळ्याला विकून घेतली सोन्याची चेन आणि २ मोबाईल!

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने ७ ऑगस्टला पोटच्या गोळ्याला १ लाख २० हजार रुपयांत विकले. या पैशांतून त्याच दिवशी त्यांनी दोघांसाठी २५ हजार रुपयांचे दोन मोबाइल आणि ९ ऑगस्टला ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले. पोलिसांनी तपासादरम्यान हे दागिने आणि मोबाईल जप्त केले आहेत. तसेच, बाळ खरेदी-विक्रीतील दलाल सीमा रेशवाल हिने स्वत:कडे १ लाख १० हजार रुपये ठेवले, तर तिची आई कौशल्या पवार हिला ४० हजार रुपये दिले. त्यातून तिने जुने कर्ज फेडले, अशी माहिती तपासात समोर आली.

बाळ सुखरूप.. साकार संस्थेत दाखल

तपास अधिकारी सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, हवालदार राजाभाऊ कोल्हे, समाधान काळे, पोलीस अंमलदार देविदास खेडकर, ज्योती लादे, नंदा गरड हे या रॅकेटच्या मुळापर्यंत गेले. पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागल्याचे पाहून आणि अटक निश्चित असल्याने अखेर २७ सप्टेंबर रोजी डॉ. सुरेश गुंटुका आणि उमा खटकम यांनी स्वत: बाळ मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणून दिले. पोलिसांनी त्या दोघांना अटक करून बाळाला बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीच्या आदेशानुसार सध्या हे बाळ साकार संस्थेत ठेवले आहे, असे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी सांगितले.

Jaipur Temple Dispute : जयपूर मंदिरातील आवाजावरून वाद; पुजाऱ्याशी गैरवर्तन, दोघांना अटक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.