Ad Advertisement Ad Advertisement

Captain Gundam Case : कॅप्टन गुंडम

Captain Gundam Case : समुद्र फक्त नद्यांना त्याच्यात सामावून घेतो असं नाही, तर मनुष्यप्राण्यांची अनेक गूढ रहस्येही आपल्या पोटात घेतो. जगातील सुमारे ९० टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो. जाणूनबुजून तेल सोडणे, प्रतिबंधित पाण्यात मासेमारी करणं, जहाजावरील कामगारांना गुलाम करणं, दरोडेखोरांकडून इंधनाची चोरी, मानवी तस्करी, समुद्री चाचेगिरी अशा किती प्रकारचे गुन्हे या समुद्राच्या साक्षीने होत असतात. त्याची मोजदादच नाही. खुल्या समुद्रात खून झाले तर नेमकं काय होत असेल? झालेल्या खुनाचा तपास कसा होतो? खुन्याला शिक्षा होते का? त्यासाठीचं हे बोलकं उदाहरण आहे.

आजूबाजूला सगळीकडे पसरलेल्या हिंद महासागरात ते चार जण पडलेले दिसत होते. त्यांनी बोटीवरून जीव वाचवायला उडी घेतली होती. पण, आता पाण्यात फसले होते. त्या चौघांनी लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं. समुद्राच्या उसळत्या लाटा त्यांना इथे तिथे फेकून देत होत्या. त्यांनी जेमतेम तिथल्या तरंगणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाला धरलं होतं. त्याचा आधार घेऊन ते मदत मिळण्याची वाट बघत होते. तिथे पसरलेल्या समुद्रात मोठी मासेमारी जहाजं घिरट्या घालत होती. मदतीसाठी मात्र कोणीही येत नव्हतं.

अचानक मँडरिन भाषेत कोणी तरी जोरात ओरडलं, ‘समोर, डावीकडे! काय करत आहात?’ त्यांना मदत मिळायची आशा वाटली. त्याच्या पुढच्या क्षणाला कोणी ऑर्डर दिल्याचं त्यांना ऐकू आलं ‘गोळीबार! गोळीबार! गोळीबार!’ त्यांनी जेमतेम उरलेलं सगळं त्राण गोळा करून ‘नको. नको. वाचवा.’ असं सांगण्याचा प्रयत्न केला. एकाने शरणागती पत्करण्याच्या प्रयत्नात आपले हात वर उचलले. हात हलवून दाखवले. पण, त्या जीव वाचवायला धडपडणाऱ्या चौघांवर गोळ्यांचा वर्षाव झालाच. त्यांना गोळ्या लागल्या. हात उचललेल्याच्या डोक्याच्या मागच्या भागात गोळी घुसली. काही क्षणात त्यांची शरीरं निश्चल झाली. निष्प्राण होऊन तरंगू लागली. निळ्याशार महासागरात रक्ताचे फवारे उडाले.
गोळीबार करणारे खलाशी हसत होते आणि फोटोसाठी पोझ देत होते. त्या बंदूकधारींनी ४० गोळ्या झाडल्या. त्यातला एक खलाशी अभिमानाने ओरडत होता, ‘मी पाच गोळ्या झाडल्या.’

या हत्याकांडाचा अस्पष्ट व्हिडीओ २०१२ साली काढला गेलेला होता. हिंद महासागरात त्या चार जणांची हत्या झाल्याचं दिसून येत होतं. हे सगळं हत्याकांड दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ चाललेलं होतं. त्या जहाजाबरोबरच ट्यूना मासेमारी करणारी, वाहून नेणारी आणखी किमान चार जहाजं तिथे होती. त्यावरील डझनभराहून अधिक साक्षीदार हे सगळं पहात होते. त्यातल्याच कोणीतरी तो व्हिडीओ काढला होता. तो व्हिडीओ काढला तरी समुद्रात घडलेल्या त्या हत्येची माहिती अधिकाऱ्यांना देणं त्यांच्यासाठी बंधनकारक नव्हतं. कारण समुद्रात कायद्याची अंमलबजावणी मर्यादित असते. अधिकारक्षेत्र गुंतागुंतीचं असतं.

२०१४ मध्ये फिजीमधल्या एका टॅक्सीत चुकून राहून गेलेल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ सापडल्यावर तो व्हिडीओ युट्यूबवर पोहोचला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुद्री सुरक्षा यंत्रणेकडून तैवानच्या तपास यंत्रणांना या हत्यांची माहिती मिळाली. त्या व्हिडीओत गोळीबाराचा आदेश देणारा एक चिनी नागरिक होता. तैवानमध्ये अधिकाऱ्यांनी एका संशयिताला अटक केली. तोच त्या व्हिडीओतला तो माणूस असावा अशी तपास अधिकाऱ्यांना खात्री होती.

तो व्हिडीओ चित्रित करणाऱ्या त्या खलाशाने सांगितलं की, त्या हत्येच्या आधीच्या आठवड्यात त्यांनी आणखी अशीच हत्या झाल्याचं पाहिलं होतं. त्यांच्याकडून कळलं की, हल्ल्याच्या वेळी तैवानचा ध्वज असलेल्या ‘पिंग शिन १०१’ या जहाजाचा कॅप्टन वांग फेंग यू होता. हे कळल्यावर मात्र तपासाची चक्र फिरू लागली. वांगचं त्यावेळचं जहाज काओशुंग बंदरात दाखल झालं. तेव्हा त्यावेळी तैवानच्या तटरक्षक दलाने त्याला ताब्यात घेतलं. हा वांग कॅप्टन होण्यासाठी खरंतर फारच तरुण. निर्णय घेण्यासाठी लागणारी शांत प्रवृत्ती त्याच्यात नव्हती. त्याला सगळे खलाशी ‘कॅप्टन गुंडम’ म्हणत. तो रागीट होता. लोकांना मारणारा. एखादी चूक कोणाकडून झाली तर तो ठोसा मारायचा वा लाथ मारायचा.

सागरी गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नॉर्वेजियन संशोधन संस्था, ट्रिग मॅट ट्रॅकिंगने सागरी डेटाबेसमधील प्रतिमांशी व्हिडीओ फुटेजची तुलना करून ‘पिंग शिन १०१’ जहाजाची ओळख पटवली. २०१५ आणि २०१६ मध्ये त्या व्यक्तींची आणि जहाजांची नावं तैवानच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की, हे बळी म्हणजे समुद्रीचाच्यांच्या एका अयशस्वी हल्ल्याचा भाग असल्याचं दिसून आलं.

‘पिंग शिन १०१’ हे जहाज काओशुंग येथील ‘पिंग शिन फिशरी कंपनी लिमिटेडचं होतं. त्या कंपनीचा मत्स्य व्यवसाय होता. २०१३ मध्ये ते जहाज सोमाली समुद्रात मासेमारी करत असे. जहाजावर तीन पाकिस्तानी सशस्त्र रक्षक होते. तिथे चार माणसं मारली गेल्याचं जरी दिसत असलं तरी तेव्हा त्या गोळीबारात १०-१५ जण मेले असावेत असं सांगितलं जातं. ते समुद्री डाकू नसावेत. त्यांच्याकडे बोटीवर बंदुका नव्हत्या, फक्त मासेमारीचं साहित्य होतं. त्यांच्यावर गोळीबार करणं ही हत्या होती. सागरी सुरक्षा विश्लेषक असा इशारा देतात की, खऱ्या किंवा खोट्या अशा विविध गुन्ह्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या हल्ल्यांचं समर्थन करण्याकरिता चाचेगिरीच्या दाव्याचा वापर केला जातो. कॅप्टन वांग फेंग यू ला काओशिउंग जिल्हा न्यायालयात २६ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याला मनुष्यवध आणि ‘बंदुका, दारुगोळा आणि चाकू नियंत्रण कायद्या’च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आलं. त्याने त्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, पण तिथेही हाच निर्णय कायम ठेवण्यात आला.

स्मिता पोतनीस
संपर्क : ९८२०६११२०६

Read About : Captain Tatsunosuke Ariizumi : कॅप्टन तात्सुनोसुके अरिझुमी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.